एल्गार न्यूज :-
कर्तव्यात कसूर करून काही लोक कशाप्रकारे इतरांचा जीव धोक्यात घालतात याचे पुन्हा एक उदाहरण समोर आले आहे, रूग्णाच्या जीवाशी खेळणाऱ्या एका डॉक्टराचा एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.
नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील एका आरोग्य केंद्रात वेळेवर चहा बिस्किटे न मिळाल्याने डॉक्टराने ऑपरेशन (शस्त्रक्रिया) अर्ध्यात सोडून गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. आता डॉक्टर माफी मागत असला तरी त्याच्यावर कार्यवाही मात्र होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौदा तालुक्यातील खात येथील आरोग्य केंद्रात महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे नियोजन करण्यात आले होते, डॉ.भलावी हे 8 महिलांवर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणार होते, 4 महिलांवर त्यांनी शस्त्रक्रिया केली आणि त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी इतर 4 महिलांना त्यांनी भूल सूध्दा दिली होती.
सदरील 4 महिलांना भूल दिल्यानंतर डॉ.भलावी यांनी तेथेच उपस्थित राहणे आवश्यक असतांना ते अचानक तेथून निघून गेले, नंतर कळाले की त्यांना चहा – बिस्किटे न मिळाल्याने ते तेथून निघून गेले. हा प्रकार आरोग्य विभागाच्या लक्षात आल्यानंतर त्यांना स्पष्टीकरण मागितले आहे.
डॉक्टराची माफी :-
सदरील डॉक्टराच्या म्हणण्यानुसार, माझी रक्तशर्करा कमी झाल्याने वेळेवर चहा व बिस्किटे घ्यावी लागतात, ती न मिळाल्याने अस्वस्थ वाटू लागल्याने मला पतर जावे लागले, आपल्यामुळे संबंधित महिला व त्यांच्या नातेवाईकांना झालेल्या त्रासाबाबत माफी मागत आहे असे डॉ.भलावी यांनी सांगितले.
काही बरे वाईट झाले असते तर…
डॉक्टर माफी मागून मोकळे झाले आहेत, परंतू यदाकदाचित भूल दिलेल्या सदरील महिलांच्या जीवाचे काही बरेवाईट झाले असते तर याचा विचार संबंधित डॉक्टराने करायला हवा होता, अक्षरश: निष्काळजीपणा करून रूग्णाचे जीव धोक्यात घालणाऱ्या या डॉक्टरावर कडक कार्यवाहीची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.
सदरील डॉक्टराने माफी मागितली असली तरी प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने आरोग्य विभागाने संबंधित डॉक्टराला स्पष्टीकरण मागितले आहे, अर्थातच या डॉक्टरावर कारवाई होणार आहे. परंतू आरोग्य विभागाने यापुढे इतर आरोग्य केंद्रात अशा प्रकारचा निष्काळजीपणा आणि रूग्णांच्या जीवाशी खेळ होणार नाही याची दक्षता घेणे क्रमप्राप्त आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.