Your Alt Text

कुंभार पिंपळगाव शहरात ‘ग्रामीण रूग्‍णालय’ व्‍हावे यासाठी सर्कल मधील नागरिकांची महत्‍वपूर्ण मोहीम !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्‍या कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे यासाठी कुंभार पिंपळगांवसह सर्कल मधील नागरिक प्रयत्‍न करत असून त्‍यादृष्‍टीने पाठपुरावा करण्‍यात येत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव हे 30 ते 40 गावांचा केंद्रबिंदू असून या परिसरातील रूग्‍ण कुंभार पिंपळगांवला विविध उपचारासाठी येत असतात. कुंभार पिंपळगांव येथे असलेले प्राथमिक आरोग्‍य केंद्र हे जवळपास 40 वर्षांपासून आहे त्‍याचे रूपांतर ग्रामीण रूग्‍णालयात अद्यापपर्यंत झालेले नाही.

सध्‍या असलेल्‍या प्राथमिक आरोग्‍य केंद्रातील आरोग्‍य यंत्रणा पूर्णत: कोलमडल्‍याच्‍या अवस्‍थेत आहे. तातडीचे उपचार येथे मिळत नसल्‍याने गोरगरीब व सर्वसामान्‍य रूग्‍णांना तालुका किवा जिल्‍हास्‍तरावर जावे लागते. त्‍यामुळे रूग्‍णांना नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

परिसरातील गावांचा विचार केल्‍यास जवळपास 30 ते 40 गावातील रूग्‍ण येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात उपचार मिळेल या आशेने येत असतात, परंतू येथे असलेल्‍या अपुऱ्या सुविधेमुळे रूग्‍णांना परत जावे लागते, कुंभार पिंपळगावात सरकारी व खाजगी दवाखान्‍यात मिळून शेकडो रूग्‍ण उपचारासाठी येत असतात.

अपघात घडल्‍यास !

कुंभार पिंपळगांव ते पाथरी (जि.परभणी) 42 कि.मी. आणि कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी 20 कि.मी. असे जवळपास 62 कि.मी. रस्‍त्‍यावर मध्‍ये कोठेही अपघात झाल्‍यास ग्रामीण रूग्‍णालय नाही, शिवाय कुंभार पिंपळगांव ते परतूर सुध्‍दा 35 कि.मी आहे. या रस्‍त्‍यावरही मोठे रूग्‍णालय नाही. तसेच कुंभार पिंपळगांवातील 40 गावांमध्‍येही अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीवर उपचाराची सुविधा नाही. मागील काळात अपघातग्रस्‍त व्‍यक्‍तीला वेळेवर उपचार न मिळाल्‍यामुळे रूग्‍णांना जीव गमवावा लागला आहे.

महिलांची अडचण !

महिलांना विविध आजार व प्रसुतीसाठी आवश्‍यक तसेच तातडीची सेवा उपलब्‍ध नसल्‍यामुळे रूग्‍णांना घनसावंगी किंवा पुढे पाठवावे लागते. प्रा.आ.केंद्रात एक्‍सरे किंवा सोनोग्राफी व इतर सुविधा नसल्‍यामुळे रूग्‍णांना घनसावंगी किंवा पुढे जावे लागते.

रूग्‍ण संख्‍या मोठी !

कुंभार पिंपळगांवची लोकसंख्‍या अंदाजे 15 ते 20 हजार आहे, शिवाय 30 ते 40 गावातील लोकसंख्‍या गृहीत धरल्‍यास हा आकडा खूप मोठा आहे.
कुंभार पिंपळगांव शहरात अंदाजे 40 खाजगी दवाखाने आहेत, यावरून शहरात किती रूग्‍ण येत असतील याचा अंदाज लावता येईल.

आजघडीला गोदाकाठच्‍या गावातील रूग्‍णांना जर घनसावंगीला जायचे असेल तर जवळपास 35 ते 40 कि.मी. अंतर कापून जावे लागते, अशा परिस्थितीत एखाद्या रूग्‍णाला तातडीच्‍या उपचाराची गरज भासल्‍यास काय करावे हा प्रश्‍न निर्माण होतो.

ग्रामीण रूग्‍णालय झाल्‍यास !

कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्‍णालय झाल्‍यास येथे सर्व प्रकारच्‍या तपासण्‍या मोफत होतील, महिलांची डिलीवरी (प्रसुती) करतांना येणाऱ्या अडचणी दूर होतील, सीजरची आवश्‍यकता अल्‍यास त्‍याचीही सुविधा असेल. सोनोग्राफी, एक्‍सरे मोफत होतील. हाडाचे प्‍लास्‍टर पासून छोटे मोठे ऑपरेशन सहज होवू शकतील.

एमर्जन्‍सी मध्‍ये अटॅक आल्‍यास त्‍याचाही उपचार होवू शकेल, अॅक्‍सीडेंट झाल्‍यास, जळालेले पेशंट असल्‍यास, साप चावला, विंचू चावला तर त्‍याचेही उपचार येथे मिळू शकतील. जेणेकरून अनेकांचा जीव वाचू शकेल. दाताचे डॉक्‍टर फ्री मध्‍ये उपलब्‍ध असतात, म्‍हणजेच सर्व तपासण्‍या व ऑपरेशन फ्री मध्‍ये होतात.

