एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
काँग्रेस पक्ष सर्व समाजाला न्याय देणारा पक्ष आहे, पक्षाने कायम सर्व समाजाला प्रतिनिधीत्व देण्याचे काम केले आहे, परंतू यावेळेस काँग्रेस किंवा महाविकास आघाडीकडून राज्यातील 48 जागांपैकी एकही अल्पसंख्याक किंवा मुस्लिम उमेदवार का देण्यात आला नाही, असा सवाल माजी मंत्री तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते नसीम खान यांनी करत काँग्रेस पक्षाच्या स्टार प्रचारक व प्रचार समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे.
काँग्रेसचे नेते नसीम खान यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देत आपली भावना व्यक्त केली आहे. नसीम खान यांनी सांगितले की, माझी वैयक्तिक काही नाराजी नाही, मला मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकण, मुंबई अशा संपूर्ण महाराष्ट्रातून हजारो फोन येत आहेत, समाजातील नागरिक भेटत आहे.
मी पक्षामध्ये समाजाचे नेतृत्व करत आहे, त्यामुळे समाजाच्या विविध संघटना व नागरिक मला प्रश्न विचारत आहेत की, समाजाचा काय दोष आहे, काँग्रेसने किंवा महाविकास आघाडीने समाजाला का उमेदवारी दिली नाही. काँग्रेसला किंवा महाविकास आघडीला मुस्लिमांची फक्त मतेच हवी आहेत का ? 48 जागांवर एकही मुस्लिम उमेदवार सापडला नाही का ? असा सवाल समाजातील नागरिक फोन करून मला विचारत आहेत आणि माझ्याकडे त्यांच्या प्रश्नाचे उत्तर नाही.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, मराठवाड्यात समाज जवळपास 35 % आहे, विदर्भात 22 ते 25 % पेक्षा जास्त आहे, मुंबई मध्ये 26 ते 28 % आहे. इतर भागातही समाज मोठ्या संख्येने आहे. तरीही एकही अल्पसंख्याक समाजाचा उमेदवार पक्षाने दिला नाही, याचे उत्तर मिळणे आवश्यक आहे. समाज मला विचारत आहे त्यामुळे मी माझ्या पक्षाच्या स्टार प्रचारक व प्रचार समितीच्या पदाचा राजीनामा दिला आहे. मात्र मी पक्षामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करत राहणार आहे.
समाजाची भावना ही आहे की, काँग्रेस आमचा वोट तर घेते परंतू आम्हाला निवडणुकीसाठी उमेदवारी देत नाही, हा संदेश मी पक्षापुढे मांडणार आहे. पक्षाची आधीपासूनच परंपरा आणि भुमिका आहे की, सर्व समाजाला प्रतिनिधीत्व मिळाले पाहीजे, परंतू यावेळेस असे काय झाले की, समाजाचा एकही उमेदवार दिला नाही. समाजाची भावना लक्षात घेवून मी स्टार प्रचारक आणि प्रचार समितीचा राजीनामा दिला आहे.
मी काँग्रेस पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. पक्षाला नुकसान होईल असे मी काही करणार नाही, मी समाजाची भावना मांडत आहे. समाजाचे अनेक चांगले नेते महाराष्ट्रातील सर्व विभागात आहेत, परंतू एकाही जागेवर उमेदवारी देण्यात आली नाही, त्यामुळे आम्हाला वाईट वाटत आहे. पक्षाला वस्तुस्थिती समोर आणून देणे ही माझी जबाबदारी आहे. हा दबाव आणण्याचा प्रश्नच नाही. पक्षाचे नुकसान होवू नये म्हणून काळजी घेण्याचे काम पक्षाच्या नेतृत्वाने घ्यावे म्हणून मी पक्षासमोर वस्तुस्थिती मांडत आहे.
स्वातंत्र्य काळापासून पक्षाची भुमिका ही सर्व समाजाला न्याय देण्याची आहे. मात्र आता महाराष्ट्रात पक्षातील कोणी तरी ही भुमिका बदलून समाजाला बाजुला सारण्याचा प्रयत्न करत आहे असे दिसत आहे. जर समाजाला बाजूला सारून पक्षाला नुकसान पोहोचवण्याची पक्षातील कोण्या व्यक्तीची किंवा दलालाची भुमिका असेल तर हे पक्षासाठी घातक आहे.
मी जे बोलतोय ते माझं मत नंतर आहे, आधी समाजाची जी भावना आहे ते मी मांडत आहे. समाजाच्या भावनेकडे मला दुर्लक्ष करता येणार नाही. समाजातील संघटनांसह लोकांमध्ये तिव्र रोष आहे. समाजाने विचारलेल्या प्रश्नाशी मी पण अंशिक सहमत आहे. आमचा पक्ष लोकशाही माणनारा असून आम्हाला मत मांडण्याचा अधिकार आहे.
मी माझ्या कार्यकर्त्यांना व समर्थकांना आवाहन केले आहे की, कॉंग्रेसला मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे, आम्ही पक्षासाठी काम करतच राहणार आहे. महाराष्ट्रात पक्षामध्ये कोण आहे जो पक्षाला कमकुवत करत आहे ? वरिष्ठ नेत्यांची कोण दिशाभूल करून समाजाला वंचित ठेवण्याचा प्रयत्न करत आहे ? याचा शोध घेणे आवश्यक असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.