एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून कुंभार पिंपळगांवचे नाव जिल्हाभरात प्रसिध्द आहे. खरं तर एवढ्या मोठ्या शहरात (गावात) कचरा उचलण्यासाठी किमान 2 ते 3 घंटागाड्या पाहिजेत, मात्र गावाला एकुलती एकच घंटागाडी आहे. आता तर ही एकुलती एक असणारी आणि घरोघरचा कचरा उचलणारी घंटागाडी सुध्दा रूसून बसली आहे. ग्रामसेवक आणि प्रतिनिधींनी घंटागाडीच्या कानात काय म्हटलं कुणास ठाऊक त्यामुळे 2 महिन्यांपासून घंटागाडी कचराच घेवून जात नाहीये, अशीच काहीशी वेगळी चर्चा ऐकायला मिळत आहे.
आता तुम्ही म्हणाल की, निर्जीव असलेली घंटागाडी कुठं ऐकू शकते का ? तर त्याचे उत्तर असे आहे की, जेव्हा जिवंत लोकं ओरडून सांगूनही व्यवस्थेला ऐकू येत नसते तेव्हा निर्जीव वस्तू सुध्दा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून आपले गाऱ्हाणे मांडत असतात. आता तरी घंटागाडी फक्त ऐकून शांत बसली आहे, अशीच परिस्थिती राहिल्यास भविष्यात अशाच एखाद्या माध्यमातून घंटागाडी बोलायला लागली तर आश्चर्य वाटू नये… असो….
घंटागाडी आणि ग्रामपंचायत मध्ये नेमका वाद काय आहे हेच कळायला मार्ग नाही. कारण कचऱ्याच्या समस्येची जाणीव असूनही ग्रामपंचायत दुर्लक्ष करत आहे. ट्रॅक्टर असल्याचे सांगण्यात येते, परंतू ते छोट्या गल्ल्यांमध्ये जावूच शकत नाही. मागील 2 ते अडीच महिन्यांपासून घंटागाडी शांत असल्याने जागोजागी कचऱ्याचे ढिग दिसत आहे. पर्याय दिसत नसल्याने लोक जागा दिसेल तेथे कचरा टाकत आहेत, अनेक ठिकाणी तर घाण व कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मागील काळातही दुर्लक्ष !
घंटागाडी काही महिन्यांपूर्वी सुध्दा शांत झाली होती, त्यावेळेस घंटागाडीची तब्येत (तांत्रिक बिघाडामुळे) खराब होती, बरेच दिवस घंटागाडीकडे लक्ष न दिल्यामुळे ती अशीच रूसून बसली होती आणि त्यावेळेस सुध्दा कचऱ्याचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र जनतेची नाराजी लक्षात घेता ग्रामपंचायतने कसेबसे घंटागाडीला समजावून योग्य ते उपचार (मॅकॅनिक द्वारे) केले व घंटागाडी सुरू केली होती, परंतू आता पुन्हा घंटागाडी शांत झालेली आहे.
घंटागाडी सुरू कधी होणार ?
मागील 2 ते अडीच महिन्यांपासून घंटागाडी रूसून बसलेली आहे. ग्रामसेवक आणि प्रतिनिधींनी घंटागाडीची नाराजी दूर करून आणि घंटागाडीला आवश्यक ती सुविधा पुरवून तातडीने घंटागाडी सुरू करावी, जेणेकरून छोट्या गल्ल्यांसह गावातील घाण व कचऱ्याची समस्या दूर होईल. नसता एकाच जागी घंटागाडी उभी राहिल्यामुळे तिचे टायर सुध्दा गतप्राण होतील आणि पुन्हा घंटागाडीला नव्या उपचारासाठी (मेकॅनिककडे) घेवून जावे लागेल.
सगळं खरंय पण…!
घंटागाडी शांत का आहे यामागे ग्रामपंचायतकडून मनुष्यबळाचे कारण देण्यात येत असले तरी लोकांना येत असलेल्या अडचणीचे काय ? जागोजागी कचरा साचतोय त्याचे काय ? नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे त्याचे काय ? शासनाचा लाखो रूपये निधी स्वच्छतेसाठी येतो तरीही कचरा साचत असेल तर याला काय म्हणावे ? त्यामुळे ग्रामपंचायतने एखादी अडचण असेल तरीही त्यातून मार्ग काढून रुसून बसलेल्या घंटागाडीचा प्रश्न मार्गी लावावा आणि कचरा उचलण्याची सोय करून सर्वसामान्य जनतेची अडचण दूर करावी एवढीच माफक अपेक्षा नागरिक करत आहेत.