एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथे सध्या महामार्गाचे काम सुरू आहे. कृषि उत्पन्न बाजार समिती ते बस स्थानक रोडवर मुरूम टाकून रस्ता सपाट करण्याचे काम सुरू आहे. मात्र रस्त्यावर पाणी टाकण्यात येत नसल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.
महामार्गाचे काम करत असतांना मुरूम टाकल्यानंतर व सपाट करून दाबल्यानंतर त्यावर पाणी टाकणे आवश्यक असते, परंतू संबंधित गुत्तेदार व बांधकाम विभागाचे अभियंता याकडे जाणीपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. कधी तरी एखाद्यावेळी पाणी मारण्यात येत आहे. दिवसभर ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे प्रचंड प्रमाणात धूळ उडत असून जिकडे तिकडे धुळीचे साम्राज्य पसरत आहे.
लक्ष कुठं आहे ?
दिवसभर सदरील रस्त्यावर प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड त्रास होत आहे, एवढंच काय तर गाडी चालवणे सुध्दा अवघड जात आहे. त्यामुळे छोटे मोठे अपघात होण्याची शक्यताही आहे. ज्या रस्त्यावर सध्या काम सुरू आहे त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी दुकाने आहेत, प्रचंड प्रमाणात धूळ उडत असल्यामुळे व्यापारी दुकानांमध्ये धूळ अथवा मातीचे थर साचत आहेत. तसेच रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही धुळीचा खूप त्रास होत आहे. असे असतांनाही संबंधित गुत्तेदार अथवा बांधकाम विभाग झोपा काढत आहे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.
सर्वांनाच त्रास !
रस्त्याचे काम चांगले व्हावे, चांगल्या दर्जाचे व्हावे अशी सर्वांची अपेक्षा आहे. त्यामुळे शक्यतो कोणीही काम करणाऱ्यांना बोलत नाही, परंतू संबंधित गुत्तेदार व बांधकाम विभागाने नागरिकांच्याही अडचणी लक्षात घेणे आवश्यक आहे. दररोज होणाऱ्या धुळीच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. मात्र नागरिक काहीच बोलत नाहीत याचाच गैरफायदा गुत्तेदार व बांधकाम विभाग घेत असल्याचे दिसत आहे.
पाणी मारणार !
रस्त्यावर होत असलेल्या धुळीच्या त्रासाबाबत संबंधित अभियंता श्री.स्वामी यांच्याशी संपर्क साधला असता काही तांत्रिक अडचणीमुळे पाणी मारण्यात आले नाही, परंतू लवकरच रस्त्यावर पाणी मारून धुळीचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.