एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मुळात व्यवस्थेमध्ये मुर्दाडपणा कोणाचा आहे हाच प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना प्राथमिक उपचार सुध्दा मिळत नसतील आणि तासनतास आरोग्य केंद्रात लहान बाळांना घेवून महिला बसत असतील तरीही त्यांना उपचारा अभावी परत जावे लागत असेल तर हा मुर्दाडपणा नेत्यांचा म्हणावा, आरोग्य विभागाचा म्हणावा की वारंवार अन्याय होवूनही शांत बसणाऱ्या आम्हा नागरिकांचा म्हणावा हाच प्रश्न नागरिकांना पडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला कोणी वाली आहे का नाही असाही प्रश्न पडला आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 2 डॉक्टर आहेत. त्यापैकी एक डॉक्टर ज्यांच्याकडे प्रा.आ.केंद्राचा चार्ज होता ते कायम गैरहजर असतात, फक्त नावाला ते आरोग्य केंद्रात कधीतरी येतात आणि त्यांना प्यायची (?) सवय असल्यामुळे ते ठिकाणावर नसतात असेही नागरिक सांगत आहेत. आता तर त्यांनी 2 महिन्याची सुट्टी घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुळातच सदरील डॉक्टरांना कुं.पिंपळगांवात काम करण्याची इच्छा नाही असे त्यांनी यापूर्वीच लक्षात आणून दिले आहे.
दुसरे डॉक्टर सध्या प्रा.आ.केंद्र कुंभार पिंपळगांव येथे येत असतात, त्यांच्याकडे राजाटाकळीचा पदभार असल्याचे सांगण्यात येत आहे. या डॉक्टरांनी सांगितले आहे की, मला येथे काम करण्याची इच्छा नाही, मी बदली करून जाणार आहे. म्हणजेच कुंभार पिंपळगांव प्रा.आ.केंद्राचा कारभार प्रभारी आणि तात्पुरत्या स्वरूपात सुरू आहे. अर्थातच रडत पडत कारभार सुरू आहे. दोन्ही डॉक्टरांना जर काम करण्याची इच्छाच नाही तर मग या दोन्ही डॉक्टरांना कुंभार पिंपळगांव व सर्कल मधील नागरिकांच्या मानगुटीवर कशाला आणून बसवण्यात आले आहे असा सवाल नागरिक करत आहेत.
बाळांना डोस नाही !
लहान बाळांना पेन्टा नावाचा डोस देण्यात येत असतो, त्यासाठी बुधवार दिवस असतो. परंतू दि.19 बुधवार रोजी हा डोस उपलब्ध आहे किंवा नाही हे सध्या उपस्थित असलेले डॉ.भोजने यांना माहितच नव्हते. सकाळपासून अनेक महिला भगीनी लहान बाळांना घेवून प्रा.आ.केंद्रात येवून थांबल्या होत्या, परंतू बराच वेळ थांबूनही डोस देण्यात येत नव्हते, तेव्हा संबंधित डॉक्टरांना विचारले असता, तिकडे सिस्टर (नर्स) आहेत त्यांना विचारा असे त्यांनी सांगितले, सिस्टरला विचारल्यास डोस उपलब्ध नाही असे सिस्टरने सांगितले, पुन्हा डॉक्टरांना याबाबत विचारले असता त्यांनी नर्सला बोलावून विचारले की काय अडचण आहे तेव्हा डॉक्टरांना कळाले की बाळाचे डोस उपलब्ध नाही.
याबाबत डॉक्टरांना विचारले असता डॉक्टरांनी चूक मान्य करण्याऐवजी रूग्णांवरच रागवण्यास सुरूवात केली, शिवाय मला येथे काम करण्याची इच्छा नाही, मी बदली करून येथून जाणार आहे असे सांगितले. याचाच अर्थ जे सुट्टीवर गेले आहेत ते डॉक्टर श्री.ढवळे आणि सध्या असलेले डॉ.भोजने या दोघांचे प्रा.आ.केंद्रात लक्ष नाही. आरोग्य केंद्रात कोणत्या गोळ्या औषधी नाहीत हे दोघांनाही माहित नाही असे दिसत आहे. दोघांनाही येथे राहण्याची इच्छा नाही, जे काम चालू आहे ते रडत पडत, टाईमपास म्हणून चालू असल्याचे नागरिक सांगत आहेत.
कायम गोळ्या औषधांचा तुटवडा !
सध्या असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र नुसतं बुजगावण्यासारखं नावाला सुरू ठेवण्यात आलेलं आहे की काय असा प्रश्न पडू लागला आहे. या प्रा.आ.केंद्रात कायम रूग्णांना लागणाऱ्या गोळ्या औषधांचा तुटवडा असतो, अनेकदा तर बाहेरून औषधे आणावी लागतात. काही मोजक्या गोळ्या औषधी सोडली तर कायम या आरोग्य केंद्रात औषधांचा दुष्काळ असतो असे अनेक नागरिक सांगत आहेत.
जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर !
प्राप्त माहितीनुसार दोन्ही डॉक्टरांना कुंभार पिंपळगांव येथील प्रा.आ.केंद्रात काम करण्याची इच्छा नाही. त्यामुळे दोघेही कर्तव्यात कसूर करत असून रूग्णांशी असभ्यपणे वागत आहेत. एकमेकांकडे बोटही दाखवत आहेत. कोणीतरी आमची तक्रार करावी व आम्हाला येथून बदली मिळावी अशी त्यांची मानसिकता असल्याचे नागरिक सांगत आहेत. मात्र त्यांच्या या मानसिकतेमुळे असंख्य रूग्णांचे हाल होत आहेत.
…तर घरी बसावे ! – THO
शासनाच्या नियमानुसार सदरील दोन्ही डॉक्टरांना कर्तव्य पार पाडावे लागेल, आलेल्या रूग्णांना योग्य ती सेवा द्यावी लागेल. संबंधित डॉक्टरांना शासनाचा पगार मिळतो, कोणीही फ्री मध्ये काम करत नाही. जर प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोणी डॉक्टर काम करण्याची इच्छा नाही किंवा गरज नाही असे सांगत असेल किंवा त्यांची तशी मानसिकता असेल तर त्यांनी खुशाल घरी बसावे. तातडीने प्रा.आ.केंद्राला भेट देवून माहिती घेऊ व पुढील निर्णय घेऊ असे घनसावंगी तालुका आरोग्य अधिकारी अविनाश गायकवाड यांनी सांगितले.