एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
जालना जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्या तक्रारी मांडता याव्यात, स्थानिक पातळीवर पाठपुरावा करूनही समस्या दूर होत नसेल तर यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाची स्थापना जालना जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, शासनाने यापूर्वीच जिल्ह्यात दुष्काळ अथवा दुष्काळ सदृष्य परिस्थिती जाहीर केलेली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडूनही विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यामध्ये विविध विभागांशी संबंधित असलेल्या समस्या जाणून त्या विभागाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.
सदरील नियंत्रण कक्षात उदाहरणार्थ जर गावात भीषण पाणी टंचाई असेल आणि गाव टंचाईग्रस्त घोषित करण्यात येवूनही पाण्याची समस्या दूर होत नसेल आणि नागरिकांनी ग्रामपंचायतसह पंचायत समिती, तहसील प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नसेल तर जिल्हा नियंत्रण कक्षाकडे तक्रार केल्यास नियंत्रण कक्षाकडून संबंधित विभागाला अथवा अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना देण्यात येणार असून सदरील समस्या दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.
विविध प्रश्न मांडता येणार !
जर बँका शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीबाबत तगादा लावत असतील तर या बाबतही जिल्हा नियंत्रण कक्षात तक्रार करता येईल. याशिवाय सहकारी कर्जाचे पुनर्गठन, कृषि पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सुट, विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, स्थानिक पातळीवर किंवा तालुका पातळीवर पाठपुरावा करूनही पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होत नसेल तर यासाठीही नियंत्रण कक्षाशी संपर्क करता येईल.
तसेच टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेती पंपाची वीजजोडणी खंडीत न करणे, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आदी विषयी तसेच इतर विविध विभागाशी संबंधित प्रश्न या नियंत्रण कक्षात मांडता येतील. जेणेकरून नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून सदरील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता येईल. तक्रारीसाठी प्रत्यक्ष किंवा 02482-223132 या क्रमांकावर संपर्क साधता येईल.
तक्रार निवारणासाठी प्रयत्न !
जालना जिल्ह्यातील विविध विभागाशी संबंधित नागरिकांच्या तक्रारी सोडवण्याच्या दृष्टीने जिल्हा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नागरिकांनी तत्पूर्वी ज्या विभागाशी संबंधित तक्रार आहे त्यांच्याकडे तक्रार केल्यास स्थानिक पातळीवरच समस्या सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र तरीही दुष्काळ निवारणाशी संबंधित उपाययोजना बाबत समस्या असल्यास नियंत्रण कक्षाशी संपर्क साधता येईल अशी प्रतिक्रिया निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिली आहे.