एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासनाच्या महसूल विभागाने ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेचे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असून मंडळ स्तरावर शिबीराचे आयोजन करून नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहेत.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाच्या महसूल विभागांतर्गत क्षेत्रिय स्तरावर ग्रामिण भागात सर्वसामान्य जनता, शेतकरी, विद्यार्थी व महिला यांचे महसूल विभागांशी संबंधित दैनंदिन प्रश्नांचे निराकरण करणे व जनतेच्या तक्रारी सत्वर निकाली काढणे, तसेच महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हयातील तालुक्यामध्ये मंडळ स्तरावर 7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान” टप्पा 1 आयोजित करण्यात येणार आहे.
या कालावधीत आयोजित शिबीरादरम्यान प्रत्येक गावातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असे निर्देश छत्रपती संभाजी नगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी दिले. दि. 04 मार्च 2026 रोजी विभागीय आयुक्त छत्रपती संभाजी नगर विभाग जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जालना जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसंरपंच यांची छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीराबाबत आयोजित दुरभाष्य परिषदेत मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
या दुरभाष्य परिषदेस जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद जालना शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत, सर्व गटविकास अधिकारी यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलतांना विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर म्हणाले की, प्रत्येक गावातील नागरिकांच्या महसूल व इतर शासकीय योजनांशी संबंधित प्रलंबित समस्या या शिबिरांच्या माध्यमातून तात्काळ सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी संबंधित गावातील नागरिकांनी आपल्या प्रलंबित समस्या, अडचणी, तक्रारी ह्या मंडळ अधिकारी यांच्याकडे देणे बंधनकारक राहील. संबंधित मंडळात ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीरांचे आयोजन केले जाणार आहे त्या दिवशी संबंधित विभागाचे अधिकारी या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच या शिबीरा दरम्यान महाराष्ट्र शासनाकडून नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी व शासकीय योजना सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच लोकाभिमुख प्रशासनासाठी निर्गमित करण्यात आलेले शासन निर्णय व योजनांची माहिती नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी.
जिल्हाधिकारी यांचे आवाहन
जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले की, जालना जिल्ह्यात एकूण 65 ठिकाणी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर” आयोजित करण्यात येणार असून मंडळ स्तरावर या शिबिरांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक शिबिरात महसूल, ग्रामविकास, पंचायत राज, सामाजिक न्याय, कृषी, आरोग्य आदी विभागांचे अधिकारी उपस्थित राहून नागरिकांच्या अर्जांची तत्काळ दखल घेतील.
7 मार्च ते 15 मे 2026 या कालावधीत मंडळ व नगर परिषद/नगर पंचायत स्तरावर राबविण्यात येणार असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढणे हा प्रमुख उद्देश आहे. प्रत्येक तालुक्यात एकदिवसीय समाधान शिबिरे आयोजित करून प्रलंबित फेरफार, 7/12 दुरुस्ती, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्रे यांसारख्या सेवा ‘सिंगल डे सर्व्हिस डिलिव्हरी’ तत्त्वावर देण्यात याव्यात, असे त्यांनी निर्देशित केले.
अभियानाच्या पूर्वतयारीत गावनिहाय प्रलंबित प्रकरणांची यादी तयार करून शिबिरापूर्वी आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. ७/१२ व ८अ उताऱ्यांचे अद्ययावतीकरण, डिजिटल ७/१२ ची जनजागृती, तसेच एकवेळच्या अधिमूल्य भरणा पद्धतीबाबत नागरिकांना मार्गदर्शन करावे. तुकडेबंदी कायद्याशी संबंधित प्रकरणे, संपादन व अकृषी परवानगी नोंदींची अद्ययावत माहिती शिबिरात उपलब्ध करून द्यावी, असेही त्यांनी सांगितले. तसेच ‘एक खिडकी व्यवस्था’ प्रभावीपणे राबवून सर्व महसूल अधिकारी एकाच ठिकाणी उपलब्ध राहतील याची दक्षता घ्यावी. शिबिरांची व्यापक प्रसिद्धी करून जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, यासाठी सोशल मीडिया, स्थानिक माध्यमे व दवंडीचा वापर करण्याचे निर्देश देण्यात आले.
जालना जिल्हातील शिबीरांचे ठिकाण व दिनांक :-
7 मार्च 2026 – जालना- देवमूर्ती, बदनापूर- बावणे पांगरी, अंबड-जामखेड, घनसावंगी- कुंभार पिंपळगाव, परतुर- आष्टी, मंठा- पांगरी गोसावी,भोकरदन- राजुर, जाफ्राबाद-माहोरा
14 मार्च 2026- जालना- नेर, बदनापूर- रोषणगाव, अंबड-धनगर प्रिंप्री, घनसावंगी-राणी उंचेगाव, परतुर- श्रीष्टी, मंठा-तळणी, भोकरदन- जानेफळ दाभाडी, जाफ्राबाद-कोळेगाव.
22 मार्च 2026-जालना- सावंगी तलाव, अंबड- शहागड, घनसावंगी- रांजणी, भोकरदन- धावडा.28 मार्च 2026-जालना-विरेगाव, बदनापूर-शेलगाव, अंबड- वडीगोद्री, भोकरदन- आव्हाना.
6 एप्रिल 2026- जालना- रामनगर, भोकरदन- पिंपळगाव रेणुकाई
10 एप्रिल 2026-जालना- वाघ्रुळ जहागीर, बदनापूर- चिखली, अंबड-ताड हदगाव, घनसावंगी-पानेवाडी, परतुर- वाटुर, मंठा-ढोकसाळ, भोकरदन- केदारखेडा, जाफ्राबाद- टेंभुर्णी
17 एप्रिल 2026- जालना- पाचन वडगाव, बदनापूर- दाभाडी, अंबड-गोंदी, घनसावंगी-अंतरवाली टेंभी, परतुर- सातोना खुर्द, मंठा- माळतोंडी, भोकरदन- हसनाबाद, जाफ्राबाद- वरुड बुद्रुक.
24 एप्रिल 2026-जालना-सेवली, बदनापूर- ग्रामीण, अंबड-सुखापुरी, घनसावंगी-जांब समर्थ, परतुर- परतुर ग्रामीण, मंठा- जयपूर, भोकरदन- दानापूर, जाफ्राबाद- कुंभारझरी.
2 मे 2026- जालना- गोलापांगरी, अंबड- रोहिलागड, परतुर-कोकाटे हदगाव, मंठा- मंठा शहर, भोकरदन- सिपोरा बाजार.
8 मे 2026- जालना मनपा, बदनापूर नगर पंचायत, नगर परिषद अंबड, नगर पंचायत तिर्थपुरी, नगर परिषद परतुर, नगर पंचायत मंठा, नगर परिषद भोकरदन, नगर पंचायत जाफ्राबाद.
15 मे 2026 नगर पंचायत घनसावंगी, भोकरदन- आन्वा
जिल्हातील सर्व नागरिकांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.