एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
भारतात सर्वाधिक बेरोजगार असल्याचे आयएलओ या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले असून हीच का मोदींची गॅरंटी असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव (जि.जालना) येथे दि.20 रोजी आयोजित महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर उमेदवार संजय जाधव, खा.फौजीया खान, आ.राजेश टोपे, राहुल पाटील, शिवाजी चोथे, राजेश राठोड, ए.जे.बोराडे, संतोष सांबरे, निसार देशमुख, लक्ष्मण वडले, सुदामराव शिंदे, सीताराम घनदाट, उत्तमराव पवार, अनिरूध्द शिंदे, गणेश काळे यांच्यासह महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी कार्यक्रर्ते उपस्थित होते.
पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी काय काम केले, शेतकऱ्यांसाठी काय केले, नागरिकांसाठी काय केले ? हे सांगण्याऐवजी विरोधी पक्षांवर टिका करत आहेत. मात्र त्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांना ते जेलमध्ये टाकत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही त्यांनी तुरुंगात टाकले. मोदींना सत्तेची मस्तीची आली आहे. महिनाभर दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले परंतू मोदींनी त्यांच्याकडे ढुंकूनही पाहीले नाही असेही शरद पवार यांनी सांगितले.
मोदींनी देशाला हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय ! – आदित्य ठाकरे
नरेंद्र मोदी यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नको आहे. मोदींनी देशाला हुकुमशाहीच्या उंबरठ्यावर आणून ठेवलंय, देशाला हुकुमशाही पासून वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येवून महाविकास आघाडीला बहुमताने विजयी करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
पुढे बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, जनतेने खूप अपेक्षा ठेवून भाजपाला सत्तेवर बसवले होते परंतू सर्वांचा भ्रमनिरास झाला. दहा वर्षात 15 लाख खात्यात आलेच नाही, उलट पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, गॅसचे दर वाढले, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली असेही सांगितले. यावेळी परभणी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार संजय (बंडू) जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचेही त्यांनी आवाहन केले.
तत्पूर्वी कार्यक्रमासाठी आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचे भाषण झाले, यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कृषि उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आयोजित या सभेला पोलीस प्रशासनाच्या वतीने चांगला बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.