एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
शासन नदी नाल्यांवर बंधारे बांधून सिंचन क्षेत्र वाढवण्याचा प्रयत्न करीत असते. बंधारे बांधल्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाहून जाणारे पाणी अडवले जाते व सदरील पाण्यामुळे शेती ओलीताखाली येण्यास मदत होते आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते. परंतू बंधारेच जर निकृष्ट दर्जाचे होणार असतील तर कोट्यावधी रूपये पाण्यात जातील असेच म्हणावे लागेल.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंदखेड (ता.घनसावंगी, जि.जालना) येथील नरोळा नदीवर लाखो रूपये खर्च करून बंधारे बांधण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार या भागात 2 बंधारे बांधण्यात आले असून याचा बजेट 1 कोटीच्या आसपास असल्याचे सांगण्यात येत आहे. या 2 बंधाऱ्यापैकी एक बंधारा निकृष्ट दर्जाचा झाल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत असून चौकशीची मागणी शेतकरी करीत आहेत.
काम निकृष्ट दर्जाचे ?
सदरील नदीवर बांधण्यात आलेल्या बंधाऱ्याला तडे गेल्याचे दिसत आहे. हा बंधारा नुकताच बांधण्यात आला असून अजून काम पूर्णही झालेले नाही आणि त्यास तडे गेल्यामुळे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सदरील बंधाऱ्याचे काम करतांना वाळू वापरणे अपेक्षित असतांना कच वापरण्यात आल्याचे शेतकरी बांधव सांगत आहेत.
बंधाऱ्याचे काम अजून पूर्ण झालेले नसतांना आताच जर बंधाऱ्याला तडे जाणार असतील तर भविष्यात हा बंधारा वाहून जाणार नाही याची खात्री कोण देणार ? संबंधित अभियंता श्री.ढोबळे यांनी या कामाची अथवा इस्टीमेटची माहिती देण्यास टाळाटाळ केल्यामुळे गुत्तेदार आणि अभियंता यांनी संगणमताने बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले आहे का ? गुत्तेदाराला सदरील अभियंत्यांचा आशिर्वाद आहे का ? असा सवाल येथील शेतकरी करत आहेत.
लाखो रूपये पाण्यात ?
गांवकरी सदरील बंधाऱ्याचे काम जास्त बजेटचे असल्याचे सांगत आहेत तर अभियंता श्री.ढोबळे 40 ते 50 लाखाच्या आसपास बजेट असेल मात्र चेक करून सांगतो असे सांगितले मात्र कन्फर्म माहिती त्यांनी दिली नाही. जर 40 ते 50 लाखाचे जरी या एका बंधाऱ्याचे काम असेल तरीही ते निकृष्ट दर्जाचे झाल्याचे दिसत असल्यामुळे हे लाखो रूपये वाया जाण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत.
चौकशी होणे आवश्यक !
सदरील बंधाऱ्याचे काम इस्टीमेट प्रमाणे झाले आहे का ? काम करतांना निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरण्यात आले का ? सदरील बंधारा किती वर्ष टिकून राहू शकेल ? कामासाठी कमिशन कोणी घेतले का ? बंधाऱ्याचे काम जर निकृष्ट दर्जाचे झाले असेल तर याला जबाबदार कोण ? या सर्व प्रश्नांची अथवा बंधाऱ्याचे कामाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
प्रत्यक्ष भेट देणार
सदरील बंधाऱ्याचे काम नुकतंच करण्यात आले आहे, परंतू त्यात तडे गेले असतील अथवा काम निकृष्ट दर्जाचे झाले असेल किंवा इस्टीमेट प्रमाणे झाले नसेल तर त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल अशी प्रतिक्रिया घनसावंगीचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी व्ही.एन.निर्वळ यांनी दिली आहे.
एल्गार न्यूजचा पाठपुरावा
बंधाऱ्याच्या ठिकाणी एल्गार न्यूजच्या वतीने प्रत्यक्ष पाहणी केली असता काही ठिकाणी तडे गेल्याचे दिसून आले. त्यामुळे बंधाऱ्याचे काम खरंच नियमान्वये व इस्टीमेट प्रमाणे झाले आहे का ? याबाबतीत वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी यासाठी एल्गार न्यूजच्या वतीने पाठपुरावा करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी जायचे कोठून ?
सदरील प्रकारच्या बंधाऱ्यावर नदी ओलांडून जाण्यासाठी रस्ता नसतो असे सांगितले जात आहे, परंतू गावातील शेतकऱ्यांना नदी ओलांडण्यासाठी बंधाऱ्यावरून जाण्यासाठी रस्ता नसेल तर काही पावलावर असलेल्या शेतात जाण्यासाठीही त्यांना खूप लांबून जावे लागेल. वाहनासाठी शक्य नसेल पण लाखो रूपये खर्च करूनही बंधाऱ्यावर पाऊल रस्ता सुध्दा का असू नये असा सवाल शेतकरी करीत आहेत.