एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी कृषि उत्पन्न बाजार समिती च्या कुंभार पिंपळगांव मुख्य बाजार पेठेत दर आठवड्याला म्हणजेच बुधवारी येणाऱ्या शेतकऱ्यांना जीवघेण्या कडक उन्हात उभं राहावं लागत असल्यामुळे बळीराजाचे जीव धोक्यात येत आहे. त्यामुळे कृषि उत्पन्न बाजार समितीचे लोकं थंडगार सावलीत अन बळीराजा सापडतोय उन्हाच्या तावडीत अशीच काही सध्याची परिस्थिती आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी कृषि उत्पन्न बाजार समिती अंतर्गत कुंभार पिंपळगांव येथे मुख्य बाजारपेठ आहे. अनेक एकर मध्ये बाजार समितीचा परिसर आहे. गावात आठवडी बाजार भरत असतो, तर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात बैलांचा बाजार व कापसासह भुसार माल खरेदी विक्रीचा बाजार भरत असतो. सदरील बाजारात मोठ्या संख्येने शेतकरी येत असतात. अर्थातच या बाजारात कोट्यावधीची उलाढाल होत असते.
उन्हामुळे शेतकरी त्रस्त !
कोट्यावधीची प्रॉपर्टी असलेल्या व आतापर्यंत कोट्यावधी रूपयांची कमाई केलेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पैसे नाही का ? असा सवाल शेतकरी करत आहेत. अक्षरश: बुधवारी आठवडी बाजारात भुसार माल खरेदी विक्रीचा परिसर असो किंवा बैलांचा बाजार असो हजारो शेतकऱ्यांना 40 ते 42 डिग्री उन्हात उभे रहावे लागत आहे.
सध्याच्या रखरखत्या उन्हात माणूस तासभर उभा राहील्यास त्याच्या जीवाला धोका पोहचेल अशी परिस्थिती दिसत आहे, मात्र सदरील बाजारात दिवसभर अन्नदात्या शेतकऱ्याला उभं रहावं लागत आहे. जो पर्यंत बैलांची खरेदी विक्री होत नाही तो पर्यंत शेतकरी उन्हात थांबलेले असतात. ही परिस्थिती काही आज नाही, वर्षानुवर्षे अशीच परिस्थिती आहे. तरीही कृषि उत्पन्न बाजार समितीला पाझर फुटलेला नाही.
सुविधांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !
कृषि उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना सावलीत बसण्याची व्यवस्था नाही. महिलांसह नागरिकांना शौचालयाची व्यवस्था नाही. शौचालय नसल्यामुळे महिलांसह शेतकऱ्यांना उघड्यावरच शौचास बसावे लागते.
शौचालयाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे परंतू कोट्यावधी रूपये कमावणाऱ्या कृषि उत्पन्न बाजार समितीला अजूनही शहाणपण आलेले नाही.
टॅक्स मात्र सर्वांकडून !
कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आठवडी बाजारात व्यापारी असो किंवा बैलाची खरेदी विक्री करणारे शेतकरी असो सर्वांना टॅक्स पावती घ्यावी लागते, मात्र सुविधा देण्याची वेळ आल्यास कृषि उत्पन्न बाजार समिती हात वर करत असल्याचे दिसत आहे. कोणत्याच सुविधा मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.
गाळेधारकांनाही सुविधा नाही !
कृषि उत्पन्न बाजार समितीने मागील काळात जवळपास 48 व्यापारी गाळे बांधले होते, ज्यामधून बाजार समितीला कोट्यावधी रूपये मिळाले होते, परंतू सदरील गाळेधारक व्यापाऱ्यांनाही कोणत्याही प्रकारची सुविधा नाही, शौचालय नाही, बाजार समितीच्या गाळेधारक व्यापाऱ्यांचा दररोज जमा होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे कुठलेही नियोजन नाही अथवा ग्रा.प.सोबत समन्वयही नाही. तसेच इतर सुविधा नसल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे.
पुढील नियोजन आहे का ?
सर्वसामान्य शेतकऱ्याला माल विक्रीसाठी आवश्यक त्या सुविधा आणि शेतकऱ्यांच्या भल्यासाठी कृषि उत्पन्न बाजार समितीने पुढील काही नियोजन केले आहे का ? काही आराखडा तयार केला आहे का ? आराखडा तयार केला असेल तर काही हालचाल केली आहे का ? की फक्त कागदोपत्रीच घोडे नाचवणे सुरू आहे ? असे प्रश्नही सर्वसामान्य शेतकरी उपस्थित करत आहेत.
पुढील भाग लवकरच…
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या जॉईन करा चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.
घनसावंगी तालुक्यातील बांधव आमचा 9890515043 हा क्रमांक आपल्या व्हाट्सअॅप ग्रुप मध्ये सुध्दा अॅड करू शकता.