Your Alt Text

कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील नागरिकांनो सोने खरेदी करतांना ही काळजी आवश्‍य घ्‍या, नसता होवू शकते फसवणूक !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
वर्षभरात वेळोवेळी माता भगीनींसह नागरिक सोने, चांदी अथवा दागिने खरेदी करत असतात. वर्षानुवर्षे महिला संबंधित दुकानदारांवरच विश्‍वास ठेवून सोने खरेदी करत असतात. अनेक दुकानदार या विश्‍वासाला पात्रही असतील. परंतू प्रत्‍येक दुकानदार नियमान्‍वये आणि योग्‍य त्‍या शुद्धतेचे सोने देत असेलच याची खात्री देणे थोडे अवघड होवून बसले आहे.

नागरिकांनी सोने जेथून घ्‍यायचे तेथून घ्‍यावे, परंतू सोने खरेदी करतांना काही काळजी घेणे आवश्‍यक आहे, जेणेकरून माता भगीनींची फसवणूक होणार नाही. कारण आजकाल सोने खरेदी केल्‍यावर अनेक तक्रारी ऐकायला मिळत आहेत. विशेष करून सोने खरेदी केल्‍यावर ते सोने किंवा दागिने इतरत्र दाखवल्‍यानंतर वेगळंच ऐकायला मिळत आहे. शिवाय शुद्धतेत फरक व पक्‍के बिल नसल्‍यामुळे अपेक्षित तेवढी किंमत सुध्‍दा येत नाही. त्‍यामुळे माता भगीनींसह नागरिकांचे नुकसान होवू शकते. नुकसान होवू नये म्‍हणून खालील मुद्यांच्‍या आधारे काळजी घेणे आवश्‍यक आहे.

हॉलमार्क पाहून घ्‍या !

सोन्‍याचे दागिने खरेदी करतांना हॉलमार्क असल्‍याची खात्री करा, कारण सोने अथवा दागिन्‍यावर BIS हॉलमार्क असणे हे सोन्‍याच्‍या शुद्धतेचे प्रतिक आहे. हॉलमार्कमुळे सोने अथवा दागिने किती कॅरेटचे आहे ते कळते, ज्‍या दागिन्‍यावर हॉलमार्क असते त्‍या दागिन्‍यावर हॉलमार्कच्‍या चिन्‍हासह क्रमांक असतो त्‍यामुळे सदरील सोने अथवा दागिने किती शुद्धतेचे आहे ते तुम्‍ही कोठेही चेक करू शकता. भारतामध्‍ये सोने अथवा दागिन्‍यावर हॉलमार्क असणे भारत सरकारने बंधनकारक केले आहे. हॉलमार्क नसलेले सोने खरेदी करणे म्‍हणजे स्‍वत:हून स्‍वत:चे नुकसान करून घेण्‍यासारखे होईल.

GST चे बील घ्‍या !

सोने, चांदी अथवा दागिने खरेदी करतांना GST चे बील देणे संबंधित दुकानदाराला बंधनकारक आहे. बील घेतांना त्‍यावर सोने किती कॅरेटचे आहे ? सोने अथवा दागिन्‍याचे वजन किती आहे ? मेकिंग चार्जेस किती आहे ? याची माहिती असावी. अनेकदा माता भगीनींसह नागरिकांना आपण घेत असलेले सोने अथवा दागिने 24 कॅरेटचे असल्‍याचे वाटते, परंतू सामान्‍यत: दागिने 18 ते 22 कॅरेट मध्‍ये बनवले जातात. जेवढे कॅरेट कमी तेवढा दर कमी असतो, मग ते सोने 24 कॅरेट असो, 22 कॅरेट असो किंवा 18 कॅरेट असो, म्‍हणजेच प्रत्‍येकाचे दर वेगळे असतात. त्‍यामुळे हजारो रूपयांचा फरक पडतो.

GST बील खरे की खोटे ?

