एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मागील काळात एक गाणे आले होते की, मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. कदाचित या गाण्याचाही काही प्रभाव काही उमेदवारांवर पडला असावा. 10-20 लोकांनी हरभऱ्याच्या झाडावर काय चढवलं की तो व्यक्ती अचानक निवडणूक लढवायचीच याच आवेशात गुडघ्याला बाशिंग बांधून तयार झाल्याचे ठिकठिकाणी पहायला मिळत आहे.
सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. एक से बढकर एक मातब्बर नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील मंडळी अथवा नागरिक निवडणूक लढवित आहेत. लोकशाही मध्ये नियमान्वये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार असल्याने कोणीही फॉर्म भरू शकतो. त्यात काही गैर नाही, अर्थातच त्यामुळे प्रत्येक विधानसभा मतदारसंघात अनेकांनी फॉर्म भरले आहेत.
उमेदवारांची गर्दी !
सध्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मोठ्या संख्येने उमेदवारांनी फॉर्म दाखल केले आहेत, त्यातील काही जण 4 तारखेला फॉर्म काढतीलही, परंतू त्यातील अनेकजण असे आहेत की त्यांना मनोमन स्वप्न पडत असतं की, आपल्यामागे मोठ्या संख्येने (100-200) लोकं आहेत म्हणजे आपण विधानसभा निवडणूक जिंकूच शकतो.
प्रत्येक विधानसभा मतदारसंघात मतदारांची संख्या ही 3 लाखांच्या पुढे असते. मग अशावेळी आपण विधानसभेची निवडणूक लढवित आहोत ग्रामपंचायतची नाही ! याचे भान काही उमेदवारांना राहत नाही का ? असाही प्रश्न उपस्थित होतो. स्वत:ला आजमावणे काही चुकीचे नाही, परंतू आपले कार्य काय ? आपले समाजासाठी योगदान काय ? आपण किती वर्षे समाजासाठी झटलो आहोत ? आपण याआधी कोणती निवडणूक जिंकलो आहोत ? याआधीच्या निवडणुकीत आपल्याला किती मतं पडली आहेत ? आपल्याला 50 हजाराच्या पुढे मतदान पडू शकते का ? आपली लोकप्रियता किती आहे ? सोशल मिडीयावर काही लाईक मिळाले म्हणजे निवडणूक जिंकली असे होते का ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे संबंधित उमेदवारांनी स्वत:ला विचारणे आवश्यक आहे.
इतरांचे नुकसान !
ज्या उमेदवाराने फॉर्म भरला आहे त्याच्या मागे जनतेचे पाठबळ असेल, त्याला माननारा वर्ग प्रचंड मोठा असेल, त्याचे समाजकार्य तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात परिचित असेल, त्याच्या शब्दाला किंमत असेल आणि निवडणुकीत आवश्यक असलेल्या अर्थपूर्ण गोष्टी त्याच्याकडे असतील तर त्याने निवडणूक लढवायला हरकत नाही. परंतू जो व्यक्ती ग्रामपंचायतला सुध्दा निवडून येवू शकत नाही अशा व्यक्तींनी आमदारकी लढणे म्हणजे इतर चांगल्या उमेदवारांचे नुकसान करण्यासारखे आहे.
मागील काळात अशी अनेक उदाहरणे आहेत की, ज्यामध्ये चांगल्या, सामजिक बांधितलकी जपणाऱ्या आणि सर्वांगिण विकास करण्याची धमक असणाऱ्या उमेदवारांना अवघ्या काही मतांनी पराभवाला सामोरे जावे लागले आहे. ज्याला आमदार व्हायची इच्छा आहे त्याने किमान काही वर्षे तन-मन-धन लावून मतदारसंघात मेहनत घेतली, लोकांची कामे केली, अडीअडचणीत साथ दिली, व्यापक भुमिका घेवून मतदारसंघातील जनतेसाठी सतत प्रयत्नशील राहिलेत तर नक्कीच जनता त्याचा विचार करू शकते, परंतू आपले कर्तृत्व काहीच नसेल तरीही गुडघ्याला बाशिंग बांधून रिंगणात उतरणार असतील तर त्याला काय म्हणावे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. किमान डिपॉझिट जप्त होणार नाही इतपत तरी काळजी घ्यावी असेही गुपचुपपणे त्या उमेदवाराला जवळची माणसं सांगत असतील.
कार्यकर्ते सांभाळायचे कसे ?
निवडणुकीत पैसे लागत नाही असे कोणी म्हणत असेल तर ते हास्यास्पद आहे. प्राप्त माहितीनुसार निवडणूक आयोगाने 40 लाख खर्चाची मर्यादा घालून दिली आहे. याचाच अर्थ निवडणूक आयोगालाही किमान किती खर्च लागू शकतो याचा अंदाज आहे. जेव्हा एखादा उतावीळ आणि जनतेचे पाठबळ नसलेला उमेदवार निवडणूक लढवित असतो, तेव्हा त्याला ते 100-200 कार्यकर्ते सांभाळतांना आणि प्रचार करतांना किती खर्च करावे लागले आणि त्यासाठी काय काय विकावे लागले हे निवडणूक संपल्यावर विचारल्यास सगळं लक्षात येईल.
फॉर्म भरल्यावर !
जनतेचे पाठबळ नसलेल्या ज्या इच्छुक उमेदवारांना निवडणुका लागण्याच्या आधीपासूनच “आमदार झाल्यासारखं वाटतं” असे स्वप्न पडत होते, त्यातील अनेकांनी विधानसभेसाठी फॉर्म भरले खरे, परंतू प्रचंड उत्साहाच्या भरात त्याने फॉर्म भरला कसा बसा ! पण लोकं विचारू राहिलेत अबे निवडून येणार कसा ? अशीच काही अवस्था अनेक उमेदवारांची झाली आहे किंवा होणार आहे असं म्हणायला हरकत नाही.
मग उभा कशाला राहिलास !
जेव्हा जनतेचं पाठबळ नसलेला एखादा उमेदवार उभा राहतो तेव्हा त्याचे मित्र सर्व बाजू समजून त्याला विचारत असतील की अबे तू जिंकणार कसा ? तेव्हा तो उमेदवार म्हणत असेल मी कुठं म्हटलंय की मी जिंकणारच आहे, तेव्हा मित्र म्हणत असतील मग कशाला उभा राहिलास ? तेव्हा उमेदवार म्हणत असेल की निवडणूक संपल्यावर तुला सांगतो की भानगड काय ? अर्थातच अनेक ठिकाणी कुणाचा तरी कार्यक्रम करण्यासाठी अनेक उमेदवार उभे केले जातात असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.