Your Alt Text

एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांना अप्रत्‍यक्ष धमकावण्‍याचा प्रयत्‍न ! “त्‍या” प्‍लॉटिंगवाल्‍यांनी आणि 2 नंबरवाल्‍यांनी नादी लागू नये, नसता कायद्याने त्‍यांची चांगलीच अद्दल घडेल !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
काही लोकांना गैरमार्गाने जमा झालेल्‍या पैशांचा एवढा माज चढलाय की ते आता दुसऱ्यांच्‍या माध्‍यमातून एल्‍गार न्‍यूजच्‍या संपादकांना अप्रत्‍यक्ष धमकवण्‍याचा आणि दबाव आणण्‍याचा केवीलवाणा प्रयत्‍न करत आहेत. परंतू त्‍यांना हे माहित नाही की, त्‍यांनी जास्‍त नाटकं केली तर त्‍यांचा हा माज त्‍यांच्‍याच अंगलट येवून तेल ही गेलं अन तुप ही गेलं… अशी अवस्‍था होवून जाईल.

प्रकरण काय ?

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍यांसाठी एल्‍गार न्‍यूज घनसावंगी तालुक्‍यासह जालना जिल्‍ह्यात प्रसिध्‍द आहे. मागील काही कालावधी पासून एल्‍गार न्‍यूजच्‍या माध्‍यमातून विशेष करून कुंभार पिंपळगांव परिसरासह घनसावंगी तालुक्‍यातील विविध विषयांवरील रोखठोक बातम्‍या घेण्‍यात आल्‍या. ज्‍यामध्‍ये पाडूळी खु. शिवारातील बेकायदेशीर प्‍लॉटिंग व कुंभार पिंपळगांव परिसरातील अवैध धंद्यांचा समावेश आहे. सदरील बातम्‍यांमुळे प्रशासनाकडून चौकशी सुध्‍दा सुरू आहे तर काही प्रकरणात कारवाई सुध्‍दा होत आहे.

हीच बाब लक्षात घेवून प्‍लॉटींगवाल्‍यांपैकी कोणीतरी एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांच्‍या नातेवाईकांना अप्रत्‍यक्ष धमकावण्‍याचा व दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केला आहे. नातेवाईक थेटपणे काही सांगत नसले तरी परवेज पठाण (संपादक) यांना समजावून सांगा, प्‍लॉटींगवाले अथवा अवैध धंदे करणाऱ्यांविषयी बातम्‍या घेतल्‍या तर ते अडचणीत येवू शकतात, ते कोणाविषयीही बातम्‍या घेण्‍यास मागेपुढे पाहत नसल्‍यामुळे त्‍यांना धोका होवू शकतो, आम्‍ही तुमच्‍याकडे पाहून शांत आहोत, नसता आम्‍ही शांत बसलो नसतो, अशा प्रकारच्‍या पोकळ धमक्‍या देवून दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न करत आहेत. अर्थातच समोर येवून थेटपणे बोलण्‍याची त्‍यांची हिंमत नाही.

नातेवाईकांनी थेटपणे कोणाचे नाव सांगितले नसले तरी ही बांडगुळं कोण आहेत याचा अंदाज संपादक (परवेज पठाण) यांना नक्‍कीच आहे. एल्‍गार न्‍यूजचे स्‍पष्‍ट म्‍हणणे आहे की, “त्‍या” प्‍लॉटिंगवाल्‍यांनी आणि 2 नंबरवाल्‍यांनी नादी लागू नये, नसता कायद्याने त्‍यांची चांगलीच अद्दल घडेल !

यापूर्वीही प्रयत्‍न !

एल्‍गार न्‍यूजच्‍या बातमीमुळे बुडाला आग लागलेल्‍या काही बेकायदेशीर प्‍लॉटिंग व अवैध धंदे करणाऱ्यांनी अथवा चुकीचे काम करणाऱ्यांनी काही महिन्‍यांपूर्वी अशाच प्रकारे इतरांकडे पोकळ भाषा वापरून अप्रत्‍यक्ष धमकावण्‍याचा व दबाव आणण्‍याचा तसेच भिती दाखवण्‍याचा प्रयत्‍न केला होता. त्‍यावेळेसही एल्‍गार न्‍यूज ने त्‍यांना लेखणीतून सडेतोड उत्‍तर दिले होते.

