एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी, जि.जालना) येथे तातडीने ग्रामीण रूग्णालय मंजूर व्हावे यासाठी कुंभार पिंपळगांव व परिसरातील जवळपास 800 पेक्षा जास्त नागरिकांच्या सह्यांचे निवेदन व ग्रामपंचायत ठराव तालुक्यातील लोकप्रतिनिधी, वरिष्ठ नेते, जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाला देण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, कुंभार पिंपळगांव (ता.घनसावंगी) हे तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे ठिकाण असून या परिसरातील 40 ते 50 गावांचा संपर्क आहे. येथे जवळपास 40 वर्षांपासन प्राथमिक आरोग्य केंद्र असून परिसरातील गावातून मोठ्या संख्येने रूग्ण येथे येत असतात. येथे सद्यपरिस्थितीत कार्यरत असलेली आरोग्य यंत्रणा पूर्णत: कोलमडलेल्या अवस्थेत आहे.
40 ते 50 गावातील रूग्ण
कुंभार पिंपळगांव येथे एमर्जन्सी (तातडीचे) उपचार मिळत नसल्याने गोरगरीब व सर्वसामान्य रूग्णांना तालुका किंवा जिल्हास्तरावर अथवा खाजगी दवाखान्यात जावे लागते, त्यामळे रूग्णांना नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. परिसरातील गावांचा विचार केल्यास जवळपास 40 ते 50 गावातील रूग्ण या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार मिळेल या आशेने येत असतात परतू येथे असलेल्या अपुऱ्या सुविधेमुळे रूग्णांना परत जावे लागते. विशेष म्हणजे कुंभार पिंपळगांव शहरात दररोज सरकारी व खाजगी दवाखान्यात मिळून शेकडो रूग्ण उपचारासाठी येत असतात.
महामार्गावरील अपघात…
कुंभार पिंपळगांव ते पाथरी (जि.परभणी) 42 कि.मी. आणि कुंभार पिंपळगांव ते घनसावंगी 20 किमी असे जवळपास 62 कि.मी. ग्रामीण रूग्णालय नाही. तसेच कुंभार पिंपळगांव ते परतूर 35 कि.मी. ग्रामीण रूग्णालय नाही. तसेच नव्याने होत असलेले राज्य महामार्ग क्र.222 रांजणी ते कुंभार पिंपळगांव मार्गे राजाटकळी उक्कडगांव या अंदाजे 50 कि.मी. रस्त्यावर मध्ये कोठेही अपघात झाल्यास ग्रामीण रूग्णालय नाही. शिवाय कुंभार पिंपळगांव व परिसरातील 40 गावांमध्येही अपघातग्रस्त व्यक्तीवर उपचाराची सुविधा नाही.
प्रा.आ.केंद्र व उपकेंद्र
कुंभार पिंपळगांव परिसरात 4 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत ज्यामध्ये कुंभार पिंपळगांव, राजाटाकळी, पिंपरखेड बु., आणि जिरडगांव यांचा समावेश आहे. तसेच या 4 प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत म.चिंचोली, राजेगांव, जांबसमर्थ, गुंज बु., मुर्ती, बानेगाव, कंडारी, अंतरवाली टेंभी या उपकेंद्रांचा समावेश आहे.
इतर तालुक्यांनाही फायदा
कुंभार पिंपळगांव पासून 10 कि.मी. अंतरावर गोदावरी नदी आहे, तसेच गोदावरी नदी लगत असलेल्या उक्कडगांव येथे राज्य महामार्ग क्र.222 अंतर्गत नदीवर पुलाचे बांधकाम सुरू आहे. गोदावरी नदीच्या पलीकडे बीड जिल्ह्याची हद्द असून गोदावरी नदी लगत असलेल्या माजलगांव व गेवराई या 2 तालुक्यातील अनेक गावांना सुध्दा कुंभार पिंपळगांव येथे ग्रामीण रूग्णालय झाल्यास मोठा फायदा होवू शकतो. गोदावरी नदीच्या पलीकडील गावांना माजलगांव किंवा गेवराई येथील ग्रामीण किंवा उपजिल्हा रूग्णालयाचे अंतर लांब असल्याने कुंभार पिंपळगांव येथील ग्रामीण रूग्णालय सोयीस्कर ठरेल.
