Your Alt Text

भैय्यासाहेब, पत्रकारांचे नंबर ऐनवेळी गोळा करून आणि सत्‍कार करून तुम्‍हाला काय सिद्ध करायचं आहे ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी मतदारसंघाचे मागील २५ वर्षे लोकप्रिय (?) राहिलेले माजी मंत्री तथा माजी आमदार राजेश टोपे यांनी पत्रकारांसाठी आयोजित केलेल्‍या एका कार्यक्रमाला बोलावण्‍याकरीता त्‍यांच्‍याकडे किंवा त्‍यांच्‍या पीए कडे पत्रकारांचे मोबाईल नंबर नसणे ही बाब चर्चेचा विषय ठरत आहे.

राजेश टोपे यांनी मतदारसंघातील पत्रकारांचा सत्‍कार केला त्‍याबद्दल त्‍यांचे अभिनंदनच. (एल्‍गार न्‍यूजच्‍या संपादकांनाही सत्‍काराला येण्‍याबाबत फोनवर कल्‍पना देण्‍यात आली होती.) माजी मंत्री राजेश टोपे हे कोरोना काळात आरोग्‍यमंत्री असतांना त्‍यांनी राज्‍यात आरोग्‍य विभागात महत्‍वाची कामगिरी केल्‍याचे सांगितले जाते. याच काळात कुठं काय कमी पडतंय हे शोधण्‍यासाठी त्‍यांनी राज्‍यातील पत्रकारांच्‍या बातम्‍यांच्‍या अनुषंगाने दखल घेत पुढील कार्यवाही केली. यावरून माजी आरोग्‍यमंत्री पत्रकारांबाबत सकारात्‍मक असल्‍याची बाब त्‍यांनी अनेक कार्यक्रमात बोलून दाखवली.

मात्र त्‍यांच्‍या मतदारसंघातील पत्रकारांचेच नंबर माजी आरोग्‍यमंत्र्यांकडे उपलब्‍ध नाही अशी परिस्थिती दिसून येत आहे. कारण त्‍यांच्‍या पीए (?) यांनी काही पत्रकारांना फोन करून तालुका किवा तुमच्‍या गाव शहरातील पत्रकार कोण कोण आहेत त्‍यांचे नंबर द्या असे सांगितले. जर तालुक्‍यात किंवा परिसरात कोण कोण पत्रकार आहेत हेच तुम्‍हाला माहित नाही, त्‍यांचे नंबरही तुमच्‍याकडे नाही, मग हा ऐनवेळी प्रेम कशासाठी ? असा प्रश्‍नही अनेकांना पडला आहे.

सत्‍काराबद्दल काही पत्रकारांनी ज्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या त्‍याचा सारांश असा होता की…. भैय्यासाहेब काहींचा अपवाद सोडल्‍यास तुम्‍ही पत्रकारांशी बोलत नाही, त्‍यांचा नंबरही तुमच्‍याकडे नाही, त्‍यांच्‍यासाठी एखादा उपक्रम तुम्‍ही कधी हाती घेतला नाही, त्‍यांच्‍या हिताची एखादी गोष्‍टही केली नाही, त्‍यांच्‍या कल्‍याणाचा तर विषयच सोडा, तुम्‍ही त्‍यांची साधी विचारपूसही केली नाही, मग आता फक्‍त सत्‍कार करून तुम्‍हाला काय सिद्ध करायचं आहे ? असा सवाल अनेकांना पडला आहे.

आश्‍चर्य म्‍हणजे तुमच्‍याकडेच नव्‍हे तर तुमच्‍या पीए कडे (जुन्‍या पत्रकारांसह) बहुतांश पत्रकारांचे नंबरच नसल्‍याचे आढळून आले. तुम्‍ही किंवा तुमचे पीए जर आम्‍हाला विचारत असतील की तालुक्‍यात किंवा गाव परिसरात कोण कोण पत्रकार आहेत त्‍यांचे नंबर द्यावेत, तर याचा अर्थ काय घ्‍यायचा ?

जर तालुक्‍यातील किंवा मतदारसंघातील पत्रकारांचे तुमच्‍याकडे नंबरच नाही, जर तुम्‍ही त्‍यांना ओळखतच नसाल आणि त्‍यांच्‍या योगदानाची तुम्‍हाला माहितीच नसेल तर तुम्‍ही सत्‍कार तरी कशाला करताय ? घनसावंगी तालुक्‍यात ६० पत्रकार सुध्‍दा नसतील, तुमच्‍या मर्जीतल्‍या हजारो लोकांचा बायोडाटा तुमच्‍याकडे उपलब्‍ध आहे, मग ६० पत्रकारांचे नाव आणि त्‍यांचे वर्तमानपत्र, चॅनल किंवा पोर्टल माहित का नसावेत ? मग ऐनवेळी हा उठाठेव कशाला ? असा सवालही उपस्थित होत आहे.

