Your Alt Text

लोन अॅपवरून कर्ज घेणार असाल तर सावधान ! फसवणुकीमुळे येवू शकता अडचणीत ! | Beware of Fake Loan Apps

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज :-
आजकाल विविध कंपन्‍या लोकांच्‍या अडचणी लक्षात घेवून त्‍यांचा गैरफायदा उचलण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. सर्वसामान्‍य लोकांना झटपट कर्ज देण्‍याचे अमिष दाखवून त्‍यांची फसवणूक करण्‍याचे प्रकार आजकाल सर्रासपणे घडतांना दिसून येत आहेत. त्‍यामुळे वेळीच सावधान होणे आवश्‍यक आहे.

असंख्‍य नागरिक असे असतात ज्‍यांना थोड्याफार पैशांची गरज भासत असल्‍यास ते झटपट पैसे कोठे मिळतील याचा पर्याय शोधत असतात, आता मार्केट मध्‍ये मोठ्या प्रमाणावर लोन अॅप आले आहेत, मात्र यातील खरे कोणते आणि खोटे किंवा बनावट कोणते याचा थांगपत्‍ता लवकर लागत नाही.

काही अॅप तर असे आहेत जे लोकांना कर्ज देतात खरे परंतू काही दिवसानंतर कर्ज फेडण्‍यासाठी ज्‍या प्रकारे त्‍यांना मानसिक त्रास दिला जातो, कर्जाचे व्‍याज वाढवले जाते, विविध प्रकारे त्रास दिला जातो ते पाहुन सर्वसामान्‍य नागरिक हतबल होवून जातो आणि वेगळाच मार्ग अवलंबितो.

अनेक फेक अॅप !

मार्केट मध्‍ये आलेले काही अॅप शासनाकडे किंवा आरबीआयकडे रजिस्‍टर्ड असू शकतात, परंतू असंख्‍य अॅप्‍स किंवा ऑनलाईन कंपन्‍या अशा आहेत ज्‍यांची नोंदच नाही, अशा प्रकारचे अॅप्‍स हे नागरिकांना कर्ज देण्‍याचे अमिष दाखवून त्‍यांची फसवणूक करत असल्‍याचे समोर आले आहे.

गोपनीय माहिती धोक्‍यात !

सदरील फेक अॅप लोकांना कर्ज देण्‍याचे अमिष दाखवतात, सर्व प्रथम ते अॅप मोबाईल मध्‍ये डाउनलोड करायला लावतात, अॅप डाउनलोड केल्‍यावर गॅलरी, कॉन्‍टॅक्‍ट आणि इतर अनेक प्रकारची परवानगी घेतात.

एकदा सदरील व्‍यक्‍तीने परवानगी दिली की, त्‍याची वैयक्तिक माहिती चोरतात, ज्‍यामध्‍ये गॅलरी मधील फोटो, सर्व कॉन्‍टॅक्‍ट व इतर माहिती ते पाहू शकतात. अर्थातच याचा गैरवापर होण्‍याची दाट शक्‍यता असते.

कर्जासाठी कागदपत्रे !

लोन अॅपवरून कर्ज घेण्‍यासाठी सदरील कंपन्‍या आधार, बँक पासबुक, फोटो व इतर माहिती अपलोड करण्‍यास सांगतात. आपली महत्‍वपूर्ण माहिती या लोन अॅपकडे जात असल्‍यामुळे भविष्‍यात आपली फसवणुक होण्‍याची शक्‍यता नाकारता येत नाही.

मानसिक त्रास !

मार्केट मध्‍ये विविध प्रकारचे अॅप आहेत कोणी गोपनीय माहिती गोळा करत आहे तर कोणी थोडेफार कर्ज देवून त्‍यावर भरमसाठ व्‍याज लावून लोकांची लुबाडणूक आणि फसवणुक करीत आहे. कर्जाचे हप्‍ते काही कारणास्‍तव भरण्‍यास उशीर झाल्‍यास त्‍याला मानसिक त्रास दिला जातो.

एवढंच नव्‍हे तर त्‍याच्‍या मोबाईल मध्‍ये सेव्‍ह असलेल्‍या लोकांना सुध्‍दा फोन करून त्रास देण्‍याचा प्रकार केला जातो. आजकाल फेक व्हिडीओ किंवा फोटो तयार करून त्‍या व्‍यक्‍तीला ब्‍लैकमेल करण्‍याचे प्रकार सुध्‍दा समोर येत आहेत. त्‍यामुळे अनेकजण मानसिक त्रास सहन न झाल्‍यामुळे टोकाचे पाऊल उचलतांना दिसत आहेत.

खबरदारी आवश्‍यक !

शक्‍यतो कोणत्‍याही प्रकारच्‍या लोन अॅपवरून कर्ज घेणे टाळले पाहिजे, कारण एकदा या लोन अॅपच्‍या जाळ्यात अडकल्‍यास माणूस अडचणीतून बाहेर येण्‍याऐवजी त्‍यात अडकतच जातो. त्‍यामुळे लोन अॅप विषयी योग्‍य ती माहिती असेल आणि खात्री असेल तरच पुढचा विचार करावा नसता या लोन अॅपच्‍या नादी न लागलेलं बरं.

फसवणुक झाल्‍यास !

ऑनलाईन किंवा मोबाईल अॅपद्वारे फसवणुक झाल्‍यास तात्‍काळ सायबर क्राईम पोलीसात किंवा पोलीस ठाण्‍यात तक्रार करावी, याबाबतची तक्रार आरबीआयकडे सुध्‍दा त्‍यांच्‍या वेबसाईटवरून ऑनलाईन करता येते.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!