एल्गार न्यूज विशेष :-
राज्यात शासकीय रूग्णालयांमध्ये मृत्यूचा तांडव सुरू असून नांदेड, छत्रपती संभाजीनगर पाठोपाठ आता नागपूर आणि इतर ठिकाणाहूनही मृत्यूच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे राज्यात आरोग्य व्यवस्था व्हेंटीलेटवर गेली आहे का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
अक्षरश: सदरील रूग्णांलयांमध्ये रूग्णांच्या नातेवाईकांचा आक्रोश पहायला मिळत आहे, मृतांमध्ये नवजात बाळांचा अथवा अर्भकांचा समावेश आहे. नांदेड मध्ये एका बेडवर दोन ते तीन बालकांवर उपचार सुरू होते अशी धक्कादायक माहिती सुध्दा समोर आली आहे.
सदरील मृत्यूला विविध कारणे देण्यात येत असली तरी काही प्रमुख कारण म्हणजे कर्मचाऱ्यांची कमतरता आणि औषधांचा तुटवडा हे प्रमुख कारण समोर येत आहेत. सत्ताधारी या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगत आहेत तर विरोधकांनी यासाठी सरकारला जबाबदार धरले आहे.
गोरगरीबांना खाजगी रूग्णालयात उपचार घेणे शक्य नसते त्यामुळे जिल्हाभरातील रूग्ण शासकीय रूग्णालयात दाखल होत असतात, परंतू आरोग्य यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे गोरगरीबांना आपला जीव गमवावा लागत आहे. कधी कर्मचारी कमी असल्यामुळे तर कधी औषधांचा तुटवडा असल्यामुळे आणि कधी आधुनिक सुविधा नसल्यामुळे रूग्णांना आपला जीव गमवावा लागत आहे.
रूग्णांच्या जीवाशी खेळ अजून किती दिवस चालणार ?
सामान्य औषधे सुध्दा शासकीय रूग्णालयात उपलब्ध राहत नसल्याचे समोर येत आहे, यापूर्वीही शासकीय रूग्णालयात औषधे उपलब्ध नसल्यामुळे रूग्णांच्या नातेवाईकांना बाहेरून खाजगी मेडिकलवरून औषधे आणण्याबाबतचे प्रकार समोर आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी मृत्यूचा तांडव सुरू असतांना आरोग्य यंत्रणा झोपा काढत आहेत का असा सवालही नागरिक विचारत आहेत.
उच्च न्यायालयाकडून दखल :-
राज्यात रूग्णांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई हायकोर्टाने या प्रकरणाची गंभीर दखल घेवून स्युओ मोटो याचिका दखल करून घेतली आहे, सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तात्काळ या प्रकरणी सुनावणी घेण्यात येणार असून सरकारला याबाबत आपले म्हणणे सादर करण्यास सांगितले आहे.