एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
आमचं झालं गेलं, पण मुला-मुलींचं काय ? पिढ्यानं पिढ्या अशाच बर्बाद होवू द्यायच्या का ? आजोबा, पंजोबाने अत्यंत वाईट दिवस पाहीले, बापानेही कबाडकष्ट घेवून आम्हाला मोठं केलं, पण परिस्थितीला सावरण्यात आम्हीही मोठे होवू शकलो नाही, प्रगती करू शकलो नाही. मग मुलांनाही आमच्या सारखंच तारेवरची कसरत करणारं आयुष्य जगण्याची वेळ येवू द्यायची का ? असे अनेक सवाल शेतकरी व गरीब कुटुंबातील पालकांच्या मनात घोगावत असून अनेकांनी मुलांच्या शिक्षणासाठी गाव सुध्दा सोडले आहे.
विषय राज्यात अनेक ठिकाणी असाच असेल, परंतू आज जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्याचा आणि कुंभार पिंपळगांव परिसराचा मांडणे क्रमप्राप्त झाले आहे. कुंभार पिंपळगांव सर्कल मध्ये जवळपास 40 गावे आहेत आणि घनसावंगी तालुक्याचा विचार केला तर जवळपास 117 गावे आहेत, परंतू कोठेही कमी खर्चात चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल अशी व्यवस्था नाही. काही अपवाद सोडल्यास चांगल्या हुशार मुलांचे निकाल सुध्दा थर्डक्लास येत आहेत. सध्या उपलब्ध असलेले शिक्षण पाहता काही अपवाद सोडल्यास मुले अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर काय चपराशी पण होणार नाहीत अशी तिव्र भावना शेतकऱ्यांसह पालक व्यक्त करत आहेत.
अपेक्षा तरी कशी करायची ?
10 वी च्या वर्गात शिकत असलेला विद्यार्थी जर आपली मायबोली मराठी भाषा निट लिहू शकत नसेल, साधं गणित सोडवू शकत नसेल, सामान्य इंग्रजी शब्दांचे अर्थ समजू शकत नसेल तर त्याच्याकडून अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर व्हायची अपेक्षा तरी कशी करायची ? असा प्रश्न असंख्य शेतकरी, कष्टकरी व पालकांना पडला आहे. अर्थातच त्या विद्यार्थ्याने भविष्यात मिस्तरीच्या हातालाखाली टोपलेच उचलावे अशीच काही परिस्थिती सध्याच्या शिक्षण व्यवस्थेने करून ठेवलेली दिसत आहे.
शासकीय व अनुदानित शाळा !
ग्रामीण भागात अनेक ठिकाणी 1 ली ते 4 थी जिल्हा परिषदेच्या शाळा दिसून येतात, तर 5 वी ते 10 वी विविध संस्थांच्या अनुदानित शाळा दिसून येतात. याच शाळांमधून अनेक चांगले विद्यार्थी घडले आहेत यात शंका नाही, परंतू त्यांची संख्या बोटावर मोजण्याइतकीच आहे. जि.प.च्या शाळा असो किंवा संस्थाच्या अनुदानित शाळा असो, येथील शिक्षकांना जवळपास 1 लाख किंवा त्यापुढे पगार आहे, परंतू तरीही विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण का मिळत नाही ? असा प्रश्न पालकांना पडत आहे.
मराठीचा अभिमान नावापुरताच का ?
मराठी भाषेचा अभिमान आपल्या सर्वांनाच आहे आणि असायलाच पाहीजे, परंतू तो अभिमान फक्त बोलण्यापुरताच असावा का ? इंग्रजी शाळांना अनुदान नाही, त्या शाळा वार्षिक फी घेवून काही अंशी का असेना कात टाकत आहेत किंवा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र मराठी शाळांना अनुदान आहे, शिक्षकांना लाखांच्या घरात पगार आहे मग मराठी शाळांचा दर्जाचा का सुधारत नाही असा प्रश्न पालकांना पडला आहे.
ना प्राथमिक ना माध्यमिक !
असं म्हटलं जातं की, घराचं फाउंडेशन मजबूत असल्यास बिल्डींग मजबूत राहते, तसंच शिक्षणाचं आहे. प्राथमिक शिक्षणापासून माध्यमिक पर्यंत शिक्षण चांगल्या दर्जाचे मिळाल्यास चांगली टक्केवारी येवून पुढील उच्च शिक्षणाचे दरवाजे उघडतात. परंतू प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणच थर्डक्लास दर्जाचे मिळणार असेल तर पुढील शिक्षणाचे काय होणार आहे हे वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही.