लोकशाहीचा विसर !

प्‍लॉटिंगवाले आणि अवैध धंदे करणाऱ्यांना कदाचित लोकशाहीचा विसर पडलेला दिसत आहे. कदाचित लोकशाहीच्‍या चौथ्‍या स्‍तंभाची ताकद आणि पत्रकारांची एकी काय असते याचा विसर त्‍यांना पडला असावा. कदाचित एखाद्या बोगस किंवा तोतया पत्रकाराशी यांचा संबंध आला असावा आणि इतरही असेच असतील असा त्‍यांचा गैरसमज झाला असावा, त्‍यामुळे स्‍वाभिमानी आणि रोखठोक पत्रकार काय असतात याचा अंदाज त्‍यांना नसावा.

रोखठोक पत्रकारिता !

दुसऱ्याच्‍या माध्‍यमातून धमकावण्‍याचा आणि दबाव आणण्‍याचा केविलवाणा प्रयत्‍न काहीजण करत आहेत, मात्र त्‍यांना हे माहित नाही की, एल्‍गार न्‍यूजला सुरू होवून फक्‍त 8 महिने झाले असले तरी पत्रकारितेची पदवी घेतल्‍यानंतर मागील 15 वर्षांचा सडेतोड लेखणीचा अनुभव एल्‍गार न्‍यूज सोबत आहे. अर्थातच मागील 15 वर्ष पत्रकारितेत संपादक काही गोट्या खेळत बसलेले नाहीत. त्‍यामुळे साम-दाम-दंड भेद या भानगडीत त्‍यांनी पडू नये.

कोणाचा आशिर्वाद ?

बेकायदेशीर प्‍लॉटिंगवाले असो किंवा अवैध धंदे करणारे असो, आमच्‍या डोक्‍यावर मोठ्या नेत्‍याचा हात असल्‍याचे ते इतरांकडे सांगत आहेत, मात्र बेकायदेशीर प्‍लॉटिंगला किंवा अवैध धंद्यांना खरंच एखाद्या मोठ्या नेत्‍याचा आशिर्वाद आहे का ? असेल तर अशा बेकायदेशीर गोष्‍टीला कोणत्‍या नेत्‍याचा आशिर्वाद आहे ? कदाचित एखाद्या सन्‍माननीय नेत्‍याच्‍या नावाचा गैरवापर हे लोक करत तर नाही ना ? याचीही शक्‍यता नाकारता येत नाही.

जनतेशी बांधिलकी !

सर्वसामान्‍य जनतेचे हित लक्षात घेवूनच एल्‍गार न्‍यूज मध्‍ये बातम्‍या प्रकाशित केल्‍या जातात. जाहिरातचा विषय सोडला तर आम्‍ही कोणाचेही एक पैशाचेही मिंधे नाहीत. त्‍यामुळे कोणासमोरही मान खाली घालुन बोलण्‍याची वेळ आमच्‍यावर आत्‍तापर्यंत आलेली नाही. संपादकांकडे गमवण्‍यासारखे काहीही नाही, त्‍यामुळे कशाचीही भिती नाही. अर्थातच ताठ मानेने आणि स्‍वाभिमानाने लिहायला आम्‍हाला अडचण नाही.

विश्‍वासार्ह बातम्‍या !

एल्‍गार न्‍यूज मध्‍ये बातम्‍या ह्या सार्वजनिक व जनहिताच्‍या असतात, बातम्‍या घेतांना योग्‍य ती माहिती घेवून व तथ्‍य तपासूनच प्रकाशित केल्‍या जातात, बातम्‍या घेतांना अपवाद सोडल्‍यास शक्‍यतो कोणावरही वैयक्तिक टीका करणे टाळले जाते. परंतू म्‍हणतात ना जिथे आग लागलेली असते तिथूनच धूर निघत असतो, तसाच काही हा प्रकार आहे.