कुत्रा चावल्‍यानंतर लागणारे इंजेक्‍शन, साप चावल्‍यानंतर मिळणारे इंजेक्‍शन फ्री मध्‍ये मिळतात, प्राथमिक आरोग्‍य केंद्रापेक्षा अनेक पटीने औषध साठा ग्रामीण रूग्‍णालयात उपलब्‍ध असतो. यासह अनेक प्रकारच्‍या सुविधा येथे उपलब्‍ध असतात.

तज्ञ डॉक्‍टरांची मोफत सेवा !

कुंभार पिंपळगांवला ग्रामीण रूग्‍णालय झाल्‍यास पोटाचे, हाडाचे, डोळ्याचे डॉक्‍टर तसेच स्‍त्री तज्ञ असे विविध प्रकारचे अनेक MD व MBBS डॉक्‍टर येथे उपलब्‍ध असतात. जे की सर्व प्रकारच्‍या आजारांवर उपचार करत असतात. अर्थातच सर्व सेवा फ्री असते.

गोरगरीबांना मिळेल दिलासा !

कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्‍णालय झाल्‍यास गरीब असो की श्रीमंत सर्वांना मोफत उपचार मिळतील. गोरगरीबांचे खाजगी दवाखान्‍यात खर्च होणारे हजारो रूपये वाचतील, त्‍यांना वेळेवर आधुनिक उपचार मिळाल्‍यामुळे त्‍यांना मोठा दिलासा मिळेल.

सर्वच प्रयत्‍न करणार !

कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे यासाठी कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील गावातील समस्‍त नागरिक प्रयत्‍न करणार आहेत, त्‍याचाच एक भाग म्‍हणून सर्वपक्षीय नेत्‍यांना याबाबत निवेदन देण्‍यात येणार आहे. सदरील निवेदन हे कोणत्‍याही एका व्‍यक्‍तीकडून न जाता कुंभार पिंपळगांव सर्कल मधील समस्‍त नागरिकांच्‍या वतीने राहणार आहे.

याबाबत अनेक नागरिकांनी ग्रामीण रूग्‍णालयाचा मुद्दा अत्‍यंत महत्‍वाचा असून जो सन्‍माननीय नेता हा प्रश्‍न मागील लावेल अर्थात ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून आणेल त्‍याचे समस्‍त नागरिक आभारी राहतील अशी प्रतिक्रिया सर्कल मधील अनेक नागरिकांनी दिली आहे.

निवडणूकीवर इम्‍पॅक्‍ट !

कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे अशी सर्वांचीच इच्‍छा आहे. येत्‍या काळात स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था आणि लोकसभा व विधानसभेच्‍या सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. जो नेता हा प्रश्‍न मार्गी लावेल अर्थात ग्रामीण रूग्‍णालय मंजूर करून आणेल त्‍याला अर्थातच मोठा फायदा होईल असे जाणकारांचे मत आहे.

अभी नही तो कभी नही !

मुर्दाड मानसिकता ठेवल्‍यामुळे किती नुकसान होते हे सर्वांसमोर आहे. ज्‍या गोरगरीबांना 2 वेळच्‍या जेवणासाठी तारेवरची कसरत करावी लागते त्‍यांना जेव्‍हा काही आजार होत असतो आणि खाजगी दवाखान्‍यात प्राथमिक उपचारासाठी 500 रूपये सुध्‍दा नसतात तेव्‍हा त्‍यांची काय अवस्‍था होत असेल. याचा फक्‍त अंदाज घेतला तरी बरंच काही लक्षात येईल.

ग्रामीण रूग्‍णालय झाल्‍यास सर्वच प्रकारचे उपचार मोफत होणार असून गरीब असो की सामान्‍य नागरिक सर्वांना मोफत आधुनिक उपचार मिळणार आहेत. येत्‍या काळात निवडणूका असून सर्वांनी एकजुटता दाखवल्‍यास हा प्रश्‍न नक्‍कीच मार्गी लागू शकतो. त्‍यामुळे “अभी नही तो कभी नही” हीच भावना सर्वांनी ठेवणे आवश्‍यक आहे.

सर्वांचाच पाठिंबा !

पक्ष, गट तट न पाहता ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे अशी सर्वांचीच इच्‍छा असून सर्वजण यासाठी प्रयत्‍न करणार आहेत. त्‍याची सुरूवातही झाली आहे. ग्रामीण रूग्‍णालय व्‍हावे ही तुमचीही इच्‍छा असेल तर ही माहिती अथवा बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा किंवा शेअर करा जेणेकरून ही मोहीम व्‍यापक होईल आणि सर्वांच्‍या एकजुटीमुळे लवकरच हा प्रश्‍न मार्गी लागेल.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍यांसाठी येथे क्लिक करा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!