सत्‍काराचा स्विकार पण…

भैय्यासाहेबांच्‍या सदरील पीए कडून काही पत्रकारांना सत्‍कारासाठी आलेला कॉल कदाचित आयुष्‍यातील हा पहिलाच कॉल असावा. दि.७ रोजी अनेक पत्रकार बांधवांनी सत्‍कार कार्यक्रमाला उपस्थित राहून सत्‍कार स्विकारला त्‍याबद्दल काही तक्रार असण्‍याचं कारण नाही, परंतू खाजगीत पत्रकार तोच विषय मांडत आहेत की, कधीतरी एखादे निमित्‍त करून बोलवायचं आणि सत्‍कार करून मोकळं व्‍हायचं. बाकी पत्रकारांच्‍या हिताचं काय ? त्‍यांच्‍या कल्‍याणाचं काय ? त्‍यांच्‍या मुलाबाळाचं काय ? शिक्षणाचं काय ? आरोग्‍याचं काय ? समाज हितासाठी वर्षानुवर्षे पत्रकारांनी फक्‍त घर जाळून कोळशेच करत रहायचे काय ? असा सवालही काही बांधवांनी उपस्थित केला आहे.

पत्रकारांच्‍या कल्‍याणाचं काय ?

पत्रकारांचा तुम्‍ही सत्‍कार केला त्‍याबद्दल पुनश्‍च तुमचे अभिनंदन, परंतू या सत्‍कार कार्यक्रमात तुम्‍ही पत्रकारांच्‍या कल्‍णासाठी एखादी पोकळ घोषणा तरी केली का ? २५ वर्षात शक्‍य झाले नाही परंतू पुढील काळात किमान मतदारसंघातील पत्रकारांच्‍या कल्‍याणासाठी प्रयत्‍न करू, शासन दरबारी पत्रकारांच्‍या हितासाठी पाठपुरावा करू, पत्रकारांच्‍या मुला-मुलींचे शिक्षण, आरोग्‍य, पत्रकारांच्‍या अडचणी यासाठी काही करता येईल का यासाठी प्रयत्‍न करू, असे किमान काही डायलॉग तरी मन राखण्‍यासाठी तुम्‍ही कार्यक्रमात उच्‍चारले का ? असा सवालही बांधवांनी उपस्थित केला आहे.

तेव्‍हा तर शक्‍य होतं !

तुम्‍ही २५ वर्षे आमदार होता, यातील बहुतांश काळ तुम्‍ही मंत्री होता, तेव्‍हा तर तालुक्‍यातील किंवा मतदारसंघातील आणि एकूणच जिल्‍ह्यातील पत्रकारांचे कल्‍याण करणं तुम्‍हाला सहज शक्‍य होते. कोरोना काळात तर तुम्‍ही राज्‍याचे आरोग्‍यमंत्री होता. कोरोनाचा काळ तर असा होता की, त्‍या काळात तर कोणाचेही मरणे सोपे आणि जगणे अवघड झाले होते. पत्रकारांचीही काही वेगळी परिस्थिती नव्‍हती. (झाकली मुठ सव्‍वा लाखाची म्‍हणून अडचणीत असतांनाही सगळे शांत होते.) इतरांप्रमाणेच पत्रकारांना सुध्‍दा दोन वेळच्‍या जेवणाचे नियोजन कसे करावे हा प्रश्‍न पडला होता, अनेक पत्रकारांवर तर उपासमारीची वेळ आली होती. तेव्‍हा तुम्‍ही एखाद्या पत्रकाराला साधी विचारपूस तरी केली का ? तालुक्‍यातील सगळे पत्रकार जिवंत आहेत की काही स्‍वर्गवासी झाले याची साधी माहिती तरी घेतली का ? जर तुम्‍हाला तेव्‍हा पत्रकारांच्‍या जगण्‍या मरण्‍याशी काहीही घेणंदेणं नव्‍हतं तर मग आत्‍ता त्‍यांचा सत्‍कार करून तुम्‍ही काय सिध्‍द करू इच्छिता ? असाही प्रश्‍न काही बांधवांनी उपस्थित केला आहे.

…तर सत्‍कार स्विकारायला हरकत नाही !