एखादा व्‍यक्‍ती बातमीशी सहमत नसेल तर तो त्‍याची बाजू एल्‍गार न्‍यूजकडे मांडू शकतो. कारण आपण लोकशाही मध्‍ये जगत आहोत. परंतू धमकावण्‍याचा किंवा दबाव आणण्‍याचा कोणी प्रयत्‍न करत असेल तर त्‍याला लेखणीच्‍या माध्‍यमातून सडेतोड उत्‍तर दिले जाईल आणि आवश्‍यकता असेल तर कायदेशीर मार्गाचाही अवलंब करावा लागेल.

भिती दाखवण्‍याचा प्रयत्‍न !

बेकायदेशीर प्‍लॉटिंग करणारे व अवैध धंदे करणारे किंवा चुकीचे काम करणाऱ्या लोकांपैकी कोणीतरी नातेवाईक मित्रांकडे खोट्या गुन्‍ह्यात अडकवण्‍याची अप्रत्‍यक्ष भिती सुध्‍दा दाखवल्‍याचे कळते, जे लोक ही भाषा वापरत आहेत त्‍यांना स्‍पष्‍ट सांगणे आहे की, तुम्‍ही खोट्या गुन्‍ह्यात अडकवाच, दुसऱ्यांचे सांगत नाही पण संपादक स्‍वत:हून जामीन पण घेणार नाही. राहीला प्रश्‍न एखाद्या अशा गुन्‍ह्यात अडकवण्‍याचा की ज्‍याच्‍यात लवकर जामीन होत नाही तर त्‍यासाठी खुशाल जेल मध्‍ये जावून बसायलाही संपादकाला काहीच अडचण नाही आणि भितीचा तर प्रश्‍नच नाही.

जळत्‍या आगीत हात !

मागील 15 वर्षात घर जाळून कोळशे करून पत्रकारिता केल्‍यानंतर एल्‍गार न्‍यूजचे संपादक हे छोटामोठा व्‍यवसाय करून आपला प्रपंच चालवतात. समाजसेवेचं माध्‍यम म्‍हणून पत्रकारितेला काही वेळ दिला जातो, परंतू बातमीमुळे कोणी नातेवाईक अथवा कुटुंबातील कोण्‍या व्‍यक्‍तीला धमकावण्‍याच्‍या उद्देशाने दबाव टाकून अस्‍वस्‍थ करण्‍याचा प्रयत्‍न करत असेल तर व्‍यवसाय गेला चुलीत, फुल टाईम पत्रकारिता करून हात धुवून मागे लागायलाही संपादक कमी करणार नाही.

संपादक हे झोपेतून उठून आत्‍ता पत्रकार झालेले नाहीत. 15 वर्षांच्‍या पत्रकारितेत भल्‍या भल्‍यांची भिती बाळगली नाही तर तुम्‍ही कोण ? त्‍यामुळे पुन्‍हा या लोकांना एवढेच सांगणे आहे की, पुढील वेळेस प्रत्‍यक्ष तर सोडाच अप्रत्‍यक्ष सुध्‍दा कोणी धमकावण्‍याचा अथवा दबाव आणण्‍याचा प्रयत्‍न केल्‍यास, प्‍लॉटिंग असो किंवा अवैध धंदे असो, कायद्यान्‍वये बुडापासून शेंड्यापर्यंत कार्यक्रम लावण्‍यात येईल आणि तेव्‍हा तुम्‍हाला पश्‍चाताप करण्‍यापलीकडे काहीही करता येणार नाही. राहीला प्रश्‍न तुम्‍हाला आशिर्वाद असणाऱ्या कार्यालयाचा तर त्‍यांच्‍या बद्दलही कायद्यान्‍वये योग्‍य तो विचार करून ठेवलाच आहे.

संपादकांना पाठिंबा !

बेकायदेशीर प्‍लॉटिंग अथवा अवैध धंदे करणाऱ्या लोकांकडून अप्रत्‍यक्षपणे धमक्‍या आणि दबाव टाकणाऱ्यांवर परिसरातील सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी, संघटनांनी, सामाजिक कार्यकर्त्‍यांनी, आणि राज्‍यातील असंख्‍य पत्रकार बांधवांनी तिव्र शब्‍दांत टिका केली असून एल्‍गार न्‍यूजचे संपादक परवेज पठाण यांना पाठिंबा दर्शवला आहे, शिवाय आम्‍ही आपल्‍या सोबत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!