एल्गार न्यूज :-
पत्रकारिता म्हटले की, विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागतो, तशी तयारी सुध्दा ठेवावी लागते. अनेकदा निर्भीड, रोखठोक बातम्यांमुळे अनेक लोक दुखावले जातात आणि ते लोक संबंधित पत्रकारावर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असतात.
संबंधित पत्रकार त्याच्या गावात किंवा शहरात खंबीर असेल तर अडचण नसते परंतू अनेक पत्रकार बांधव असे आहेत ज्यांची स्थानिक पातळीवर पाहिजे तशी ताकद किंवा दबदबा नसतो, गावात किंवा शहरात हवे तेवढे पाठबळ नसते, अर्थात त्याला विचारपूर्वकच लिखाण करावे लागते.
पत्रकार अडचणीत असेल तर…
आजकाल पत्रकार अडचणीत असेल तर सर्वात आधी त्याच्या बद्दल सहानुभूती दर्शवण्याऐवजी बऱ्याचदा नकारात्मकता ठेवण्यात येते, सर्वात आधी तर तो पत्रकारच आहे किंवा नाही यापासून सुरूवात होते, बरं तपासायला किंवा त्याची माहिती घ्यायला हरकत नाही, परंतू त्याबद्दल चांगली माहिती मिळून सुध्दा अनेकजण त्याला सपोर्ट करण्याची मानसिकता ठेवत नाहीत.
पत्रकारिता क्षेत्रात चुकीचे लोक घुसले आहेत आणि त्या बोगस पत्रकारांनी पत्रकारिता बदनाम केली आहे यात शंका नाही. त्या चुकीच्या तथाकथित पत्रकाराबद्दल नकारात्मकता असण्याला हरकत नाही. परंतू एखादा पत्रकार इमाने इतबारे काम करत असेल, नि:पक्ष, निर्भीड आणि रोखठोकपणे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून लिखाण करत असेल तर त्याला सपोर्ट करणे क्रमप्राप्त ठरते.
लगेगी आग तो…
प्रसिध्द शायर स्व. राहत इंदोरी यांची एक शायरी आहे, ज्यामध्ये ते म्हणतात “लगेगी आग तो आएंगे कई घर जद में, यहां पर सिर्फ हमारा मकान थोडी है” | याचाच अर्थ जेव्हा लागेल एखाद्या घराला आग तेव्हा अनेक घर आगीच्या कचाट्यात येतील येथे फक्त आमचं घर थोडीच आहे.
म्हणजेच इतरांनी एखाद्या व्यक्तीला तो चांगला असतांनाही त्याकडे दुर्लक्ष केले किंवा तो अडचणीत असतांना त्याला मदत केली नाही तर उद्या वेळ आपल्यावरही येवू शकते, आज दुसऱ्याचे घर जळतांना कोणी बघ्याची भुमिका घेणार असेल तर उद्या त्याच्यावर सुध्दा वेळ येवू शकते याचं भान सर्वांनी ठेवणे आवश्यक आहे.
दुर्दैवाने कधी कधी असेही पहायला मिळते की, आपला एखादा पत्रकार अडचणीत असेल तर दुसऱ्या पत्रकाराला बरं वाटतं किंवा आनंद होतो. अर्थातच हे सगळीकडे नाही किंवा प्रमाण जास्त नाही, परंतू अशी परिस्थिती सुध्दा दिसून येते.
पत्रकारांची एकता (?)
पत्रकारांचे वर्षानुवर्षे प्रश्न प्रलंबित आहेत, शासन दरबारी अनेक मागण्या प्रलंबित आहेत. कारण आपण खऱ्या अर्थाने एक नाहीत. मनाने एक नाहीत, आपल्यात गट तट पडले आहेत. आपण अडचणीत सापडलेल्या पत्रकाराला मदत तर सोडाच पाठिंबा देण्यासाठी सुध्दा विचार करतो तर मग प्रलंबित मागण्या मान्य होण्याचा तर प्रश्नच बाजूला राहतो.
जेव्हा कोणी पत्रकार अडचणीत असतो, दबावात असतो तेव्हा त्याला किमान पाठिंबा जरी दर्शवला तरी त्याला हत्तीचे बळ मिळत असते, परंतू आपण अशा परिस्थितीत तो कोणत्या संघटनेचा आहे इथून सुरूवात करतो. मात्र आपला पत्रकार म्हणून त्याकडे पाहत नाहीत. अर्थातच राज्यात एकमेकांना सहकार्य करणारे, पाठिंबा दर्शवणारे, हवी ती मदत करण्याची मानसिकता ठेवणारे पत्रकार बांधव आहेत, परंतू ही संख्या मर्यादित दिसून येते.
आपापल्या संघटना खुशाल वाढवा, परंतू जेव्हा एखादा पत्रकार अडचणीत असेल, दबावात असेल त्याला आपली गरज असेल तेव्हा गट तट सोडून त्याला किमान मानसिक पाठबळ आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत हे चार शब्द बोलण्याचे मोठेपण दाखवावे लागेल. कारण संकुचित वृत्ती पत्रकारांनाच नव्हे तर पत्रकारिता क्षेत्रासाठी सुध्दा धोकादायक आहे.
पत्रकारांच्या मागण्या मान्य होत नाहीत ?
तुम्हाला काय वाटतं सगळे पत्रकार एक झाले, सर्वांनी एकजुट होवून लढा दिल्यास पत्रकारांचे प्रश्न सुटणार नाहीत ? नक्कीच सुटतील. लेखणीमध्ये एवढी ताकद आहे की भल्या भल्यांची झोप उडवण्याची आणि अनेकांची खुर्ची धोक्यात आणण्याची ताकद या लेखणी मध्ये आहे.
जेव्हा सगळे पत्रकार आणि सर्व पत्रकार संघटना आपले मतभेद, गट तट विसरून एक होतील व लढा देतील आणि जेव्हा सर्वस्तरातून पत्रकारांच्या मागण्यांसाठी निर्भीड व रोखठोकपणे लेखणी उचलली जाईल तेव्हा राज्यकर्त्यांना पत्रकारांच्या मागण्या मान्यच कराव्या लागतील यात शंका नाही.
– परवेज पठाण, संपादक, एल्गार न्यूज