Your Alt Text

होय, मी पाण्‍याची टाकी बोलतेय ! मी कोसळण्‍याची शक्‍यता असून चिमुकल्‍या विद्यार्थ्‍यांचे जीव धोक्‍यात आहे !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज विशेष :-
होय मी पाण्‍याची टाकी बोलतेय, आता तुम्‍ही म्‍हणाल की असं कुठं असतंय व्‍हंय ! पाण्‍याची टाकी कुठे बोलत असते का ? पण काय करावं यंत्रणेला लोकांचं बोललेलं ऐकू यायना अन माझे दु:खही कोणालाही दिसायना त्‍यामुळे मी म्‍हटलं आता आपणच बोलावं, त्‍यामुळे आज मी मनमोकळेपणाने माझे दु:ख, माझी व्‍यथा मांडणार आहे.

तुम्‍ही तरीही म्‍हणाल की, पण पाण्‍याची टाकी कुठं बोलू शकते का ? अहो, तुम्‍ही तर पाण्‍याची टाकी म्‍हणताय, जर प्रशासकीय यंत्रणा अशीच मुकी, आंधळी आणि बहिरी राहील्‍यास पुढील काळात दगडं सुध्‍दा बोलू लागतील. असो, सुरूवात मी (पाण्‍याची टाकी) करत आहे आणि मी आपली भावना व्‍यक्‍त करत आहे.

मी पाण्‍याची टाकी बोलतेय !

माझा पत्‍ता विचाराल तर मी कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) येथील पोलीस चौकीच्‍या बाजुला 4 खिळखिळ्या पायांवर उभी आहे. ठिकठिकाणी मला तडे गेले आहेत. माझे वय अंदाजे 35 ते 40 आहे. माझ्या बाजुलाच अवघ्‍या 20 फुट अंतरावर लहान मुलांची जिल्‍हा परिषद शाळा आहे, जेथे असंख्‍य लहान मुले शिकतात, तेवढ्याच अंतरावर दोन अंगणवाड्या आहेत जेथे असंख्‍य चिमुकली मुलं येतात. सोबतच बाजुलाच पशु वैद्यकीय (जणावरांचा) दवाखाना आहे. म्‍हणजेच येथे मोठी वर्दळ असते.

सध्‍या मी एवढी जिर्ण आणि कमकुवत झाली आहे की, केव्‍हाही कोसळेल अशी परिस्थिती आहे. माझ्यात (टाकीत) जेव्‍हा पाणी भरले जाते तेव्‍हा मोठ्या प्रमाणावर पाणी खाली लिक होते, मोठ्या प्रमाणावर पाणी खाली पडून वाया जाते, एवढंच नव्‍हे तर माझ्यात (टाकीत) अर्धे पाणी जरी भरले तरी मी काहीशी डोलू लागते. तुर्तास ग्रामपंचायतने टाकीत पाणी भरणे थांबवले आहे. परंतू तरीही संकट टळलेलं नाही.

ज्‍या प्रमाणे एखादा माणूस एकाच जागेवर बराच वेळ उभा राहील्‍यास त्‍याचे पाय दुखू लागतात, तसंच काही माझं झालं आहे. वयोमानानुसार पाय खिळखिळे झाले आहेत, कमकुवत झाले आहेत, जिर्ण झाले आहेत आणि मला तडेही गेले आहेत. माझ्या जीवनाचा कालावधी संपलेला आहे यात शंका नाही, त्‍यामुळे मी केव्‍हा कोसळेल हे सांगता येत नाही.

जिवित हानीची शक्‍यता !

होय मी पाण्‍याची टाकी बोलतेय, माझी एक्‍सपायरी डेट संपलेली आहे, त्‍यामुळे मी केव्‍हा कोसळेल हे सांगता येत नाही, कारण अजून किती दिवस तग धरून उभं राहणार आहे. परंतू मला चिंता या गोष्‍टीची आहे की, जर अचानक मी कोसळले तर येथे लहान व चिमुकली मुले मोठ्या प्रमाणावर शाळेत आणि अंगणवाडीत येतात, मी अचानक कोसळले तर जिवित हानी होण्‍याची शक्‍यता आहे, एक किंवा अनेकांचा जीव जाण्‍याची शक्‍यता आहे. आणि जर अशी दुर्देवी घटना घडली तर त्‍याची जबाबदारी कोणाची ? याचा विचार ज्‍याने त्‍याने करावा.