सोने, चांदी अथवा दागिने खरेदी करतांना GST चे बील खरे की खोटे याची तुम्‍ही ऑनलाईन माहिती घेवू शकता. कारण बऱ्याचदा असेही होवू शकते की, कोणी साध्‍या पावतीवर फक्‍त नावाला GST क्रमांक टाकून देवू शकतात. त्‍यामुळे भविष्‍यात अडचण निर्माण होवू शकते. बिलच साधे असेल तर सोने तरी खरे आहे का ? उद्या गरज पडल्‍यास तुम्‍ही घेतलेले सोने तुमचेच आहे हे सिध्‍द कसे करणार ? कारण साध्‍या बिलाचा पुरावा कोण गृहीत धरणार ? याचाही विचार करणे आवश्‍यक आहे. त्‍यामुळे GST चे पक्‍के बिलच घ्‍या नसता अडचण येवू शकते.

GST चे बील का आवश्‍यक ?

कोणी तुम्‍हाला सांगत असेल की, साधे बील घेतले तर पैसे कमी लागतील आणि GST चे बील घेतल्‍यावर तुम्‍हाला जास्‍त पैसे द्यावे लागतील तर त्‍याकडे दुर्लक्ष करा. GST बिलाचीच मागणी करा. कारण तुम्‍ही जर साधे बील घेतल्‍यास जेव्‍हा कधी तुम्‍ही अडीअडचणीत ते सोने अथवा दागिने दुसरीकडे विक्री कराल तेव्‍हा तुम्‍हाला अडचण येईल, दुसऱ्या ठिकाणी तुमचे सोने घेतले जाणार नाही किंवा खूप कमी किंमतीत घेतले जाईल शिवाय सदरील सोने चोरीचे तर नाही ना असा संशय सुध्‍दा घेतला जावू शकतो. मात्र GST चे बील असल्‍यास भारतात तुम्‍ही कोठेही बिनधास्‍तपणे सोने विक्री करू शकता. शिवाय बॅंकेत सुध्‍दा सोने अथवा दागिने गहाण ठेवायचे असल्‍यास GST चे बील आवश्‍यक आहे नसता अडचण निर्माण होईल.

अनेकांना वेगळा अनुभव !

अनेक माता भगीनींना किंवा नागरिकांना साध्‍या पावतीवर घेतलेले सोने दुसऱ्या शहरात विक्री करतांना अडचण आल्‍याचे अनेकांनी सांगितले. साधी पावती दाखवल्‍यावर शहरात तसे सोने अथवा दागिने घेण्‍यास संबंधित दुकानदाराने नकार दिला आणि कारण विचारल्‍यास काहीही सांगू शकत नाही, तुम्‍ही जेथून घेतले त्‍यांनाच विका असे सांगण्‍यात आल्‍याचे नागरिकांनी सांगितले.

कोणीही भ्रमात राहू नये !

कोट्यावधी रूपयांचे सोने विना GST कोणी दुकानदार विक्री करत असेल तर ते नियमबाह्य आहे. GST च्‍या माध्‍यामतून शासनाकडे जमा होणारा पैसा हा परत जनतेच्‍या कल्‍याणासाठीच वापरला जातो. त्‍यामुळे दुकानदाराने GST सहित बील देणे व शासनाला GST ची रक्‍कम भरणे आवश्‍यक आहे. कारण कोट्यावधी रूपयांची कोणी विक्री करत असेल आणि संबंधित विभागात जीएसटी भरत नसेल तर मोठ्या प्रमाणावर ब्‍लॅक मनी जनरेट होत आहे असा त्‍याचा अर्थ होतो. त्‍यामुळे आपल्‍याकडे GST किंवा इनकम टॅक्‍स विभागाचे लक्ष नाही या भ्रमात कोणी राहू नये.

नियम व कायदे पायदळी तुडवून कोणी एखाद्या दलालास हाताशी धरून एखाद्या अधिकाऱ्याला मॅनेज केल्‍याचा भ्रम ठेवत असेल आणि काहीही होत नाही असा गैरसमज करत असेल तर ते स्‍वत:ची फसवणूक करत आहेत. कारण जेव्‍हा कायदा आपले काम करतो तेव्‍हा कचाट्यात सापडलेल्‍या कोणालाही सोडत नाही.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!