एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
गोरगरीब व सर्वसामान्य प्रवाशांची चोरट्यांकडून वारंवार लूट होत असेल आणि चोरट्यांवर कुठलीच कारवाई होत नसेल तर या चोरट्यांना पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद आहे का ? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानकात दि.9 रोजी सकाळी 7 ते 7.20 च्या दरम्यान छत्रपती संभाजीनगर ते गुंज या बस मध्ये प्रवाशी चढत असतांना प्रचंड गर्दीचा फायदा घेवून एका चोरट्याने एका वयस्कर व्यक्तीच्या खिशातून मोबाईल (Android Screen touch) चोरी करण्याचा प्रयत्न केला.
चोरट्याने सदरील प्रवाशाच्या वरच्या खिशातून मोबाईल वर काढला सुध्दा, परंतू वेळीच सदरील प्रवाशाने चोरट्याचा हात धरला आणि चोरट्याने मोबाईल सोडून मागच्या साईडला पुजा पुजा या नावाने ओरडत पळ काढला, तेवढ्या गर्दीत काही प्रवाशांनी त्याच्या मागे जाण्याचा प्रयत्न केला, परंतू अवघ्या काही सेकंदात तो चोरटा गायब झाला.
CCTV सुरू असेल तर !
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानकातील CCTV कॅमेरे सुरू असतील तर पोलीस प्रशासनाने सकाळी 7 ते 7.20 च्या दरम्यानचे फुटेज तपासावे, सदरील छत्रपती संभाजीनगर – गुंज ही बस फलाट क्र. 1 किंवा सुलभ शौचालय ज्या बाजूस आहे त्या समोरील बाजूस उभी होती. सदरील चोरटा सडपातळ असून चोरट्याचे वय अंदाजे 25 वर्षे असेल, शिवाय डोक्यावर वाढलेले केस आणि पाठीवर एक काळा बॅग होता. पोलीसांनी सदरील वेळेतील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यास चोरट्याचा तपास लागू शकतो.
याआधीही असेच प्रकार ?
छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानकात नेहमी मोबाईल चोरी, पॉकेट चोरी किंवा खिशातून पैसे चोरी व इतर महागड्या वस्तुंची चोरी होत असल्याचे येथील प्रवाशांनी सांगितले, शिवाय सदरील चोरटे कोण आहेत हे पोलीस प्रशासनाला माहित असून सुध्दा पोलीस कारवाई करत नाही असा आरोपही प्रवाशांनी केला. जर स्थानिक पोलीस प्रशासनाचा खरंच या चोरट्यांना आशिर्वाद असेल तर ही बाब नक्कीच गंभीर असून वरिष्ठांनी तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
राजधानी बदनाम होत आहे ?
मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये अशा प्रकारे प्रवाशांची लूट होत असेल तर हे शोभनीय नाही. या ठिकाणी मराठवाड्यासह राज्यभरातून प्रवाशी येत असतात. शैक्षणिक, सांस्कृतिक, औद्योगिक, आरोग्यसेवा यासह विविध कारणांसाठी प्रवाशी छत्रपती संभाजीनगर मध्ये येत असतात, अशा प्रकारे त्यांची लूट होत असेल तर हे नक्कीच गंभीर बाब आहे. विशेष म्हणजे जागतिक पातळीवर नाव असलेल्या या शहरात विदेशी पर्यटक सुध्दा येत असतात, मात्र अशा प्रकारच्या घटना घडणार असतील तर आपण त्यांना काय संदेश देण्याचा प्रयत्न करत आहोत याचाही विचार स्थानिक पोलीस प्रशासनाने करावा अशी प्रतिक्रियाही नागरिकांनी दिली आहे.
जालना – अंबड मध्येही घटना ?
चोरट्यांकडून चोरीचा प्रकार फक्त छत्रपती संभाजीनगर येथेच सुरू नाही तर जालना बस स्थानक, अंबड बस स्थानक येथे सुध्दा सुरू असल्याचे प्रवाशांनी सांगितले. चोरट्यांकडून वारंवार मोबाईल चोरी, पाकीट किंवा खिशातून पैसे चोरी व इतर वस्तुंची चोरी करण्याचे प्रकार घडत आहेत, मात्र स्थानिक पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे.
जर पोलीस प्रशासनाचा या चोरट्यांना आशिर्वाद नाही तर मग बस स्थानकात चोरीच्या घटना घडतात कशा ? असा सवालही प्रवाशी उपस्थित करत आहेत. एकतर चोरीच्या घटना घडल्यानंतर कोणत्याही प्रकारे तपास होत नाही किंवा चोरी झालेली वस्तू परत मिळत नाही असा नागरिकांचा अनुभव आहे त्यामुळे शक्यतो अनेकजण पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे टाळतात, मात्र स्थानिक पोलीसांनी गांभीर्याने या प्रकरणांचा तपास करून चोरट्यांवर कारवाई केल्यास नागरिकही तक्रार करण्यास समोर येतील अशी प्रतिक्रियाही प्रवाशी व नागरिकांनी दिली आहे.
गर्दीचा फायदा घेवून चोरी !
अनेक मार्ग असे आहेत ज्या मार्गावर बसेसची संख्या कमी आहे, अशावेळी बस स्थानकात बस आल्याबरोबर दारा समोर प्रचंड गर्दी होते, सदरील चोरटे हे गर्दीचा फायदा घेवून गर्दीत घुसतात आणि हातचालाखिने मोबाईल, पैसे व इतर वस्तुंची चोरी करून गायब होवून जातात. चोरी गेलेला मोबाईल, पैसे किंवा वस्तू शक्यतो परत मिळत नसल्याचा अनुभव येत असल्याने शिवाय पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने नागरिक हतबल होत आहेत.
नागरिकांना नाहक भुर्दंड !
साधारण किंवा मध्यम प्रकारचा Android मोबाईल घ्यायचा म्हटले तरी सामान्यत: 15 ते 20 हजार रूपये किंमत आहे. एखाद्या नागरिकाचा 20 हजाराचा मोबाईल चोरीला गेल्यास त्याचे हे 20 हजार तर नुकसान होतच आहे शिवाय पुन्हा नवीन 20 हजाराचा मोबाईल घ्यायचा म्हटलं तर त्या नागरिकाला एकूण 40 हजारचा भुर्दंड विनाकारण सोसावा लागत आहे. त्यामुळे गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांच्या आर्थिक अडचणींचा विचार करून वरिष्ठांसह पोलीस प्रशासनाने या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी प्रवाशी व नागरिकांमधून होत आहे.