Your Alt Text

दिड महिन्‍यापासून घंटागाडीला बुजगावणं बनवून आणि जागोजागी कचरा साचवण्‍याचा विक्रम करून ग्रामपंचायतला एखादा पुरस्‍कार घ्‍यायचा असेल !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
गावात जागोजागी कचरा साचवून ग्रामपंचायतला नेमकं साध्‍य काय करायचंय ? असा सवाल नागरिकांना पडला आहे. दिड महिन्‍यापासून घंटागाडी बंद आहे, कदाचित घंटागाडीला बुजगावणं बनवून आणि जागोजागी कचरा साजचवण्‍याचा विक्रम करून ग्रामपंचायतला एखादा पुरस्‍कार घ्‍यायचा असेल अशी प्रतिक्रिया नागरिक देत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे मागील अंदाजे दिड महिन्‍यापासून घंटागाडी बंद आहे. त्‍यामुळे गावात जागोजागी मोठ्या प्रमाणावर कचरा साचला आहे. जागोजागी घाण व कचरा साचत असल्‍यामुळे दुर्गंधी पसरत असून त्‍यामुळे नागरिकांचे आरोग्‍य सुध्‍दा धोक्‍यात येत आहे.

नियोजनाचा अभाव !

मागील काळात तांत्रिक बिघाडामुळे घंटागाडी अनेक दिवस बंद ठेवण्‍यात आली होती, काही दिवसानंतर घंटागाडी दुरूस्‍त करण्‍यात आली व सुरू करण्‍यात आली. परंतू मागील दिड महिन्‍यापासून घंटागाडीवरच्‍या ड्रायव्‍हरला पाण्‍याच्‍या टँकरवर पाठवण्‍यात येत आहे. त्‍यामुळे घंटागाडीवर ड्रायव्‍हर नाही. माणसं मिळत नाही त्‍यामुळे घंटागाडीच्‍या ड्रायव्‍हरला पाण्‍याच्‍या टँकरवर पाठवण्‍यात येत असल्‍याचे ग्रामपंचायतकडून सांगण्‍यात येते. परंतू खरंच पाण्‍याच्‍या टँकरवर जाण्‍यासाठी माणूस मिळत नसेल का असा प्रश्‍न सर्वसामान्‍यांना पडला आहे.

कचरा टाकायचा कुठे ?

घंटागाडी सुरू असल्‍यास गावातील नागरिक घंटागाडीमध्‍ये कचरा टाकतात, त्‍यामुळे जागोजागी कचरा दिसून येत नसतो, परंतू अंदाजे गेल्‍या दिड महिन्‍यापासून घंटागाडी बंद असल्‍यामुळे जागोजागी कचरा दिसून येत आहे. सध्‍या घरात अनेक दिवस कचरा पडून राहत आहे. काहीजण नाईलाजाने जागा मिळेल त्‍या ठिकाणी कचरा टाकून मोकळे होत आहेत. त्‍यामुळे अनेक ठिकाणी कचरा दिसून येत आहे.

कचरा जाळण्‍याचा प्रकार !

ग्रामपंचायत कडून घंटागाडी बंद असल्‍यामुळे तसेच कचरा घेवून जाण्‍याची इतर सोय उपलब्‍ध नसल्‍यामुळे गावात व रस्‍त्‍यांवर अनेक ठिकाणी कचरा जाळण्‍यात येत आहे. वारंवार कचरा जाळण्‍यात येत असल्‍यामुळे प्रदुषण तर होत आहेच शिवाय अनेकदा विषारी किंवा आरोग्‍यास हानिकारक कचरा सुध्‍दा जाळण्‍यात येत असल्‍यामुळे आरोग्‍यावर सुध्‍दा परिणाम होण्‍याची दाट शक्‍यता आहे.

तोंडावर कुलूप !

कुंभार पिंपळगांवचे ग्रामसेवक आठवड्याला किंवा 15 दिवसाला एखाद्यावेळी काही वेळेसाठी गावात येत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. मग प्रश्‍न पडतो की, ग्रामसेवकच जर वारंवार गैरहजर राहणार असतील तर कचऱ्याचा प्रश्‍न व गावातील इतर प्रश्‍न मार्गी लागणार कसे ? शासनाचा प्रतिनिधी म्‍हणजेच ग्रामसेवक गावात येत नसेल तर गावाचा विकास होणार तरी कसा ? असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. गावात कचऱ्याचा प्रश्‍न, पाण्‍याचा प्रश्‍न व इतर अनेक प्रश्‍न निर्माण झालेले असतांना ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत आहे. विशेष म्‍हणजे हा प्रकार मुकदर्शक होवून सर्वजण पाहत असून अनेकांनी तर तोंडाला कुलुप लावल्‍याचे दिसून येत आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!