एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी, वाहनधारक व नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दुचाकी अर्थात मोटरसायकल व मोबाईल चोरीला जाणे हे तर नित्याचेच झाले आहे.
कुंभार पिंपळगांवचा विस्तार चारही दिशेने होत असून आजघडीला गावाची लोकसंख्या 20 ते 25 हजाराच्या आसपास आहे. शिवाय कुंभार पिंपळगांव शहरात अंदाजे 1000 च्या आसपास दुकाने आहेत. दिवसभरात परिसरातील 30 ते 40 गावातील नागरिक वाहनांसह विविध कामासाठी येथे येत असतात. शिवाय येथे भरणारा आठवडी बाजारही तालुक्यातील सर्वात मोठा बाजार आहे.
आजघडीला प्रत्येक कुटुंबात एक तरी दुचाकी (मोटरसायकल) आहे. अर्थातच कुंभार पिंपळगांव सह परिसरातल्या गावातील हजारो वाहनांची शहरात वर्दळ असते, बहुसंख्य व्यापारी, शेतकरी व नागरिकांनी वेळोवेळी पैशांची बचत करून मोटरसायकल घेतलेली असते, परंतू मोटरसायकल चोरीला गेल्यास त्या बांधवाला मोठा धक्का बसत असतो.
चोरीचा तपास नाही !
कुंभार पिंपळगाव शहरातून मागील काळात चोरीला गेलेल्या गाड्यांपैकी अपवाद सोडल्यास कोणतीच गाडी किंवा मोटरसायकल सापडल्याचे दिसून आले नाही. याचाच अर्थ मोटरसायकल चोरीला गेली ते पैसेही गेले आणि पुन्हा नवीन मोटरसायकल घ्यायची असल्यास पुन्हा कर्जबाजारी व्हावे लागते अशी परिस्थिती आहे.
वारंवार घडत असलेल्या चोरीच्या घटनांकडे घनसावंगी पोलीस ठाण्याचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत असून स्थानिक पोलीसांची भुमिकाच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. कोणत्याच वाहनाचा किंवा मोबाईलचा तपास लागत नसल्याने स्थानिक पोलीसांवर अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. त्यातली त्यात चोरी झाल्यास तात्काळ तपासाची चक्रे फिरवायचे सोडाच, स्थानिक पोलीस खुर्चीवरून उठायलाही तयार नसतात अशी परिस्थिती आहे.
चोरट्यांचा तपास लागेना !
कुंभार पिंपळगाव शहरातून अनेक रस्ते गेलेले आहेत, एका दिशेला अंबड रस्ता गेलेला आहे तर दुसऱ्या दिशेला आष्टी पाथरी रस्ता गेलेला गेलेला आहे. म्हणजेच अंबड पाथरी हायवे रस्ता आहे. तसेच एका दिशेला राजाटाकळी रस्ता तर दुसऱ्या दिशेला अरगडे गव्हाण रस्ता गेलेला आहे. म्हणजेच शहरातून पसार होण्यास अनेक रस्ते आहेत. त्यामुळे चोरटे पसार होण्यात यशस्वी होत आहेत.
चोरीला आळा कसा बसेल ?
कधी दुकानात चोरी, कधी मोटरसायकल चोरी, कधी इतर वाहन चोरी, कधी मोबाईल चोरी, कधी इतर वस्तू चोरी असे प्रकार वारंवार होत आहेत. कुंभार पिंपळगाव शहरात होणाऱ्या चोऱ्या रोखण्यासाठी पोलीसांनी गांभिर्यपूर्वक प्रयत्न करणे आवश्यक आहेच, परंतू आता कुंभार पिंपळगांव शहरात होत असलेली कोट्यावधींची उलाढाल पाहता आता कुंभार पिंपळगांव शहराच्या प्रमुख चौकात आणि चारही दिशेला जाणाऱ्या रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे (CCTV Cameras) बसवणे अत्यंत गरजेचे झाले आहे.
फक्त एका ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवून भागणार नाही, चांगल्या HD क्वालिटीचे सीसीटीव्ही कॅमेरे चारही दिशेला आणि प्रमुख चौकात बसवणे आवश्यक आहे. ज्यामध्ये मार्केट कमिटी चौक, सरस्वती भुवन शाळा चौक, बस स्थानक रोडवरील जुन्या पोलीस चौकीसमोरील चौक, गावात जाणाऱ्या रस्त्यावरील चौक, राजाटाकळी व अरगडे गव्हाण चौक अशा सर्व प्रमुख चौकात HD क्वालिटीचे सीसीटीव्ही कॅमरे बसवणे आवश्यक आहे.
राहत इंदोरी यांची एक प्रसिध्द शायरी आहे की, “लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है” म्हणजेच एका घराला आग लागलेली असेल तर ती आग इतर घरांपर्यंतही पोहोचू शकते. याचाच अर्थ आतापर्यंत अनेक लोकांच्या गाड्या, मोबाईल व इतर वस्तू चोरीला गेल्या आहेत, उद्या तुमची बारी असू शकते. आता गांभिर्याने घेतले नाही तर नंतर पश्चाताप करून काही उपयोग नाही.
गावाच्या चारही दिशेला आणि प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास पोलीसांना चोरट्यांचा तपास करणे शक्य होईल आणि चोरीला गेलेली गाडी किंवा इतर वस्तू परत मिळवणे शक्य होईल. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
सीसीटीव्ही DVR कुठे ठेवणार ?
काही वर्षांपूर्वी चारही दिशेला दुकाने नव्हती, परंतू आता प्रत्येक चौकात आणि सर्व दिशेला दुकाने झाली आहेत. त्यामुळे ज्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील त्याच चौकातील एखाद्या दुकानात सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्ड झालेला डाटा स्टोर ठेवण्यासाठी असलेला डीव्हीआर एखाद्या दुकानात ठेवता येणे सहज शक्य आहे.
एवढे पैसे कुठून येणार ?
प्रत्येकाकडे गाडी आणि मोबाईल आहे. त्यामुळे या विषयाशी माझा काय संबंध असे म्हणणे योग्य ठरणार नाही. सर्वांचे हित लक्षात घेवून परिसरातील सन्माननीय नेते, पक्ष व संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, आजी माजी जि.प. सदस्य, आजी माजी पंचायत समिती सदस्य, आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी चेअरमन यांच्यासह प्रमुख व्यापारी बांधव व नागरिकांनी सहकार्य केल्यास हा खूप मोठा विषय नाही. विशेष म्हणजे आधीच्या तुलनेत सीसीटीव्ही कॅमेरे आता स्वस्त आहेत. कोणी पुढाकार घेतल्यास सर्वांच्या हिताचा व महत्वपूर्ण असलेला हा प्रश्न नक्कीच मार्गी लागेल यात शंका नाही.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.