जबाबदारी कोणाची ?

होय, मी पाण्‍याची टाकी बोलतेय, माझी अवस्‍था काही आज झालेली नाही, मागील काही वर्षांपासून पाण्‍याची टाकी खाली उरतरवून त्‍या जागी नवीन पाण्‍याची टाकी बांधण्‍याची मागणी आहे. माझा स्‍ट्रक्‍चरल ऑडीट झालेला आहे किंवा नाही याची माहिती नाही, आणि टाकी उतरवण्‍याबाबतचा प्रस्‍ताव सुध्‍दा वर गेलेला आहे किंवा नाही याचीही कल्‍पना नाही. तुर्तास ग्रामपंचायतने टाकीत पाणी भरणे बंद केले आहे.

तोंडाला कुलुप लागलाय !

होय, मी पाण्‍याची टाकी बोलतेय, खरं काय माहित नाही, माफ करा, पण गावात असंख्‍य लोकांची मानसिकता आंधळी, मुकी आणि बहिरी झाल्‍याची चर्चा ऐकायला मिळत आहे. त्‍यामुळे कदाचित काही अपवाद सोडल्‍यास लोकांना वर्षानुवर्षे अवती भवती घोंगावत असलेले विविध प्रश्‍न ऐकू येत नसावेत, दिसत नसावेत आणि दिसले तर त्‍यावर कोणी बोलत नसावं. दुसरं म्‍हणजे तालुक्‍याला बीडीओ कोण आहेत हे लोकांना अजून माहित नाही, म्‍हणजे त्‍यांचे दर्शनच झाले नाहीत, पंचायत समितीचे इतर अधिकारी गावात येत नाही, वरिष्‍ठ अधिकाऱ्यांना तर गावाचा रस्‍ताच माहित आहे का नाही असा प्रश्‍न पडतो. त्‍यामुळे आपलं दु:ख कोणासमोर मांडावं म्‍हणून या ऑनलाईन माध्‍यमातून आपलं गाऱ्हाणं मांडत आहे.

अनेक निर्जीव बोलणार !

होय मी पाण्‍याची टाकी बोलतेय, आज मी बोलायला सुरूवात केली आहे, पण यापुढेही तालुका, सर्कल आणि गावाच्‍या बाबतीत प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची उदासिनता अशीच राहिल्‍यास येत्‍या काळात कोणकोणत्‍या निर्जीव वस्‍तू बोलू लागतील याचा अंदाजही बांधता येणार नाही..

मग आता पुढं काय ?

होय, मी पाण्‍याची टाकी आता शेवटचं बोलतेय. मी जीर्ण आणि कमकुवत झाले असून कधी कोसळेल सांगता येत नाही. त्‍यामुळे भविष्‍यात काही दुर्घटना घडल्‍यास मला जबाबदार धरू नका. बाकी स्‍थानिक सर्व लोकप्रतिनिधी, अधिकारी, पंचायत समितीचे अधिकारी, जिल्‍हा परिषदेचे अधिकारी, तहसीलदार, जिल्‍हाधिकारी ज्‍यांना शक्‍य आहे त्‍यांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून लहान मुलांसह नागरिकांचा जीव जाणार नाही याची काळजी घ्‍यावी. एवढं सांगूनही तुमच्‍या लक्षात आलं नसेल तर तुमची पदं तुम्‍हालाच लख लाभो, माझं काम होतं पूर्वकल्‍पना द्याची ती मी दिली, बाकी तुमची मर्जी… मी पाण्‍याची टाकी बोलतेय, कदाचित पुन्‍हा बोलणं होणार नाही… नागरिकांनो, काळजी घ्‍या रे बाबाहो…. धन्‍यवाद….




व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी वर दिसत असलेल्‍या “जॉईन करा” या चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या व्‍हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!