एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
दिवसेंदिवस लैंगिक शोषण व मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना कमी होण्याऐवजी वाढतच असल्याने महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कुंभार पिंपळगांव येथे एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील एका कोचिंग क्लास मध्ये परिसरातील एक अल्पवयीन मुलगी क्लासेससाठी जात होती, वर्षभरापासून या मुलीला लग्नाचे अमिष दाखवून येथील एका संचालकाने लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
सदरील पिडीत मुलीच्या कुटुंबियांनी याबाबतची तक्रार दि.२५ रोजी पोलीसांकडे दिल्यानंतर संबंधित आरोपीला अटक करण्यात आली आहे. सदरील आरोपीवर भारतीय न्याय संहितेसह बाल लैंगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (POCSO) गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास अंबड उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे पोलीस उपनिरीक्षक ए.के.ढाकणे करीत आहेत.
मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न !
कुंभार पिंपळगांव येथील कोचिंग क्लासेस मध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना समोर आल्यानंतर सर्वस्तरातून तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. सदरील घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पोलीस प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती पाऊले तातडीने उचलणे आवश्यक झाले आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे लावा !
शाळा, महाविद्यालय असो किंवा कोचिंग क्लासेस असो सर्व ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात यावेत, वेळोवेळी महिला पोलीसांनी शाळा, महाविद्यालय व कोचिंग क्लासेस मध्ये भेटी देवून सुरक्षिततेची तपासणी करावी, मुलींशी प्रत्यक्ष चर्चा करून काही चुकीचे तर घडत नाही ना याची माहिती घ्यावी तसेच काही चुकीचे आढळून आल्यास पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करावी. तसेच कोचिंग क्लासेस संचालकांनी शासनाची परवानगी घेतली आहे का ? मुलींच्या सुरक्षेची काळजी घेतली आहे का ? याचीही तपासणी व्हावी अशी मागणी कुंभार पिंपळगांव व परिसरातील नागरिकांनी केली आहे.