एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील वाळूची अवैध वाहतुक मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याने शासनाचा कोट्यावधी रूपयांचा महसूल बुडत आहे. गोदावरी नदीपात्रातून वाळूमाफीया बेसुमार वाळूचे उत्खनन व वाहतुक करत असल्यामुळे प्रशासनाच्या भुमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
याबाबत एल्गार न्यूजने (दि.17) बातमी प्रकाशित केल्यानंतर प्रशासनाने (महसूल किंवा पोलीस) तात्पुरती का असेना तत्परता दाखवत त्याच रात्री वाळूची अवैध वाहतुक 90% थांबवली अर्थात नियंत्रणात आणल्याचे बोलले जाते. परंतू सोन्याचे अंडी देणाऱ्या कोंबळीला किती काळ तरी शांत बसवावं असा प्रश्न वाळूमाफीयांसह कदाचित प्रशासनालाही पडला असेल. त्यामुळे पुन्हा काही प्रमाणात का असेना वाळूची अवैध वाहतुक सुरू झाल्याचे दिसत आहे.
जबाबदारी कोणाची ?
घनसावंगी तालुक्यात तुर्तास काही प्रमाणात वाळूची अवैध वाहतुक कमी झालेली दिसत असली तरी पूर्णपणे थांबलेली नाही. महसूल प्रशासनाकडून आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एखाद्यावेळी एखादी कारवाई होत असल्याचे दिसत आहे. मात्र नियमितपणे कारवाई होतांना दिसत नाही. तर पोलीस प्रशासनाच्या समोरून वाळूची वाहने जात असतांना पोलीस सरळ सरळ डोळेझाक करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.
वाळूमाफीयांचे संबंध कोणासोबत !
महसूल असो किंवा पोलीस प्रशासन असो या विभागात चांगले अधिकारी कर्मचारी आहेतच. मात्र दोन्ही विभागातील काही लोक वाळूमाफीयांना पाठीशी घालत असल्याचे शिवाय त्यांना लोकेशन देत असल्याचेही बोलले जात आहे. प्रत्येक अधिकाऱ्याच्या दिनचर्येवर वाळूमाफीयांची नजर असल्याचेही सांगितले जाते. मात्र या खबरीलालचा तपास का केला जात नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
चहापाणी झाली का ?
एल्गार न्यूज मध्ये बातमी प्रकाशित झाल्यानंतर त्याच दिवशी रात्री 90% वाळूची वाहतुक थांबल्याचे दिसून आले. परंतू एक एक करून पुन्हा वाळूची अवैध वाहतुक सुरू होत असल्याचे दिसून येत आहे. महसूल किंवा पोलीस प्रशासनाचे अधिकारी किंवा कर्मचारी वाळूमाफीया अथवा त्यांच्या सहकाऱ्यांसोबत वेळोवेळी चहापाणी करत असल्याचे नागरिक सांगत आहेत. मग या मलाईदार चहापाण्यामुळेच वाळूची अवैध वाहतुक सूरू होत आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
वसुलीचे वाहन कोणाचे ?
वाळूमाफीया किंवा अवैध धंदे करणाऱ्यांकडून वसुली करण्यासाठी खाजगी कार मध्ये किंवा इतर वाहनांमध्ये महसूल किंवा पोलीस प्रशासनाचे एखादे वाहन फिरत आहे का ? अनेकदा रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडीला अशा प्रकारचे वाहन दिसून आल्याचे तसेच संबंधित वाहनातील व्यक्ती वाळूमाफीयांशी हसून खेळून गप्पा मारत असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. वाळूमाफीया हे वसुलीसाठी आलेल्या व्यक्तीचे चांगल्या प्रकारे पाहुणचार करत असल्याचेही बोलले जात आहे.
नेत्याचा आशिर्वाद आहे का ?
घनसावंगी तालुक्यात वाळूची होत असलेली तस्करी अथवा अवैध वाहतुकीला कोणत्या तरी नेत्याचा आशिर्वाद असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांसह नेत्याचा सुध्दा या वाळूमाफीयांना आशिर्वाद असल्याचे बोलले जात आहे, मात्र हा नेता कोण याचा तपास वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे.
अधिकाऱ्याचाही टिप्पर आहे का ?
मागील काळात गोदापात्रातून वाळूच्या अवैध वाहतुकीमध्ये एका अधिकाऱ्याचाही टिप्पर असल्याचे सांगितले जात होते. कदाचित हा अधिकारी परतूर, घनसावंगी किंवा अंबड या तालुक्यातील असावा असा अंदाज आहे. तेव्हाप्रमाणेच आत्ताही एखाद्या अधिकाऱ्याचा वाळूचा टिप्पर आहे का ? याचाही तपास वरिष्ठ पातळीवरून होणे आवश्यक आहे. कारण असे असेल तर कुंपणच शेत खातंय असेच म्हणावे लागेल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष हवे !
घनसावंगी तालुक्यात सुरू असलेल्या वाळूच्या अवैध वाहतुकीला नेमके जबाबदार कोण याचा तपास पोलीस जिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, अप्पर पोलीस अधिक्षक यांनी करावा. जेणेकरून सत्य समोर येईल अशी प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक देत आहेत.