चांगल्‍या कार्यासाठी कोणी सत्‍कार करून प्रोत्‍साहन देत असेल तर ते योग्‍यच आहे, त्‍यात दुमत असण्‍याचे कारण नाही. असे असतांनाही पत्रकार बांधव शक्‍यतो सत्‍काराची अपेक्षा न करता आपले कर्तव्‍य नित्‍यनियमाने पार पाडत असतात. पत्रकार बांधवांना सत्‍काराची अपेक्षा नसली तरीही कधी जे नागरिक मग ते कोणत्‍याही पक्ष, संघटनेचे लोकप्रतिनिधी असो, व्‍यावसायिक असो, अधिकारी असो किंवा इतर क्षेत्रातील असो, जर खऱ्या अर्थाने पत्रकारांवर प्रेम करत असतील, त्‍यांचा आणि त्‍यांच्‍या लेखणीचा आदर करत असतील, सत्‍य स्विकारत असतील, पत्रकारांचंही भलं व्‍हावं अशी मानसिकता ठेवत असतील आणि प्रत्‍यक्ष- अप्रत्‍यक्ष कधीतरी का असेना पाठबळ उभं करत असतील तर त्‍या मान्‍यवरांचा सत्‍कार स्विकारायला पत्रकारांना काहीच अडचण नाही. परंतू ज्‍यांना वर्षानुवर्षे पत्रकारांसाठी बरंच काही करणे सहज शक्‍य असतांनाही त्‍यांनी काहीच न करता इकडून तिकडून नंबर जमा करून आणि सत्‍कारासाठी बोलावून नेमकं काय सिध्‍द करण्‍याचा प्रयत्‍न केला ? मनातून नसेल तर सत्‍कार तरी कशाला हवंय ? असाही प्रश्‍न किंवा उद्विग्‍नता अनेकांनी व्‍यक्‍त केली आहे.

तेव्‍हा तर बोलायला वेळ नव्‍हता !

तुम्‍ही एवढे वर्षे आमदार, मंत्री असतांना मतदारसंघातील पत्रकार तुम्‍हाला स्‍वत:साठी नव्‍हे तर मतदारसंघातील विविध समस्‍या, लोकांच्‍या अडचणी साठी फोन करत होते, परंतू तरीही तुमच्‍याकडे कधीच वेळ नव्‍हता. तुमचे सोबतचे पीए कायम सांगायचे की, साहेब एवढे बिझी आहेत की सध्‍या बोलूच शकत नाही, तुमचे पीए यांचे नेहमी रेकॉर्डेड ठरलेले वाक्‍य असायचे की, साहेब बीझी आहेत, साहेब कामात आहेत, साहेब बोलू शकत नाही, साहेबांना वेळ नाही. मग आता तुम्‍ही पराभूत झाल्‍यावर तुम्‍हाला वेळ सापडलाय का ? तुम्‍ही गेल्‍यावर्षीही नावाला सत्‍कार केला असेल पण वर्षानुवर्षे घर जाळून कोळशे करणाऱ्या पत्रकारांच्‍या कल्‍याणाचं काय ? त्‍यांच्‍या भविष्‍याचं काय ? त्‍यांच्‍या अडचणी, त्‍यांच्‍या समस्‍यांचे काय ? याचा विचार तुम्‍ही करणार आहात की नाही ? असाही सवाल काही पत्रकार बांधवांनी खाजगीत उपस्थित केला आहे.

बांधाला बांध नाही !

तुमच्‍याशी आमचा काही वैयक्तिक वाद नाही किंवा जुने काही भांडणही नाही. लोकशाहीचा चौथा स्‍तंभ म्‍हणून सिंहाचा नसेल पण खारीचा वाटा उचलण्‍याचा आमचा प्रयत्‍न असतो. आमच्‍यातील काही अपवाद असतीलही पण आम्‍ही बहुतांश पत्रकार कोणाचेही समर्थक अथवा विरोधक नाही. जे दिसेल ते लिहायचं, जे सत्‍य आहे ते मांडण्‍याचा आमचा प्रयत्‍न असतो. जशी मागील काळात तुमच्‍याकडून मतदारसंघाच्‍या विकासासह पत्रकारांच्‍या थोड्याफार कल्‍याणाची (अंधारातून नव्‍हे तर उजेडातून आणि योग्‍य मार्गाने शासनाच्‍या माध्‍यमातून) अपेक्षा होती. साहजिकच तीच अपेक्षा सध्‍याच्‍या आमदारांकडून सुध्‍दा असणार आहे. अर्थातच पत्रकारांचे कल्‍याण कसं होईल या दृष्‍टीने खऱ्या अर्थाने प्रयत्‍न व्‍हावे, त्‍यांचा योग्‍य तो सन्‍मान राखला जावा, अशी लोकप्रतिनिधींसह शासनाकडून समस्‍त पत्रकारांची माफक अपेक्षा असतेच. पत्रकारांच्‍या कल्‍याणासाठी पुढील काळात तुम्‍ही मनातून काही प्रयत्‍न केलेच तर आनंदच असेल, आणि प्रयत्‍न नाही केले तर कुठलेही दु:ख नाही. बाकी तुमचा आमचा काही वाद नाही आणि बांधाला बांधही नाही याची जाणीव तुम्‍ही ठेवावी आणि आम्‍हाला तर आहेच… अशीही भावना काही बांधवांनी व्‍यक्‍त केली आहे.


इतर बातम्‍या खाली वाचू शकता…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!