Your Alt Text

कुं.पिंपळगांवसह घनसावंगी तालुक्‍यात तीव्र पाणी टंचाई ! उन्‍हाळा संपल्‍यावर पावसाळ्यात टँकर सुरू करणार आहात की काय ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
मुलभूत आणि जीवनावश्‍यक सुविधा पुरविणारी शासकीय यंत्रणा AC मध्‍ये बसून झोपा काढत असेल तर नागरिकांनी अपेक्षा ठेवायच्‍या तरी कोणाकडून असा प्रश्‍न सर्वसामान्‍य नागरिकांना पडला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव आणि तालुक्‍यात सध्‍या तिव्र पाणी टंचाई आहे. अनेक ठिकाणी विहीरीला पाणी नाही, घरातील बोअर आटले आहेत, त्‍यामुळे सर्वसामान्‍य नागरिकांना जीवघेण्‍या उन्‍हामध्‍ये पाण्‍यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

विकतचे पाणी !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांवसह तालुक्‍यात अनेक ठिकाणी सर्वसामान्‍य नागरिकांना खाजगी टँकर चालकाकडून विकतचे पाणी घ्‍यावे लागत आहे. एका कुटुंबाला 2 ते 3 दिवसाचे पाणी घेण्‍यासाठी 200 ते 300 रूपये मोजावे लागत आहे. मात्र मोलमजूरी करून पैसे फक्‍त पाणी विकत घेण्‍यातच घालायचे का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

कुंभार पिंपळगात टंचाई !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे तिव्र पाणी टंचाई असून अद्याप येथे प्रशासनाकडून पाण्‍याचे टँकर सुरू करण्‍यात आलेले नाही. पाणी पुरवठा योजना तर अर्धवट अवस्‍थेतच आहे. टँकरसाठी ग्रामपंचायतने प्रस्‍ताव पाठवला असेल तर प्रशासनाने अद्याप टँकर सुरू का केले नाही ? ग्रामपंचायतने प्रस्‍ताव पाठवण्‍यास अथवा मागणी करण्‍यास उशीर केला आहे का ? ग्रामपंचायत स्‍तरावरून पाठपुरावा करण्‍यात जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आले का ? असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत.

पशुधनाचाही प्रश्‍न !

घनसावंगी तालुक्‍यात फक्‍त नागरिकांनाच नव्‍हे तर पशुधनाच्‍या किंवा जनावरांच्‍या पाण्‍याचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे. अजून उन्‍हाळ्याच्‍या मध्‍यंतरीच अशी परिस्थिती आहे तर पुढील एप्रिल व मे महिन्‍यात कशी परिस्थिती असेल हीच चिंता पशुपालक शेतकऱ्यासंह नागरिकांना सतावत आहे.

ग्रामसेवकांची गैरहजेरी !

घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील ग्रामसेवक (ग्रा.वि.अ.) वारंवार गैरहजर राहत असल्‍यामुळे कुंभार पिंपळगांवात पिण्‍याच्‍या पाण्‍यासह इतर अनेक समस्‍या निर्माण झाल्‍या आहेत. आठवड्यातून चुकून एखाद्यावेळेस थोड्या वेळासाठी ग्रामसेवक दिसत असल्‍याचे नागरिक सांगत आहेत. त्‍यामुळे कुंभार पिंपळगांव येथील नागरिकांना मुलभूत सुविधांपासून वंचित रहावे लागत आहे.

SDM यांना खुर्ची सुटेना !

अंबडचे उपविभागीय अधिकारी आणि घनसावंगीचे तहसीलदार यांना कदाचित खुर्चीचा मोह जास्‍तच असावा त्‍यामुळे AC कॅबीन मध्‍ये असलेली खुर्ची त्‍यांना सुटत नसावी. सर्वसामान्‍य जनता पाण्‍यासाठी वणवण फिरत आहे, जनता पायपीट करून त्रस्‍ट झाली आहे. तरीही अधिकाऱ्यांना खुर्चीचा मोह काही सुटत नसल्‍याची प्रतिक्रिया नागरिक देत आहे.

प्रशासनाचे दुर्लक्ष !

ग्रामपंचायतला किंवा प्रशासनातील अधिकाऱ्यांना टँकर सुरू करण्‍यासाठी खिशातील पैसे खर्च करायचे आहेत का ? कुंभार पिंपळगांवसह तालुक्‍यात तीव्र पाणी टंचाई असतांना ग्रामपंचायत किंवा प्रशासन का दुर्लक्ष करत आहे ? उन्‍हाळा संपल्‍यावर पावसाळ्यात टँकर सुरू करणार आहात का ? असा सवालही सर्वसामान्‍य नागरिक उपस्थित करत आहेत.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!