महामार्गावर वर्दळ
कुंभार पिंपळगांव येथून अंबड-पाथरी हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्यावर छत्रपती संभाजीनगर, अंबड, आष्टी, पाथरी, परभणी, माजलगांव, परभणी, नांदेड इत्यादी तालुके व जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने वाहनांची वर्दळ असते. या महामार्गावर वारंवार अपघात होत असतात. मागील काळात अपघातग्रस्त व्यक्तीला वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे रूग्णांना जीव गमवावा लागला आहे. तसेच कुंभार पिंपळगांवात महिलांचे विविध आजार व प्रसुतीसाठी आवश्यक व तातडीची सेवा उपलब्ध होत नसल्यामुळे रूग्णांना पुढे पाठवावे लागते.
तिर्थक्षेत्रांनाही होईल फायदा
समर्थ रामदास स्वामी यांचे जन्मस्थान असलेले तिर्थक्षेत्र जांबसमर्थ हे कुंभार पिंपळगांव येथून 7 कि.मी. अंतरावर आहे. जांबसमर्थसह, कोठाळा, उक्कडगाव, गुंज बु., राजाटाकळी, पिंपरखेड बु., देवी दहेगांव हे तिर्थक्षेत्र सुध्दा कुंभार पिंपळगांव परिसरातच आहेत. या गावातील तिर्थक्षेत्र यात्रेत दरवर्षी उत्सव व दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने येत असतात. त्यांनाही उपचाराची सुविधा मिळेल.
रूग्णांची मोठी संख्या
कुंभार पिंपळगांव शहराची लोकसंख्या 20 ते 25 हजार आहे. शिवाय परिसरातील 40 ते 50 गावातील लोकसंख्या गृहीत धरल्यास हा आकडा खूप मोठा होतो. कुंभार पिंपळगांवात अंदाजे 40 खाजगी दवाखाने आहेत. यावरून या शहरात किती रूग्ण येत असतील याचा अंदाज लावता येईल. आजघडीला घनसावंगी येथील ग्रामीण रूग्णालयात गोदाकाठच्या गावातील रूग्णांना जायचे असेल तर जवळपास 35 ते 40 कि.मी. अंतर कापून जावे लागते. अशा परिस्थितीत एखाद्या रूग्णाला तातडीच्या उपचाराची गरज भासल्यास काय करावे हा प्रश्न निर्माण होतो.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करून “कुंभार पिंपळगांव” येथे विशेष बाब म्हणून तातडीने “ग्रामीण रूग्णालय” मंजूर करावे अशी मागणी कुंभार पिंपळगांव व सर्कल मधील नागरिकांनी केली आहे. निवेदनावर कुंभार पिंपळगांव व सर्कल मधील जवळपास 800 नागरिकांच्या सह्या आहेत. सोबत कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतचा ठराव सुध्दा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरील निवेदन कोणत्याही पक्ष, संघटना किंवा व्यक्तीकडून देण्यात आलेले नाही. तर समस्त नागरिकांच्या वतीने देण्यात आले आहे.
मान्यवरांना निवेदन सादर
निवेदनाची प्रत राष्ट्रवादीचे आमदार राजेश टोपे, माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, शिवसेना सहसंपर्कप्रमुख हिकमत उढाण, भाजप नेते व समृध्दी कारखान्याचे चेअरमन सतिष घाटगे पाटील, माजी जि.प.अध्यक्ष किर्तीताई उढाण व माजी जि.प.सदस्य शामनाना उढाण, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) चे प्रदेश कार्यकारीणी सदस्य रविंद्र तौर यांच्यासह जिल्हाधिकारी जालना, जिल्हा शल्य चिकित्सक जालना, मुख्यमंत्री जिल्हा कक्ष यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
तसेच ईमेलच्या माध्यमातून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव, अवर सचिव, आयुक्त, संचालक, सहसंचालक, उपसंचालक, राज्य कार्यक्रम व्यवस्थापक, विभागीय आयुक्त इत्यादींना पाठवण्यात आले आहे.