Your Alt Text

अहो जिल्‍ह्यात फेमस आमचं गाव अजून टमरेल मुक्‍त झालंय नाही ! कारण आमच्‍या गावात अजून तरी एकही सार्वजनिक शौचालय नाही !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
अहो, तुमच्‍या गावाचं अन शहराचं काय म्‍हणता, आमचंही शहरच आहे, फक्‍त नावापुढं गाव लागलेलं आहे, आमच्‍या गावात (शहरात) एवढ्या गोष्‍टी सांगण्‍यासारख्‍या आहेत की तुम्‍ही पण म्‍हणाल खरंच गाव भारी दिसतंय ! आमचे कुंभार पिंपळगांव हे घनसावंगी तालुक्‍यातील सर्वात मोठे गांव (शहर) आहे, गावाची लोकसंख्‍या 20 ते 25 हजार आहे. गावात श्रीमंतांची संख्‍याही बरीच आहे आणि हुशार मंडळीही भरपूर आहे. मातब्‍बर लोकप्रतिनिधी आहेत, नेते पदाधिकारीही आहेत, गावात 1000 ते 1500 दुकाने असतील म्‍हणजे मार्केट बी लईच मोठं आहे, गावातून हायवे सुध्‍दा गेला आहे, तसं गाव चांगलंय पण फक्‍त आमच्‍या गावात सार्वजनिक शौचालय नाही ! अर्थातच अशा अनेक प्रतिक्रिया सर्वसामान्‍य जनतेतून येत आहेत.

लोकांच्‍या भावना !

अहो, बुधवारी तर आठवडी बाजार एवढा भरतो की, महिला पुरूषांसह ही संख्‍या 50 हजाराच्‍या वर जात असेल. एवढा बाजार भरतो की, इतर जिल्‍ह्यातील आणि तालुक्‍यातील व्‍यापारी येथे येतात, अर्थातच बाजारात आसपासच्‍या 30 ते 40 गावातील नागरिक बाजारासाठी येथे येत असतात. लईच मोठा बाजार भरतो राव, म्‍हणजे जिल्‍ह्यात आमचा बाजार प्रसिध्‍द आहे, गांव तसं चांगलं पण फक्‍त आमच्‍या गावात एकही सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, आमच्‍या गांव परिसरात खूप लांबून पाहुणे येतात, कोणी मोठमोठ्या आलिशान गाड्यांमध्‍ये आमच्‍या गावात येतात तर कोणी एसटी बसने येतात किंवा परिसरातील गावात येथून जातात. गावाचं मार्केट ते पाहुन सांगतात किती मोठं मार्केट आहे राव, माता भगीनी सुध्‍दा गावाचं मार्केट पाहून समाधान व्‍यक्‍त करतात, बरं पाहुण्‍याकडे गेल्‍यावर पाहुणे सगळी सोय करतात. परंतू परत येतांना कुंभार पिंपळगांवात शौचालयास जायचे असेल तर अडचण होते, कारण आमचं गाव तसं चांगलं पण फक्‍त आमच्‍या गावात सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, आमच्‍या गावाचे मार्केट एवढं मोठं आहे की, येथे खरेदीसाठी तसेच खाजगी दवाखान्‍यात उपचारासाठी किंवा दुसऱ्या गावाला जाण्‍यासाठी मोठ्या संख्‍येने महिला, लहान मुले, वयोवृद्ध महिला पुरूष येथे येत असतात. महिलांचे सशक्‍तीकरण आणि महिलांचे कल्‍याण व्‍हावे ही आमची सर्वांची भुमिका आहे. फक्‍त काय महिलांना किंवा मुलींना शौचालयास जायचे असेल तर खूपच अडचण होते म्‍हणजे पर्यायच दिसत नाही, कारण गांव तसं चांगलं पण फक्‍त आमच्‍या गावात एकही सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, गावात कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती चे मोठे मार्केट आहे, मार्केट कमिटीने 46 च्‍या जवळपास व्‍यापारी गाळे बांधलेले आहेत, जमिनही भरपूर आहे, आठवडी बाजाराच्‍या दिवशी येथे बैलाचा बाजार भरतो, भुसार मालाचाही बाजार भरतो, शेतकरी महिला पुरूष मोठ्या संख्‍येने येतात, म्‍हण्‍जे मार्केट कमिटीला कमाई सुध्‍दा भरपूर आहे. गांव तसं चांगलंय, पण काय आमच्‍या गावातील मार्केट कमिटी मध्‍ये सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, आमच्‍या गावाला बसस्‍थानक सुध्‍दा आहे, बस स्‍थानकात बसायला जागा आहे, आता पाण्‍याची पण सुविधा झाली आहे, बस स्‍थानकात चारही बाजुने खूप मोठी जागा आहे, बस स्‍थानकात मुतारी पण आहे, म्‍हणजे जास्‍त काही नसेल पण ठिकठाक आहे, गांव तसं चांगलं आहे पण फक्‍त आमच्‍या गावातील बसस्‍थानकात सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, आमच्‍या गावाची ग्रामपंचायत तर परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे, ग्रामपंचायतला शासनाचा कोट्यावधी रूपये निधी येतो, 15 व्‍या वित्‍त आयोगातून बराच निधी हा पाणीपुरवठा व स्‍वच्‍छतेसाठी येतो. पण ग्रामपंचायत मधून मला द्या, मला द्या म्‍हणून आवाज ऐकायला मिळतो, कदाचित त्‍यामुळे निधी शिल्‍लक राहत नसावा, बरं तसं आमचे ग्रामसेवक एवढे वाईट नाहीत, फक्‍त काय आमच्‍या घनसावंगी तालुक्‍यात त्‍यांच्‍या एवढं बिझी कोणीच नाही, कदाचित त्‍यामुळे ते 8-8 दिवस ग्रामंपचायतला येतच नाहीत असं लोकं म्‍हणतात. त्‍यामुळे समस्‍या अडचणी त्‍यांच्‍या पर्यंत पोहोचत नसाव्‍यात. विकासाच्‍या भानगडीत आम्‍ही पडत नाही, बाकी ठीक आहे, गांव तसं चांगलं आहे, पण फक्‍त आमच्‍या गावात ग्रामपंचायतचे सार्वजनिक शौचालय नाही.

