एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
गाव पातळीवर पाणी पुरवठ्याच्या अनेक समस्या वारंवार दिसून येतात, पाणी न येणे, पाणी पुरवठा दुषित होणे, पाणी पुरवठा योजना कार्यान्वीत न होणे, गुत्तेदाराचे कामाकडे लक्ष नसणे किंवा पाणी पुरवठ्या विषयी अनेक तक्रारी असतात, परंतू त्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी कोणतीही यंत्रणा दिसून येत नाही. मात्र आता ही अडचण दूर होणार आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने पाणी पुरवठ्या विषयीच्या समस्या सोडवण्यासाठी ऑनलाईन वेबपोर्टल (Maha Jal samadhan) आणि मोबाईल अॅप्लीकेशनची निर्मिती केली असून जनतेच्या सेवेत ऑनलाईन तक्रारीची सुविधाही सुरू करण्यात आली आहे.
राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह विभागाचे सचिव व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी ही सुविधा सुरू करण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागातील जनतेला पाणी पुरवठा सेवा विषयी भेडसावणाऱ्या समस्यांचे कमी कालावधीत निवारण करण्यासाठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या पुढाकाराने नागरिकांना वेब पोर्ट व मोबाईल अॅपच्या सहाय्याने तक्रार नोंदवता येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी नळ जोडणीसह पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र शासन पुरस्कृत जल जीवन मिशन हा महत्वकांक्षी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत कुटुंबांना नळजोडणीद्वारे 84.40 % कुटुंबांना पाणी पुरवठा करण्यात येत असून सन 2024 अखेरपर्यंत राज्यातील सर्व कुटुंबांना नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
सहज तक्रार करता येणार !
सर्वसामान्य नागरिकांना आपल्या मराठी भाषेत तक्रार करता यावी यासाठी ही प्रणाली विकसित करण्यात आली आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवल्यानंतर निवारणा बाबतची स्थिती मॅसेज किंवा ईमेलच्या माध्यमातून अवगत केली जाणार आहे.
तक्रार केल्यानंतर सदरील प्रणाली अंतर्गत ग्रामपंचायत स्तर, तालुका / उपविभाग स्तर व जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी यांच्या माध्यमातून त्यांना निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत तक्रार सोडविणे बंधनकारक असणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठ्या विषयी असलेल्या तक्रारी मार्गी लागण्यास मदत होणार आहे. खालील प्रमाणे विविध विषयांवर तक्रारी करता येणार आहेत.
पाणी गुणवत्ता
- पाण्याचा रंग बदललेला आहे.
- पाणी गढूळ येत आहे.
- पाण्याचा वास (दुर्गंध) येतो आहे.
- पाण्यामध्ये सांडपाणी मिसळले आहे.
- पाण्यामध्ये मैला मिश्रित पाणी मिसळलेले मिळाले आहे..
- पाण्यामध्ये कचरा, प्रदूषक, जंतू इ. येत आहेत.
- औद्योगिक कंपनीतून बाहेर पडणारे पाणी पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतामध्ये मिसळले आहे.
- साठवण टाकीची वेळचे वेळी साफसफाई होत नाही.
- पाणी मचुळ येत आहे.
- क्लोरोस्कोप द्वारे पाण्याची नियमित ओटी तपासणी केली जात नाही.
- एफटीके किट द्वारे तपासणी केली जात नाही.
- वर्षातून दोन वेळा जैविक तपासणी केली जात नाही.
- रासायनिक तपासणी केली जात नाही.
- दैनंदिनरित्या क्लोरिनीकरणाद्वारे पाणी शुद्धीकरण केले जात नाही.
- जलशुद्धीकरण केंद्रामध्ये वेळचे वेळी शुद्धीकरण केली जात नाही.
- ग्रामपंचायत स्तरावर एफटीके किट(क्षेत्रीय तपासणी संच) उपलब्ध नाही.
- ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध असलेले एफटीके किट(क्षेत्रीय तपासणी संच) वापरण्यास अयोग्य आहे.
- टिसीएल पावडर ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध नाही.
- टिसीएल पावडरचा विहित कालावधी संपूनही वापरली आहे.
पाणी पुरवठा उपांगे :-
- स्त्रोत / पंप घरातील मोटर नादुरुस्त आहे.
- पंपघरातील इलेक्ट्रिकल बोर्डमध्ये खराबी आहे.
- जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त आहे.
