एल्गार न्यूज :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये कोणत्याही प्रकारची कर्ज प्रकरणे टाळली जात असून येणाऱ्या लोकांना परत पाठवले जात आहे, त्यामुळे शासकीय कर्ज योजनांचा लाभच मिळत नसेल तर या योजनांचं लोणचं घालायचं का ? असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत.
शासनाने सर्वसामान्य नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा, एका व्यक्तीच्या माध्यमातून इतरांनाही रोजगार उपलब्ध व्हावा, उद्योग, व्यवसाय वाढावेत, मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती व्हावी असा व्यापक दृष्टीकोण ठेवून विविध योजना सुरू केल्या आहेत.
योजनांकडे दुर्लक्ष !
सदरील योजनांमध्ये केंद्र सरकारची मुद्रा कर्ज योजना, जिल्हा उद्योग केंद्राची योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP), मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP), विविध महामंडळे जसे महात्मा फुले महामंडळ, चर्मकार महामंड, ओबीसी महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ यासह अनेक महामंडळे आहेत आणि अनेक योजना सुध्दा आहेत.
कोणत्याही योजनेसाठी एखादा गरजू व्यक्ती या बँकेत गेल्यास आधी तर त्याच्याशी नीट बोललेच जात नाही, त्याला ताटकळत उभे रहावे लागते, कसे बसे त्याने मॅनेजरला कर्ज प्रकरणा विषयी विचारले तर त्याला उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे भासवले जाते जणू सध्या कर्ज प्रकरणे बंद आहेत.
गरजू व्यक्ती हैराण !
एखाद्याने जर कर्जाची फाईल तयार करून नेलीच तर त्याच्या फाईल मध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात, त्याला एवढ्या चकरा मारायला लावतात की तो व्यक्ती हैराण होवून जातो आणि शेवटी कर्ज नकोच म्हणून त्या बँकेकडे जाणेच सोडून देतो.
शासन कितीही मोठ्या गप्पा हाणत असले तरी खाली असे अधिकारी किंवा शाखा कार्यरत असतील तर लोकांनी या कर्ज योजनांचं लोणचं घालायचं का ? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
उद्दिष्ट अपूर्णच !
ज्या अर्थी शासन किंवा वरिष्ठ बँक शाखेला कर्ज प्रकरणाची उद्दिष्ट देत असतात, त्या अर्थी बँकेनेही ती उद्दिष्ट पूर्ण करणे आवश्यक असते, परंतू सदरील शाखेत उद्दिष्टपूर्ती होत नसल्याचे दिसत आहे, विशेष म्हणजे वरिष्ठ सुध्दा या उद्दिष्ट पूर्तीची माहिती घेत नसल्याचे दिसत आहे.
किती कर्ज प्रकरणे झाली ?
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने आता पर्यंत किती कर्ज प्रकरणे मंजूर केली आहेत ? कोणत्या योजनेची कर्ज प्रकरणे केली मंजूर आहेत ? किती महामंडळाची प्रकरणे मंजूर केली आहेत ? जिल्हा समितीने दिलेले टार्गेट किती पूर्ण केले आहे ? हिम्मत असेल तर ही माहिती जाहीर करावी.
व्यापारीही त्रस्त !
बँक ऑफ महाराष्ट्र शाखेने सध्या त्यांची इमेज नकारात्मक करून ठेवली आहे, त्यामुळे व्यापारी सुध्दा या बँकेकडे फिरकत नसल्याचे चित्र आहे. कारण छोट्या व्यापाऱ्यांनाही वेळोवेळी कर्ज लागत असते, परंतू बँक कर्जच देत नसेल तर या बँकेत जायचे कशाला ? अशी प्रतिक्रिया व्यापारी बांधवांमधून येत आहे.
प्रतिसाद नसल्याने लोकांनी पाठ फिरवली !
बँक कर्जही देत नाही, शासकीय कर्ज प्रकरणेही मंजूर करत नाही, आलेल्या लोकांचे समाधानही करत नाही, लोकांनीच बँकेत येवू नये अशी परिस्थिती दिसत असल्यामुळे लोकांनीही बँकेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे, त्यामुळे सध्या बँकेची उलाढाल मंदावल्याचे दिसत आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.