Your Alt Text

डीजे लावून नियम – कायद्याचे उल्‍लंघन करणाऱ्यांवर पोलीस गुन्‍हे दाखल करणार !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
डीजे व ध्‍वनी प्रदुषणाबाबत मा.उच्‍च न्‍यायालयाचे आदेश असतांनाही या आदेशाची पायमल्‍ली करत राजरोसपणे डीजे वाजवला जात आहे, अर्थातच यामुळे न्‍यायालयाच्‍या आदेशाचा अवमान होत असल्‍यामुळे पोलीस प्रशासन कारवाई करण्‍याच्‍या तयारीत आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, जालना जिल्‍ह्यातील घनसावंगी तालुक्‍यात बहुतांश वेळा कार्यक्रम, लग्‍न समारंभ, वाढदिवस व इतर विविध कारणासाठी सर्रासपणे डीजे लावून हैदोस घातला जात आहे. विशेष म्‍हणजे ध्‍वनी प्रदुषणाचे सर्व नियम धाब्‍यावर बसवून अनेक पटीने आवाज वाढवून अक्षरश: नियमांची पायपल्‍ली करण्‍यात येत आहे.

मा.उच्‍च न्‍यायालयाचे आदेश !

काही दिवसांपूर्वी मुंबई उच्‍च न्‍यायालयाच्‍या औरंगाबाद खंडपीठाने आदेश दिले होते की, ध्‍वनी प्रदुषण झाल्‍यास औरंगाबाद खंडपीठाच्‍या कार्यक्षेत्रातील 12 जिल्‍ह्यातील प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी आदी प्रतिवादींवर न्‍यायालयाच्‍या अवमाननेची कारवाई करण्‍यात येईल असा सक्‍त आदेश दिला होता. आदेश पारीत करतांना खंडपीठाने ऑगस्‍ट 2016 च्‍या जनहित याचिकेचा संदर्भ सुध्‍दा दिला होता.

…तर न्‍यायालयाचा अवमान !

मा.उच्‍च न्‍यायालयाने आदेश देवूनही जर आदेशाचे पालन होत नसेल तर हा मा.न्‍यायालयाचा अवमान समजला जातो, ज्‍या ठिकाणी या आदेशाचे पालन होणार नाही त्‍या ठिकाणच्‍या संबंधित अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाणार आहे.

डीजेमुळे अनेकांचा मृत्‍यू !

DJ मुळे फक्‍त ध्‍वनी प्रदुषणच होत नाही तर यामुळे हार्ट अटॅक किंवा तत्‍सम कारणांमुळे मृत्‍यू सुध्‍दा होवू शकतो आणि अशा अनेक घटना आतापर्यंत घडल्‍या आहेत. एवढंच नव्‍हे तर अति आवाजामुळे किंवा ध्‍वनी प्रदुषणामुळे बहिरेपणा, चिडचिडेपणा, उच्‍च रक्‍तदाब, तणाव, स्‍मृतिभ्रंष, निद्रानाश, राग तसेच डिप्रेशनसारखे आजार जडतात.

कुंभार पिंपळगांवात सर्व नियमांची पायमल्‍ली !

कुंभार पिंपळगांवात डीजेमुळे सर्व मर्यादा ओलांडण्‍यात येत आहेत. फक्‍त मर्यादा ओलांडण्‍यात येत नाहीत तर अक्षरश: कायदे नियम पायदळी तुडवले जात आहेत. ध्‍वनी प्रदुषण नियमांच्‍या अनेक पटीने आवाज वाढवून अक्षरश: हैदोस घातला जात आहे. अर्थातच आमचे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही या अविर्भावात डीजे वारंवार लावला जात आहे.

आतापर्यंत इतर कार्यक्रमांना डीजे दिसून येत होता परंतू आता वाढदिवसाला सुध्‍दा डीजे लावला जात आहे, आवाजाची मर्यादा एवढी वाढवली जात आहे की, अनेक किलोमिटर पर्यंत आवाज ऐकू येईल. प्रचंड आवाजामुळे घरात आजारी असणारे वयोवृध्‍द व्‍यक्‍ती, लहान मुले यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. आवाजाची तिव्रता एवढी वाढवली जात आहे की, घरात, दुकानात ठेवलेल्‍या वस्‍तू सुध्‍दा खाली पडून नुकसान होत आहे.

डीजे मालकावर गुन्‍हा दाखल !

काही दिवसांपूर्वी डीजे वाजवल्‍याबद्दल डीजे मालकावर घनसावंगी पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करून त्‍याचा डीजे जप्‍त करण्‍यात आला होता, परंतू काही दिवस उलटत नाही तोच पुन्‍हा गावात डीजे वाजवण्‍यात आले, परंतू पोलीसांकडून कोणत्‍याही प्रकारची कारवाई करण्‍यात आली नाही. त्‍यामुळे नागरिकांमध्‍ये तर्कवितर्क लावले जात आहेत.

कारवाईचा इशारा !

घनसावंगी पोलीस ठाण्‍यास नव्‍याने रूजू झालेले पोलीस निरीक्षक आनंदसिंग साबळे व कुंभार पिंपळगांव चौकीला नव्‍याने रूजू झालेले सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक खरात या दोन्‍ही अधिकाऱ्यांनी डीजे बाबत कडक कारवाईचा इशारा दिला आहे. डीजेला परवानगी नाही, डीजे वाजवून नियमांचे उल्‍लंघन केल्‍यास कारवाई करण्‍यात येईल असे त्‍यांनी सांगितले आहे. त्‍यामुळे पुढील काळात डीजे लावल्‍यास संबंधितांवर गुन्‍हे दाखल होवून कारवाई होण्‍याची शक्‍यता आहे.


इतर प्रमुख बातम्‍या खाली पहा…

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!