- साठवण टाकीवर चढायची शिडी नादुरुस्त आहे.
- जलमापक (पाण्याचा मिटर) नादुरुस्त आहे.
- ग्रामपंचायतीद्वारे नियमितपणे योजनेची देखभाल दुरुस्ती केली जात नाही.
पाणी पुरवठा सेवे विषयी :-
- पाणी पुरवठा योजनेंतर्गत आय.एस.आय. प्रमाणित साहित्य वापरले गेलेले नाही.
- काही वैयक्तिक घरांना अर्धा इंचीपेक्षा जास्त इंचाची पाईपलाईन बसविली आहे.
- नळ जोडणी देण्यात आलेली नाही.
- नळ जोडणी घराच्या आवारात देण्यात आलेली नाही.
- नळ जोडणी चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेली आहे.
- मुख्य जलवितरण व्यवस्थेमधून पाणी चोरी केली जात आहे.
- वैयक्तिक नळाला अनधिकृतपणे मोटर बसविली आहे.
- स्त्रोतापासून गावापर्यंत येणाऱ्या पाईपलाईनमध्ये (उर्ध्ववाहिनी) गळती आहे.
- स्त्रोतापासून गावापर्यंत येणारी पाईपलाईन (उर्ध्ववाहिनी) गंजली आहे.
- साठवण टाकीस गळती आहे.
- गावातील वितरण व्यवस्थेमध्ये गळती आहे.
- पिण्याच्या पाण्याचा स्त्रोत दुषित झाला आहे.
- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताला पुरेसे पाणी उपलब्ध नाही.
- पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोताच्या आजूबाजूला घाण / कचरा साचलेला आहे.
- असमान पाणी पुरवठा होत आहे.
- कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.
- दैनंदिन पाणी पुरवठा होत नाही.
- वेळेवर पाणीपुरवठा होत नाही.
- नळाला पाणी आलेले नाही.
पाणी शुल्क :-
- पाणी शुल्क देयक भरलेले असून अद्याप अद्यावत केलेले नाही.(थकीत दाखवण्यात आले आहे).
- थकित पाणी शुल्क भरुन सुद्धा नळ जोडणी पूर्ववत करण्यात आलेली नाही.
- पाणी शुल्क देयक जास्तीचे मिळालेले आहे.
- घरगुती नळ जोडणी दिली आहे परंतु त्याचा व्यावसायिक वापर केला जात आहे.
- घरगुती नळजोडणी दिली आहे परंतु देयकाची आकारणी व्यवसायिक केली आहे.
पाणी पुरवठा योजने विषयक माहिती :-
- पाणी पुरवठा योजनेसंबंधित माहिती मागूनही दिली नाही.
- योजनेच्या कंत्राटदाराची माहिती मागूनही दिली नाही.
- योजनेच्या प्रगती विषयक माहिती मागूनही दिली नाही.
- पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आलेले नाही.
इतर :-
या पर्याया मध्ये वर नमूद केलेल्या समस्यांव्यतिरिक्त इतर कोणतीही समस्या यामध्ये समाविष्ट होईल.
तक्रार कशी व कोठे करायची ?
महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या http://mahajalsamadhan.in या पोर्टलवर गेल्यास “तक्रार नोंदवा” असा पर्याय दिसेल, त्याला क्लिक केल्यावर एक फॉर्म आपल्याला दिसेल. त्यामध्ये माहिती भरावी लागेल. यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, गांव, वाडी, वस्ती, तक्रारदाराचे नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, पत्ता इत्यादी माहिती भरावी लागेल, त्याखाली तक्रारीची वर्गवारी निवडल्यानंतर तक्रारीचे थोडक्यात विवरण द्यावे लागेल. आपण 3 कादगपत्रे सुध्दा अपलोड करू शकता. तसेच पुढील टॅप मध्ये 3 फोटो सुध्दा अपलोड करू शकता. ज्याची साईज 5 एम.बी. पर्यंत असावी.
त्याखाली कॅप्चा म्हणजे बाजूला दिसत असलेले अक्षर (लहान मोठे जशास तसे) कॅप्चा बॉक्स मध्ये टाकून “सादर करा” या टॅबला क्लिक करावे. आता आपली तक्रार नोंदवली जाईल आणि आपणास मोबाईलवर मॅसेज च्या माध्यमातून त्याची सद्यस्थिती कळविली जाईल.
तक्रारीसाठी येथे क्लिक करा…
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.