एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
काही लोकांना इतरांना होणाऱ्या त्रासाबद्दल काहीही वाटत नाही, विशेष म्हणजे नियम कायद्याची पायमल्ली करण्यात काहींना मजा वाटत असावी. त्यामुळेच जो पर्यंत रस्ता आपल्या बापाचाच आहे असे समजून काही बेजबाबदार लोक रस्त्याच्या मधोमध पर्यंत वाहने वाकडी तिकडी लावतील तो पर्यंत ट्राफीक जाम होणारच आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. सदरील महामार्गाचे काम हे कृषि उत्पन्न बाजार समिती चौक ते बस स्थानक रोड वर सुरू आहे. एक साईडचे सिमेंट रोडचे काम जवळपास होत आले आहे, मात्र त्यावरून अद्याप पूर्णपणे रहदारी सुरू झालेली नाही, त्यामुळे दुसऱ्या बाजुने येणारी – जाणारी वाहने सुरू आहेत. मात्र दररोज तर थोडीफार ट्राफीक जाम होतच असते, परंतू बुधवारी म्हणजेच आठवडी बाजाराच्या दिवशी प्रचंड प्रमाणात वाहतुक कोंडी (ट्राफीक जाम) होत आहे.
ट्राफीक जामचे कारण काय ?
कुंभार पिंपळगांवात बुधवारी आठवडी बाजार भरत असतो, सदरील बाजारात मोठ्या प्रमाणात नागरिक मोटारसायकल घेवून येत असतात त्यात काही गैर नाही, परंतू रस्त्याचे काम सुरू आहे याची जाणीव असतांनाही रस्त्यावर मधोमध पर्यंत कुठेही वाकडी तिकडी वाहने लावली जात आहेत, त्यामुळे दोन वाहने काय एक वाहन सुध्दा व्यवस्थित चालू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
रस्त्याच्या कडेला एका बाजुला एक अशी वाहने लावल्यास अडचण येणार नाही, परंतू एक वाहन लावून त्याच्या मागे पुन्हा दुसरे वाहन लावले जात आहे, त्यामुळे दोन वाहने पास होवू शकत नाही, अर्थातच ट्राफीक जाम (वाहतुक कोंडी) होत आहे. अशा वेळेला एखादी अॅम्ब्युलन्स आल्यास काय करावे हा प्रश्न पडतो. वाहने योग्य पध्दतीने पार्क न केल्यास इतरांना त्रास होवू शकतो याची थोडी सुध्दा जाणीव काही बेजबाबदार वाहनधारक ठेवत नाहीत.
रस्त्याचे काम चांगले व्हायलाच पाहिजे अर्थातच संबंधित गुत्तेदाराने रस्त्याच्या कामाचा दर्जा चांगला राखत शक्य तेवढ्या लवकर गावातून जाणाऱ्या सदरील रस्त्याचे काम करणे आवश्यक आहे यात शंका नाही. परंतू आपली सुध्दा काही जबाबदारी समजून कुठेही वाहने पार्क करता कामा नये याची खबरदारी सुध्दा सर्वांनी घेणे आवश्यक आहे.
पोलीस प्रशासन सुध्दा जबाबदार !
ज्या प्रमाणे खाकी वर्दी दिसल्यावर गुन्हेगारांना धडकी बसते त्याच प्रमाणे पोलीस प्रशासनाने लक्ष दिल्यास ट्राफीक जामच्या समस्येतून सुटका होवू शकते. आठवडी बाजाराच्या दिवशी किमान 2 पोलीस कर्मचारी जरी कृषि उत्पन्न बाजार समिती ते बस स्थानक रोडवर असल्यास शिवाय कुठेही वाहन पार्क करणाऱ्यावर कारवाई केल्यास ट्राफीक जामची समस्या उदभवणार नाही. मात्र घनसावंगी पोलीस ठाण्याला आणि कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीला कुंभार पिंपळगावातील या समस्येकडे लक्ष देण्यास वेळ नसावा, कदाचित इतर विशेष कार्यात ते गुंतले असावेत त्यामुळे ते उपस्थित राहू शकत नसावेत. मात्र त्यांच्या या दुर्लक्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना किती त्रास होत आहे याची जाणीव त्यांनी ठेवणे आवश्यक झाले आहे.