एल्गार न्यूज :-
Accident due to Tractor Trolley : घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील अंबड – पाथरी या महामार्गावर रात्रीच्या वेळी ट्रॅक्टर ट्रॉली भर रस्त्यावर कुठेही उभी करण्यात येत असल्याने अनेक अपघात घडत आहे, मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या ट्रॅक्टर चालकांवर कोणत्याही प्रकारची होतांना दिसत नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव येथील अंबड – पाथरी या महत्वाच्या महार्गावर मोठी वर्दळ असते, सदरील महामार्ग असल्यामुळे इतर जिल्ह्यातील वाहनेही याच रस्त्याने जात असतात, हा रस्ता एका दिशेला अंबड मधील जालना बीड हायवेला जोडणारा तर दुसऱ्या दिशेला पाथरी जि.परभणीला जोडणारा आहे.
सध्या ऊसाचा हंगाम सुरू आहे, मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या माध्यमातून ऊस वाहतुक सुरू आहे, सदरील अंबड- पाथरी रस्त्यावर ट्रॅक्टर कुठेही बंद पडल्यास किंवा टायर पंक्चर झाल्यास त्या ट्रॅक्टर ट्रॉलीला जागेवरच सोडून ड्रायव्हर पुढे जात आहे.
Accident due to Tractor Trolley
सदरील बहुसंख्य ट्रॅक्टर ट्रॉलीला मागील बाजूस कोणत्याही प्रकारचे चमकणारे स्टीकर नाहीत, लाईट तर नसतेच, स्टीकर नसल्यामुळे व ट्रॉली एका जागी थांबलेली असल्यामुळे अपघात घडत आहे, त्याचे मुख्य कारण म्हणजे ट्रॅक्टर ट्रॉली एका जागी उभी असते, त्यास स्टीकरही नसते, मागून मोटरसायकल किंवा इतर वाहन येत असल्यास आणि समोरून येणाऱ्या वाहनांच्या लाईटच्या फोकसमुळे काही दिसत नाही, त्यामुळे मागून येणारे वाहन ट्रॉलीला धडकते.
काही दिवसांपूर्वी अशाच एका उभ्या ट्रालीला धडकून सरस्वती भुवनचे माजी कर्मचारी यांचा जागीच मृत्यू झाला होता, शिवाय इतरही अनेक अपघातात अनेकांना जीव गमवावा लागला तर अनेकांना जबर मार लागल्यामुळे हात पाय फ्रॅक्चर झाले आहे.
रस्त्यावर मोठे दगड !
जेव्हा एखादा ट्रॅक्टर बंद पडतो किंवा टायर पंक्चर होते तेव्हा सदरील ट्रॅक्टरचा ड्रायव्हर टायरच्या मागील किंवा पुढील बाजूस मोठमोठे दगड आणून लावतात, अनेकदा हे दगड सहज उचलता येणार नाही एवढे मोठे असतात, जेव्हा ते ट्रॅक्टर तेथून जाते तेव्हा ते दगड उचलून बाजूला केले जात नाही, ते दगड तसेच रस्त्यावर पडून राहते त्यामुळेही अनेकदा अपघात होत आहेत.
रस्त्यावर मोठमोठे दगड असण्याची काही एखादी घटना नाही, वारंवार मोठमोठे दगड रस्त्यावर दिसून येत आहेत, मात्र नियम कायदे सर्वकाही पायदळी तुडवण्यात येत असल्याने शिवाय त्यांना पोलीस प्रशासनाचा आशिर्वाद मिळत असल्याने कार्यवाही होतांना दिसत नाही. जर तसे नसेल तर कार्यवाही का नाही ? असाही प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
दारूच्या नशेत ट्रॅक्टरचालक !
उसाचे ट्रॅक्टर चालवणाऱ्यांपैकी अनेक ड्रायव्हर हे दारू पिऊन ट्रॅक्टर चालत असल्याचे नागरिक सांगत आहेत, जर दारूच्या नशेत दोन ट्रॉलीसह ट्रॅक्टर चालवण्यात येत असेल तर ते इतरांच्या जीवीतासाठी किती धोकादायक आहे याचा विचार करणे आणि त्यांच्यावर कार्यवाही करणे आवश्यक आहे.
अल्पवयीन मुलांच्या हाती स्टेअरिंग !
कुंभार पिंपळगांव परिसरातून उसाची वाहतुक करणाऱ्या अनेक ट्रॅक्टरवर अल्पवयीन मुले दिसत आहे, अवघ्या 15 ते 18 वर्षाचे मुले सुध्दा उसाचे ट्रॅक्टर चालवत आहेत, विशेष म्हणजे या ट्रॅक्टरला 2 ट्रॉल्या असतात, त्यामुळे अपघाताची शक्यता अधिक बळावली आहे.
पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष !
आरटीओ विभागाचे दुर्लक्ष तर आहेच मात्र पोलीस प्रशासनाचे सुध्दा याकडे दुर्लक्ष आहे, घनसावंगी पोलीस ठाण्या अंतर्गत या ट्रॅक्टरला आशिर्वाद मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही होतांना दिसत नाही.
योजना व इतर महत्वपूर्ण बातम्यांसाठी येथे क्लिक करा…
सरकारी योजना व इतर महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.