एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील मोलमजूरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारे चांद पठाण यांच्या ४ वर्षांच्या हस्नैन या मुलाला कॅन्सर (कर्करोग) झाला असून शासनाच्या योजने व्यतिरिक्त लागणाऱ्या औषधोपचारासाठी त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे.
मुंबई येथे उपचार !
सदरील ४ वर्षाच्या हस्नैन या मुलाला ब्लड कॅन्सर झाला असून त्याचा उपचार मागील ९ महिन्यांपासून मुंबई येथील टाटा हॉस्पिटल येथे सुरू आहे. आतापर्यंत शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून या मुलावर लाखो रूपये खर्च झाला आहे. मात्र आता बाहेरील औषधांचा खर्च मुलाच्या वडीलांच्या आवाक्याबाहेर गेला आहे. कॅन्सरच्या गोळ्या व औषधांचा खर्च इतर आजारांच्या तुलनेत खूप महाग असल्याने मुलाचे वडील चांद पठाण हे हतबल झाले आहेत.
मुलाचे वडील चांद पठाण यांची घरची अत्यंत गरीब परिस्थिती असून आतापर्यंत त्यांनी बाहेरील शक्य तो खर्च केला आहे, मात्र त्यांना आता उपचाराचा खर्च करणे आवाक्याबाहेर गेले आहे. सदरील दवाखान्यात मुलाचे उपचार सुरू असले तरी बाहेरून लागणारा महागड्या औषधांचा व उपचाराचा खर्च जास्त येत असल्यामुळे त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे.
समाजातील नागरिकांनी ४ वर्षाच्या हस्नैन या मुलाच्या उपचारासाठी सढळ हाताने मदत करावी असे आवाहन कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांनी केले आहे. जालना जिल्ह्यासह राज्यातील नागरिकांनी मदतीसाठी कॅन्सरग्रस्त हस्नैन चे वडील चांद पठाण यांच्या फोन पे क्रमांक 9970267960 या क्रमांकावर मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
Phone Pe Number : 9970267960
कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या मुलासाठी आपण सर्वांनी मदतीचा हात पुढे करायला हवा. आपल्या छोट्याशा योगदानाने त्याचे जीवन प्रकाशमय होऊ शकते.
कुंभार पिंपळगांवात मदत फेरी
सदरील आजारी असलेल्या हस्नैन या मुलाच्या उपचारासाठी दि.१८ जून २०२५ बुधवार रोजी कुंभार पिंपळगांव येथे सर्व धर्मीय समाजाच्या वतीने मदत फेरी काढण्यात येणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मदत करावी तसेच कुंभार पिंपळगांवसह परिसरातील व बाजारात येणाऱ्या सर्व नागरिकांनी या मदत फेरीच्या बॉक्स मध्ये शक्य ती मदत करून सहकार्य करावे असे आवाहन स्थानिक सर्व समाज बांधवांच्या वतीने करण्यात आले आहे.