अहो, आमच्‍या तालुक्‍याला खूप मोठमोठी पंद मिळाली आहेत, आमच्‍या कुंभार पिंपळगांवसह तालुक्‍यात एक से बढकर एक नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, पदाधिकारी आहेत. काय सांगावं एवढा दबदबा आहे त्‍यांचा की, त्‍यांचे नाव घ्‍यायला अर्धा तास लागतो. तसं नेते चांगले आहेत, भाषण बी चांगलं देतेत बरं का, सगळं ठीक आहे, विकास वगैरे जावू द्या पण गांव तसं चांगलं आहे, पण फक्‍त आमच्‍या गावाला सार्वजनिक शौचालय नाही.

दोष कोणाचा ?

दोष आमचाच आहे, पण आम्‍ही स्‍वत:ला दोषी मानत नाही, कारण आमचे पाहुणे, मित्र अन प्रवासी गावात आल्‍यावर त्‍यांना टमरेल घेवून जाताना पाहण्‍यात आम्‍हाला आनंद होतो. प्रवासी माता भगीनींना नाईलाजाने उघड्यावर बसावे लागते, याचेही आम्‍हाला वाईट वाटत नाही. मनावर घेतल्‍यास झटक्‍यात विषय मार्गी लागू शकतो, पण आम्‍ही कोणत्‍याही समस्‍येवर बोलतच नाहीत. शौचालयासारखी समस्‍या शुल्‍लक दिसत असली तरी त्‍याचे सोयरसुतक आम्‍हाला नाही. त्‍यामुळेच म्‍हणावे लागत आहे की, फक्‍त नावालाच जिल्‍ह्यात फेमस आमचं गाव अजून टमरेल मुक्‍त झालंय नाही ! कारण आमच्‍या गावात अजून तरी एकही सार्वजनिक शौचालय नाही !


इतर बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!