एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे काही दुकानांवर शेतकऱ्यांना जास्त अथवा चढ्या दराने कापसाचे बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. शिवाय जादा दराने दिलेल्या बियाण्यांची पावतीही दिली जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमधून तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, चालू आठवड्यात विविध ठिकाणी पावसाचा चांगला शुभारंभ झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. मात्र काही कृषि सेवा केंद्र चालक कापसाचे बियाणे खरेदी करण्यासाठी शेतकरी गेल्यावर तेथे जास्त दराने बियाणे घ्यावे लागत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे दर असल्याचेही शेतकरी सांगत आहेत.
कृत्रित टंचाई निर्माण करून सदरील बियाणे जास्त दराने दिले जात असून एक तर पावती दिली जात नाही, किंवा पावती दिली तर मुळ रक्कमेचीच पावती दिली जाते म्हणजेच वाढवून घेतलेली रक्कम पावतीवर टाकली जात नाही. शेतकऱ्यांनी याबाबत काही म्हटल्यास घ्यायचे तर घ्या नसता घेवू नका असे सांगितले जात असल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
कारवाई करण्याची मागणी !
जे दुकानदार मुळ किंमतीपेक्षा जास्तीच्या दराने बियाणे विक्री करून शेतकऱ्यांची लूट करत आहेत त्यांच्या योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ते बियाणे योग्य किंमतीवर उपलब्ध व्हावेत यासाठी वेळोवेळी पथकाने तपासणी करावी अशी मागणी कुंभार पिंपळगांवसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
कारवाई करणार !
जास्त दराने बियाणे विक्री करण्यात येत असतील तर संबंधित कृषि सेवा केंद्राचे परवाने निलंबित करण्यात येतील. तुर्तास काही दुकानदारांना नोटीस सुध्दा देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांकडून कोणताही दुकानदार बियाण्यांसाठी जास्तीचे पैसे घेत असेल तर शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, पंचायत समिती कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक यापैकी कोणाकडेही तक्रार केल्यास त्याची दखल घेवून कारवाई करण्यात येईल असे घनसावंगीचे तालुका कृषि अधिकारी डॉ.सखाराम पवळ यांनी सांगितले.
इतर बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर किंवा खाली दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.