Your Alt Text

कुं.पिंपळगावात पाण्‍यासाठी नागरिकांमध्‍ये संताप ! पाण्‍याचे टँकर सुरू मात्र ग्रामपंचायतच्‍या नियोजनशुन्‍य कारभारामुळे अर्धे गाव पाण्‍यापासून वंचित !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे पाण्‍याची तिव्र टंचाई आहे. नागरिकांना पाण्‍यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाच्‍या वतीने ग्रामपंचायतला मोठे पाण्‍याचे टँकर (ट्रक) देण्‍यात आले मात्र ग्रामपंचायतच्‍या नियोजनशुन्‍य कारभारामुळे अर्धे गांव पाण्‍यापासून वंचित राहत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे उन्‍हाळा सुरू होण्‍यापूर्वी पासूनच तिव्र पाण्‍याची टंचाई जाणवू लागली होती, उन्‍हाळा सुरू झाल्‍यानंतर यात अधिकच भर पडली, ग्रामपंचायतने सुरूवातीच्‍या काळातच टँकरची मागणी प्रशासनाकडे करणे व पाठपुरावा करणे अपेक्षित असतांना तसे झाले नाही, कसे बसे अर्धा उन्‍हाळा संपल्‍यानंतर पाण्‍याचे मोठे टँकर सुरू करण्‍यात आले. मात्र आजही अर्धे गाव पाण्‍यापासून वंचित आहे.

अर्धे गांव वंचित !

ग्रामपंचायत व प्रशासनाकडून पाण्‍याचे मोठे टँकर (ट्रक) सुरू करण्‍यात आले, मात्र हे टँकर फक्‍त मुख्‍य रस्‍त्‍यालगत व मोठे रस्‍ते असणाऱ्या भागापर्यंतच पाणी पोहोचवत आहे. छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये अद्याप पाण्‍याचा थेंबही पोहोचवण्‍यात आला नाही. मुख्‍य रस्‍त्‍यापासून 200 फुट आत मध्‍ये सुध्‍दा पाणी पोहोचवण्‍यात ग्रामपंचायत अपयशी ठरत आहे. अर्थातच गावातील 50% पेक्षा जास्‍त नागरिक मुख्‍य रस्‍त्‍यापासून मागील बाजूस छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये राहते.

विशेष म्‍हणजे असे अनेक भाग आहेत जेथे मोठे टँकर सुध्‍दा जावू शकतात परंतू ग्रामपंचायतच्‍या नियोजनशुन्‍य कारभारामुळे सदरील टँकर तेथे पाठविण्‍यात येत नाही. गावाची लोकसंख्‍या 20 ते 25 हजार असल्‍याचा विसर ग्रामपंचायतला पडल्‍याचे दिसत आहे. ग्रामपंचायतकडून भेदभाव सुध्‍दा करण्‍यात येत असल्‍याचा आरोप नागरिक करत आहेत.

नळाचे पाणीही आठवड्याला !

अद्याप शासनाची कोणतीच पाणीपुरवठा योजना पूर्ण झालेली नाही. जुन्‍या काळात गावातील अवघ्‍या 25 % भागात असलेली नळाद्वारे रस्‍त्‍यावर असलेली पाणी पुरवठा योजनाही कुचकामी ठरत आहे. कारण गावातल्‍या मोजक्‍या भागात असलेली ही पाणी पुरवठा यंत्रणा कोलमडली असून आठवड्याला एकदा पाणी मिळत आहे. नागरिकांनी कर्मचारी किंवा इतर कोणाला विनंती केली तर त्‍यांना अरेरावीची भाषा वापरण्‍यात येत आहे.

छोटे टँकर का नाही ?

गावात अनेक भागात मोठे पाण्‍याचे टँकर जावू शकत नाही. मग त्‍या नागरिकांनी पाण्‍यापासून वंचित रहायचे का ? ग्रामपंचायतने ट्रॅक्‍टरवर असलेले छोटे टँकर अद्याप का सुरू केले नाही. ग्रामपंचायतला वर्षाला कोट्यावधी रूपयांचे बजेट येत आहे मग तरीही अर्धे गाव पाण्‍यापासून वंचित का आहे ? असा सवाल नागरिक करत आहेत. विशेष म्‍हणजे आजही गावात खाजगी टँकरच्‍या (ट्रॅक्‍टर) 25 ते 50 ट्रीप सुरू असून नागरिकांना पैसे देवून पाणी घ्‍यावे लागत आहे.

अधिकाऱ्यांची भेट !

कुंभार पिंपळगावात दि.16 रोजी प्रशासनाकडून एक पथक पाहणी करण्‍यासाठी आले होते, परंतू रस्‍त्‍यालगत असलेल्‍या नागरिकांना त्‍यांनी विचारपूस केली, त्‍यांनी टँकरचे पाणी मिळत असल्‍याचे सांगितले अथवा त्‍यांना तसे सांगण्‍यासाठी काहींनी प्रवृत्‍त केल्‍याचेही ऐकायला मिळत आहे. मात्र सदरील पथकाने गावातील आतील भागात अथवा छोट्या गल्‍ल्‍यांमध्‍ये जावून विचारपूस केली नसल्‍याचे व आमच्‍याकडे कोणीही आले नसल्‍याचे नागरिक सांगत आहेत.

ग्रामसेवक गैरहजर !

कुंभार पिंपळगांवचे कर्तव्‍यदक्ष व अत्‍यंत इमानदार असल्‍याचा आव आणणारे ग्रामसेवक महिन्‍यातून एकदा किंवा दोनदा गावात दिसत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. ग्रामसेवक चुकून गावाच्‍या दिशेने आल्‍यास गावाबाहेरच हॉटेल मध्‍ये, ढाब्‍यावर, झाडाखाली किंवा एखाद्याच्‍या ऑफीस मध्‍ये बसून ग्रामपंचायतचा कारभार पाहत असल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहेत. टक्‍केवारी व गुत्‍तेदारी करणाऱ्या लोकांना घनसावंगी किंवा अंबडला बोलावून घेत सह्या करण्‍यात येत असल्‍याचेही नागरिक सांगत आहेत.

विकासकामे ठप्‍प !

ग्रामसेवकांच्‍या गैरहजेरीमुळे गावाचा कारभार पूर्णपणे ठप्‍प होत आहे. गावाला कोणी वाली आहे का नाही असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. ग्रामपंचायतच्‍या वारंवार चकरा मारूनही ग्रामसेवकांची भेट होत नाही, अनेक दलाल सुध्‍दा ग्रामपंचायतमध्‍ये निर्माण झाले आहेत. गावातील समस्‍या, नागरिकांच्‍या अडचणी मांडाव्‍या तरी कोणाकडे असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. वर्षानुवर्षे परिस्थिती जैसेथेच राहत असल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये तिव्र संताप दिसून येत आहे.


इतर बातम्‍या खाली पहा…

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!