कुंभार पिंपळगांव सर्कल असो किंवा घनसावंगी तालुक्यातील 117 गावे असो, कुठेही कमी खर्चात चांगल्या दर्जाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, आधुनिक शिक्षण किंवा निवासी शाळेचा पर्याय उपलब्ध नाही हे दुर्देवाने नमूद करावे लागत आहे. बहुतांश ठिकाणी ढक्कल पास प्रमाणे प्रवास सुरू आहे. विविध गावातून स्वत:हून हुशार असलेले व काही चांगल्या शिक्षकांच्या योगदानामुळे बोटावर मोजण्याइतके विद्यार्थी पुढील उच्च शिक्षण घेण्यास पात्र ठरतात. मग बाकीच्या विद्यार्थ्यांचं काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उदाहरणार्थ 7 वीच्या एका वर्गात 50 विद्यार्थ्यांपैकी 5 विद्यार्थी चांगल्या मार्काने पास होत असतील तर बाकीचे 45 विद्यार्थी नालायक असतात असं कोणाला म्हणायचं आहे का ? मग या 45 विद्यार्थ्यांकडे आपण लक्षच द्यायचं नाही का ? मग अशा 117 गावांमधून हजारो विद्यार्थ्यांना आपण वाऱ्यावर सोडून द्यायचे का ? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.
आमचीच मुर्दाड मानसिकता !
आमच्या कुंभार पिंपळगांव सर्कल मध्ये किंवा घनसावंगी तालुक्यात प्राथमिक आणि माध्यमिक चांगल्या दर्जाच्या मराठी शाळा व्हाव्यात या दृष्टीने आम्ही प्रयत्न केलेच नाहीत, शिक्षण राहणे, जेवण इत्यादीसह असलेल्या “निवासी शाळा” उघडाव्यात यासाठी आम्ही पुढाकार घेतलाच नाही. आम्ही कोणालाच कधी जाब विचारलाच नाही आणि शिक्षण व्यवस्था सुधारावी म्हणून आम्ही प्रयत्नही केले नाहीत, कारण आमचीच मानसिकता मुर्दाड झाली आहे अशी भावना सुध्दा व्यक्त होत आहे.
जबाबदार कोण ?
आमच्या सर्कल मध्ये असो किंवा तालुक्यात असो, अनेक मातब्बर नेते आहेत, ज्यांच्या शब्दालाही मोठी किंमत आहे असेही नेते आहेत, पदाधिकारी आहेत. ते वैद्यकीय, इंजिनिअरिंग, फार्मसी कॉलेज तसेच बदलत्या काळानुसार व्यावसायिक अभ्यासक्रम असलेले कॉलेज तर सोडाच प्राथमिक आणि माध्यमिकच्या निवासी शाळा सुध्दा सुरू करू शकले नाहीत. याला जबाबदार तेच नाहीत तर आम्ही पण आहोत. कारण आमची मानसिकता मुर्दाड झाल्यामुळे आम्ही त्यांना कधी भांडलोच नाही, मागणीही केली नाही आणि प्रयत्नही केले नाही त्यामुळे त्यांच्याएवढे आम्ही नागरिक पण तेवढेच जबाबदार आहोत.
आता पुढे काय ?
सर्कल मध्ये आणि तालुक्यात बहुतांश वर्ग हा शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे व्यापारी यांचा आहे. अर्थातच बेरोजगारांची संख्याही मोठी आहे. सर्वजण 4 थी पर्यंत कसेबसे मुला-मुलींना शिकवत आहेत. परंतू 5 वी पासून पुढे चांगल्या दर्जाचे शिक्षण कसे मिळेल या चिंतेने सर्वांना ग्रासले आहे. काहीजण मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी गाव सोडून बाहेरगावी जावून राहत आहेत. तर काहीजण मुलांना दुसऱ्या गावी निवासी शाळेत भरमसाठ फी देवून अॅडमिशन करून सोडून येत आहेत.
पण प्रत्येकाला बाहेरगावी जावून राहणे शक्य नाही किंवा मुलाला बाहेरगावी जावून निवासी शाळेत भरमसाठ फी देवून टाकणेही शक्य नाही, त्यामुळे शेतकरी, कामगार व कष्टकऱ्यांची मुलं आजोबा, पंजोबा आणि बापाप्रमाणेच या शैक्षणिक व्यवस्थेचे बळी पडून हतबल होतील आणि अपवाद सोडल्यास पुन्हा एक पिढी चांगल्या शिक्षणाअभावी प्रगती पासून वंचित राहील अशीच सध्याची परिस्थिती आहे.
मराठीत एक म्हण आहे की, म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, पण काळ सोकावतोय. अशीच काही सध्याची अवस्था आहे. खरं तर या सर्व प्रकाराला आपण जबाबदार असून एकप्रकार आपणच गुन्हेगार आहोत. जर वेळीच काही उपाययोजना केल्या नाही तर या लहान मुलांची पिढीच नव्हे तर येणाऱ्या पिढ्या सुध्दा आपल्या सर्वांना माफ करणार नाही यात शंका नाही.
सिर्फ हंगामा खडा करना मेरा मकसद नही,
सारी कोशिश है की ये सूरत बदलनी चाहिए,
मेरे सीने मे नही तो तेरे सीने में सही,
हो कहीं भी आग लेकीन आग जलनी चाहिए..
- परवेज पठाण (B.M.C.J.)
संपादक, एल्गार न्यूज