एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
प्रशासनातील अधिकारी कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे वाळूमाफीयांना अच्छे आले आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. कारण घनसावंगी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर वाळूची तस्करी सुरू असून अवैधरित्या वाळूची वाहतुक केली जात आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, परभणी लोकसभा मतदार संघासाठी लवकरच मतदान होणार आहे, सदरील मतदारसंघात घनसावंगी तालुक्याचा देखील समावेश आहे. निवडणुकीमुळे
घनसावंगी तालुक्यातील प्रशासन व्यस्त आहे. मतदान शांततेत व व्यवस्थित पार पडावे म्हणून प्रशासन व पोलीस यंत्रणा प्रयत्नशील असल्याचे दिसत आहे. मात्र याचाच गैरफायदा वाळूमाफीया घेत असल्याचे दिसत आहे.
वाळूची अवैध वाहतूक !
घनसावंगी तालुक्यात गोदापात्रातून अवैधरित्या वाळूचे उत्खनन व वाहतुक सुरू आहे. तालुक्यात फक्त एकाच ठिकाणाहून नव्हे तर अनेक ठिकाणी गोदापात्रात वाळूचे अवैधरित्या उत्खनन व वाहतुक होत असल्यामुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडत आहे. मागील काळात वाळूची वाहने पकडून प्रशासनाच्या वतीने कारवाई देखील करण्यात आली परंतू विशेष काही फरक पडलेला दिसत नाही.
विना नंबर प्लेटची वाहने !
वाळूची अवैध वाहतुक करणाऱ्या वाहनांवर नंबर प्लेट नाही, अनेक वाहने विना नंबर प्लेटचीच तालुक्यातून ये-जा करत आहेत परंतू त्यांच्यावर कोणीही कारवाई करत नाही, विशेष म्हणजे आरटीओ विभागाचे अधिकारी सुध्दा तालुक्यात दिसून येत नाही, अर्थात त्यांनी वाहनांवर कारवाई केल्याचे दिसत नाही.
सोन्याचे अंडी देणारी कोंबडी !
वाळूचे टेंडर निघालेले नाहीत, त्यातच बांधकाम क्षेत्र वर्षभर चालू असते, त्यामुळे बांधकामासाठी वाळू आवश्यक असते. वाळूमाफीया याच बाबीचा गैरफायदा घेवून चढ्या दराने वाळूची विक्री करतात. वाळूमाफीयांवर अनेकदा कारवाई होते, दंड आकारला जातो परंतू तरीही वाळूची अवैध वाहतुक बंद होत नाही. कारण वाळूमाफीयांना वाळू ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी ठरत आहे.
भरधाव वाहने !
घनसावंगी तालुक्यात विविध रस्त्यांवरून आणि गावातून भरधाव वेगात वाहने जात असल्यामुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत आहे. शिवाय भरधाव वेगाने वाहने जात असल्यामुळे धुळीचा प्रचंड त्रास होत आहे, गाव शहरात असलेल्या दुकानांमध्ये मातीचे थर साचत आहेत. रस्त्यांवर प्रचंड धुळ उडत असल्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना मोठा त्रास होत आहे.
संयुक्त कारवाई आवश्यक !
वाळूचे अवैध उत्खनन व वाहतुक रोखण्यासाठी मर्यादित एका विभागाने कारवाई न करता महसूल, पोलीस व आरटीओ विभागाने संयुक्त कारवाई केल्यास बऱ्याच अंशी या गैरप्रकाराला आळा बसू शकेल. महसूल व पोलीस प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त असले तरी वाळूची अवैध वाहतुक करणारी वाहने समोरून जात असतील तर कारवाई होणे आवश्यक आहे कारण तसे न केल्यास नागरिकांमध्ये वेगळा संदेश जाईल.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.