एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
निवडणूक आयोगाकडून मतदान आणि निकालाची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वत्र आचारसंहिता लागू करण्यात आलेली आहे. निवडणूकीत गैरप्रकार होवू नये म्हणून निवडणूक आयोगाकडून विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे.
निवडणूक म्हटले की, पैशांचा गैरवापर अनेकदा ऐकायला मिळतो, पैसे, दारू, भेटवस्तू, मौल्यवान वस्तू इत्यादींचे अमिष दाखवून मतदारांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. अर्थात असे प्रकार आपल्याला मागील काळात ऐकायला मिळाले आहेत. मात्र आता निवडणूक विभाग यासाठी पाऊले उचलत असल्याची माहिती समोर येत आहे.
मोबाईल अॅपचा वापर !
निवडणूकीत पैशांचा गैरवापर होत असल्यास किंवा इतर गैरप्रकार होत असल्यास त्याबाबतची आणि तत्सम माहिती ESMS या मोबाईल अॅप मध्ये अपलोड केली जाणार असून सदरील माहिती निवडणूक विभागासह केंद्र आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील यंत्रणांनाही मिळणार आहे.
चेक पोस्टद्वारे तपासणी !
गैर प्रकार होण्याची शक्यता लक्षात घेवून निवडणूक विभागाकडून विविध ठिकाणी चेकपोस्ट तयार करण्यात येत असून विविध वाहनांची तपासणी सुध्दा करण्यात येत आहे. तपासणी मध्ये काही आढळून आल्यास त्याची नोंद ईएसएमएस अॅप मध्ये सुध्दा करण्यात येणार आहे. जेणेकरून विविध विभागाला कारवाईची माहिती उपलब्ध होईल.
विविध यंत्रणांचा समावेश !
निवडणूक आयोगा द्वारे कार्यान्वित करण्यात आलेल्या ESMS या अॅप द्वारे विविध विभागाला माहिती मिळणार आहे. ज्यामध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस, राज्य उत्पादन शुल्क तसेच केंद्र शासनाच्या अख्त्यारीतील आयकर विभाग व अंमलबजावणी संचालनालयाचाही समावेश करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
ED चे सुध्दा लक्ष !
देशभर ज्या यंत्रणेचे नाव चांगल्या- वाईट कारणांसाठी चर्चेत आहे किंवा बदनाम आहे ती यंत्रणा म्हणजे ED सुध्दा यावेळी निवडणूकीतील गैरप्रकाराकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र ईडी सर्वच पक्षांवर नजर ठेवणार आहे की फक्त मोजक्याच पक्ष उमेदवारांवर लक्ष ठेवणार आहे ? असा प्रश्नही सर्वसामान्य मतदारांच्या मनात येत आहे. काहीही असो, मात्र कोणाकडूनही पैशांचा गैरवापर होत असेल किंवा अमिष दाखवले जात असेल तर भेदभाव न करता जो गैरप्रकार करेल त्यावर कारवाई व्हावी एवढीच माफक अपेक्षा सर्वसामान्य मतदार व्यक्त करत आहे.
बुंदीचे नियोजन आधीच ?
ज्या प्रमाणे लग्न लागण्याआधीच बुंदी तयार होत असते, त्याचप्रमाणे विविध पक्षांनी अथवा उमेदवारांनी “अर्थपूर्ण” बुंदीचे नियोजन निवडणूकीच्या आधीच केले नसेल असे म्हणता येईल का ? आचारसंहितेच्या आधीच बुंदी ठिकाठिकाणी पार्सल झाली नसेल का ? असा प्रश्नही सर्वसामान्यांना पडला आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.