एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव येथील ग्रामपंचायतला कायद्याचा विसर पडलाय की काय असा प्रश्न उपस्थित होवू लागला आहे, कारण एका क्षुल्लक गोष्टीसाठी ग्रामपंचायतने असंख्य व्यापारी व नागरिकांचा कचरा उचलण्यास नकार दिला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे गेल्या एक महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून घंटा गाडी बंद होती, गाडीचे टायर खराब झाल्यामुळे महिनाभर घंटागाडी बंद होती असे सांगितले जाते, टायर बदलायला ग्रामपंचायतकडे पैसे नाहीत का ? असा सवालही नागरिक उपस्थित करत होते, कसेबसे नवीन टायर टाकून घंटागाडी सुरू करण्यात आली.
घंटागाडी सुरू झाल्यामुळे नागरिकांची अडचण दूर होईल, आता सर्वांचा कचरा उचलला जाईल अशी आशा होती, मात्र ग्रामपंचायतकडून नवीनच फर्मान काढण्यात आला आहे, या फर्माननुसार फाटा म्हणजेच कृषि उत्पन्न बाजार समिती चौक तसेच अंबड पाथरी रस्त्यावरील व्यापारी व नागरिकांचा कचरा उचलण्यात येवू नये, कारण काय तर या फाट्यावरील व्यापाऱ्यांनी व्यवसाय कर भरला नाही.
भेदभाव करता येईल का ?
गांव काय आणि फाटा काय ? गावातील समस्त नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे हे ग्रामपंचायतचे कर्तव्य आहे. एखाद्या कारणामुळे ग्रामपंचायत नागरिकांना संबंधित सुविधेपासून वंचित ठेवू शकते का ? कायद्याने गावांतर्गत भेदभाव करता येतो का ? फाट्यावरील व्यापाऱ्यांनी कर भरला नसेल तर गावातील इतर व्यापाऱ्यांनी 100% कर भरला आहे का ? विशेष म्हणजे फाट्यावरच नुतन वसाहत सुध्दा आहे. त्यांनाही वंचित ठेवणार आहात काय ?
ग्रामपंचायतला कोट्यावधीचा विकास निधी येत आहे, इतर वेगवेगळ्या गोष्टीतून मोठी वसुली सुरू आहे तरीही ग्रामपंचायतला पैसे कमी पडत आहे की काय ? कर भरणा किंवा संकलन व्हायलाच पाहीजे, कर भरल्यावर विकासकामे करणे सोपे जाते, परंतू साध्या 2/4 मुलभत सुविधा अजून ग्रामपंचायत देवू शकत नसेल तर त्यांनी व्यापारी व नागरिकांना दोष देवून वंचित ठेवणे योग्य आहे का ? असा सवालही नागरिक करत आहेत.
व्यापाऱ्यांना कोणत्या सुविधा ?
कुंभार पिंपळगांवातील व्यापारी व सर्वसामान्य नागरिकांना सध्या कोण-कोणत्या सुविधा आहेत ते तरी ग्रामपंचायतने बोटावर मोजून दाखवावे. गावात शौचालय नाही, लघवीला कुठे जायचे याची सोय नाही, रस्त्यावर धुळीचा त्रास आहे त्याचे निराकरण नाही, नागरिकांना अजून पिण्यासाठी पाणी नाही, अनेक ठिकाणी रस्ते नाहीत, नाल्या तुंबलेल्या आहेत, अनेक भागात अंधार आहे. मग सुविधा कोणत्याच द्यायच्या नाहीत आणि सुविधेपासून वंचित ठेवण्याचे फर्मान काढायचे हा कुठला न्याय ? अशा प्रतिक्रियाही नागरिक देत आहेत.
स्वच्छतेसाठी मोठा निधी !
केंद्र आणि राज्य सरकारकडून पाणी पुरवठा आणि स्वच्छतेसाठी लाखो किंबहुना कोट्यावधीचा निधी ग्रामपंचायतींना दिला जातो, परंतू महिना महिना कचरा उचलला जात नसेल तर या पैशाचे होते काय ? स्वच्छतेसाठी आलेला निधी जातो कुठे ? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही.
ग्रामपंचायतचा पुढील पंचनामा लवकरच….
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
व्हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी वर दिसत असलेल्या “जॉईन करा” या चिन्हाला क्लिक करून आमच्या व्हाट्सअॅप ग्रुपला जॉईन व्हा.