एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
फुकट म्हटलं की, कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता किंवा कोणत्याही प्रकारची माहिती न घेता तात्काळ विश्वास ठेवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत, परंतू यामुळे त्या लोकांचे किती नुकसान होवू शकते याचा अंदाज सुध्दा ते बांधू शकत नाहीत.
व्हाट्सअॅप व इतर सोशल माध्यमांवर एक मॅसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे अर्थात लोक पुढे पुढे शेअर करत आहेत, (मॅसेज मराठी किंवा हिंदी कोणत्याही भाषेत असू शकतो) लोकं शेअर करत असलेल्या हिंदी मॅसेज मध्ये असे लिहीले आहे की, “अंबानी बर्थडे ऑफर Jio कंपनी अपने मालिक मुकेश अंबानी का जन्मदिन मनाने के लिए सभी भारतीय यूजर्स को 84 दिनों के लए 555 का मुफ्त रिचार्ज दे रही है | नीचे दिए गए नीले रंग के लिंक पर क्लिक करके अपना रिचाज करे ।” अशा प्रकारचा खोटा मॅसेज शेअर केला जात आहे.
मॅसेज बनावट !
सदरील मॅसेज अंबानी किंवा जिओ कंपनीकडून बनवण्यात आलेला नाही, हा मॅसेज पूर्णपणे खोटा आहे. हा मॅसेज ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांनी तयार केलेला असतो, मॅसेज मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या मोबाईल मधील सर्व माहिती त्या फसवणूक करणाऱ्यांकडे जाण्याची दाट शक्यता असते, तसेच लिंकवर क्लिक केल्यास रिचार्ज करण्यासाठी तुम्हाला तुमचा नंबर टाकून ओटीपी टाकण्यासाठी सांगितले जाते परंतू असे केल्यास फसवणूक करणारे तुमच्या बँक खात्यातून पैसे रिकामे करण्याचीही दाट शक्यता असते, कारण यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत.
थोडं डोकं वापरा !
एखादी कंपनी 10 रूपयाची जरी सूट देत असेल तर न्यूज चॅनेल किंवा वर्तमानपत्रात मोठमोठ्या कोट्यावधी रूपयाच्या जाहीरात करतात, मग 555 रूपये किंमतीचे 3 महिन्याचे रिचार्ज मोफत द्यायचे असल्यास किती जाहीराती केल्या असत्या, याचा थोडा तरी विचार करणे आवश्यक आहे.
लग्न असो किंवा वाढदिवस !
अंबानीचं वाढदिवस असो किंवा त्याच्या मुलाचं लग्न असो किंवा इतर काहीही कार्यक्रम असो, अंबानी 555 रूपयाचं 3 महिन्याचं रिचार्ज तुम्हाला का देईल ? यामध्ये त्याचा काय फायदा ? एवढी मोठी संपत्ती त्याने समाजसेवा करण्यासाठी गोळा केलेली नाही, जर तसं असतं तर त्याने आतापर्यंत महाराष्ट्रात मोठमोठे शाळा, कॉलेज, दवाखाने मोफत सुरू करून सेवा केली असती.
खाजगी कंपन्यांकडून फुकटची अपेक्षा सोडा !
कोणतीही खाजगी कंपनी तुम्हाला कोट्यावधी रूपयांचे रिचार्ज फुकट द्यायला रिकामी नाही, उलट अनेक कंपन्या त्यांनी घेतलेले हजारो कोटींचे कर्ज सरकारकडून माफ करून घ्यायला बसले आहेत. त्यामुळे किमान खाजगी कंपन्यांकडून काही फुकट मिळेल ही मानसिकता सोडून द्या. नाहीतर फसवणूक करणाऱ्यांच्या नादी लागून आहे ते गमावून बसाल.
लिंकला क्लिक करू नका !
कोणत्याही प्रकारच्या रिचार्जचा मॅसेज असो, मोफत योजनेचा मॅसेज असो, मोबाईलवर तात्काळ कर्ज देण्याबाबतचा मॅसेज असो, लाखाची वस्तू 10 हजारात घ्या असे सांगणारा मॅसेज असो किंवा इतर कोणत्याही प्रकारचा भुलथापा मारणारा किंवा अमिष दाखवणारा मॅसेज असो त्याच्यावर तात्काळ विश्वास ठेवून लिंकला क्लिक करू नका, नसता तुमच्या मोबाईल मधील माहिती सायबर गुन्हेगारांकडे जाईल, तुमचा मोबाईल सुध्दा हॅक होवू शकतो. तसेच तुमच्या बँक खात्याला तुमचा मोबाईल नंबर लिंक असल्यामुळे तुमच्या खात्यातील रक्कम ऑनलाईन लंपास होवू शकते, त्यामुळे खबरदारी घ्या.
बनावट लिंकचा बाजार !
तुम्हाला मॅसेज मध्ये जी लिंक दिसते तशी लिंक बनवणे फसवणूक करणाऱ्यांसाठी काही मोठी गोष्ट नाही, आजकाल असे कमी व्हॅल्यूचे एक्सटेंशन डोमेन मोफत किंवा चार पाचशे रूपयात सहज मिळतात, त्यामुळे एक नव्हे तर असंख्य लिंक तयार करता येतात, फसवणूक करणारे एकावरच थांबत नाहीत तर ते विविध प्रकारचे फसवणूक करणारे मॅसेज बनवतात आणि शेअर करत असतात आणि लोक त्यांच्या फसवणूकीला बळी पडतात.
त्यामुळे फुकटचे अमिष दाखवणाऱ्या लिंकला क्लिक करू नका आणि असे मॅसेज मुळीच पुढे शेअर करू नका. जमलंच तर छोट्या मोठ्या व्यवसायाच्या माध्यमातून स्वत:ची प्रगती करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून 555 चा रिचार्ज नव्हे तर 50 हजाराची वस्तू सुध्दा पैसे देवनू घ्यायला तुम्हाला काही वाटणार नाही.
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज (जालना)
जमलंच तर ही बातमी पुढे शेअर करा जेणेकरून कोणाची फसवणूक होणार नाही…
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.