Your Alt Text

कुंभार पिंपळगाव पोलीस चौकीला 1 अधिकारी 2 कर्मचारी ! वाहन व कर्मचाऱ्यांअभावी तारेवरची कसरत सारी !

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव व परिसरातील गावांमध्‍ये कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍यासाठी आवश्‍यक असलेली यंत्रणा कार्यान्‍वित करण्‍यात वरिष्‍ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे का असा प्रश्‍न आता सर्वसामान्‍य नागरिकांना पडू लागला आहे.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव हे तालुक्‍यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे शहर आहे, येथे जवळपास 1000 पेक्षा जास्‍त व्‍यापारी दुकाने आहेत, राष्‍ट्रीयकृत बँका व इतर डझनभर बँक, मल्टिस्‍टेट व पतसंस्‍था आहेत. अनेक शाळा, महाविद्यालये आहेत, बस स्‍थानक, कृषि उत्‍पन्‍न बाजार समिती आहे. येथे तालुक्‍यातील सर्वात मोठा आठवडी बाजार बुधवारी भरत असतो. ज्‍यामध्‍ये अंदाजे 50 हजार नागरिक येत असतात.

चोऱ्यांचे प्रमाण वाढले !

कुंभार पिंपळगांव व सर्कल मध्‍ये चोऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. विशेष करून मोटारसायकल व मोबाईल चोरांचे प्रमाण तर खूप वाढले आहे. आठवडाभरात एक किंवा दोन मोटारसायकल चोरीला गेल्‍याचे कायमच ऐकायला मिळत आहे. विशेष म्‍हणजे मागील काळात चोरीला गेलेल्‍या कोणत्‍याही मोटारसायकल चोरीचा तपास लागलेला दिसत नाही. शिवाय आठवडी बाजारात मोबाईल चोरीच्‍या घटनाही खूप वाढल्‍या आहेत. अर्थातच मोबाईल चोरांचाही तपास लागलेला नाही. एवढं कमी होतं की काय आता बैल किंवा इतर जनावरे चोरीला जाण्‍याच्‍या घटनाही वाढल्‍या आहेत.

पोलीसांवर ताण !

कुंभार पिंपळगांव शहराची लोकसंख्‍या अंदाजे 20 ते 25 हजार आहे. शिवाय इतर 18 ते 20 गाव, तांडे, वाड़्या वस्‍त्‍या मिळून ही संख्‍या मोठी आहे. कुंभार पिंपळगांव पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या अनेक गावांचे अंतर 10 ते 20 कि.मी आहे. मग कुंभार पिंपळगांव अंतर्गत संवेदनशील गावे असतांना अशावेळेस एक अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांच्‍या जीवावर कायदा व सुव्‍यवस्‍था राखणे शक्‍य आहे का ? याचा विचार वरिष्‍ठ अधिकाऱ्यांनी करणे गरजेचे आहे.

अवैध धंदे कसे रोखणार !

कुंभार पिंपळगांवसह परिसरातील 18 ते 20 गावांमधील अवैध धंदे, वाळूची अवैध वाहतुक, भांडण, तंटे, कार्यक्रम इत्‍यादी गोष्‍टींवर 1 अधिकारी आणि 2 कर्मचारी नियंत्रण ठेवू शकतात का ? 1 अधिकारी 2 कर्मचारी एवढ्या मोठ्या सर्कलची कायदा व सुव्‍यवस्‍था राखू शकतात का ? शेवटी ते पण माणसंच आहेत, याचाही विचार वरिष्‍ठांनी करणे गरजेचे आहे.

वाहनांची प्रचंड संख्‍या !

कुंभार पिंपळगांव शहरातून अंबड पाथरी हा महामार्ग गेलेला आहे. महामार्ग झाल्‍यापासून या मार्गे एका दिशेने नांदेड, परभणी, मानवत, पाथरी, माजलगांव, आष्‍टी तर दुसऱ्या दिशेने छत्रपती संभाजीनगर, पैठण, अंबड, जालना अशा अनेक तालुके आणि जिल्‍ह्यातून वाहने ये-जा करत आहेत. तसेच रांजणी ते उक्‍कडगांव या महामार्गाचे काम सुध्‍दा सुरू आहे. शिवाय ऊसाचे ट्रक आणि ट्रॅक्‍टरही मोठ्या प्रमाणावर या मार्गावरून जात आहेत, अर्थातच रहदारी वाढल्‍यामुळे छोटे मोठे अपघात नियमित घडत आहेत. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे तसेच गस्‍तीचे वाहन नसल्‍यामुळे महामार्गावर लक्ष ठेवणे अवघड आहे.

गस्‍तीसाठी वाहन नाही !

दिवसाही गस्‍तीसाठी वाहन गरजेचे आहेच, मात्र रात्रीच्‍या चोऱ्यांचे प्रमाण वाढल्‍यामुळे रात्री पोलीसांची वाहनासह गस्‍त असणे नक्‍कीच आवश्‍यक आहे. मोटारसायकलवर फिरणे आणि चारचाकी सायरन असणाऱ्या वाहनात फिरणे यात फरक आहे. त्‍यामुळे कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍याच्‍या दृष्‍टीने आणि कुंभार पिंपळगावसह परिसरात गस्‍त घालण्‍याच्‍या दृष्‍टीने चारचाकी वाहन कायमस्‍वरूपी देणे आवश्‍यक आहे.

वरिष्‍ठांनी लक्ष देणे गरजेचे !

खरं तर कुंभार पिंपळगांवला पोलीस ठाणे व्‍हावे ही अनेक वर्षांपासूनची मागणी होती आणि आहे परंतू त्‍याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्‍यात आले. किमान गांव आणि सर्कलची लोकसंख्‍या आणि कायदा व सुव्‍यवस्‍था राखण्‍याच्‍या दृष्‍टीने वरिष्‍ठांनी कुंभार पिंपळगांवला कायमस्‍वरूपी गस्‍त घालण्‍याच्‍या दृष्‍टीने चारचाकी वाहन द्यावे तसेच किमान 10 कर्मचारी तरी द्यावे अशी मागणी कुंभार पिंपळगांव सर्कल मधील नागरिकांनी केली आहे.

याबाबत घनसावंगी पोलीस ठाण्‍याचे नवनियुक्‍त पोलीस निरीक्षक श्री.साबळे यांना विचारले असता, तात्‍पुरत्‍या स्‍वरूपात एक वाहन कुंभार पिंपळगांव पोलीस चौकीला देण्‍यात येत आहे. शिवाय कर्मचारीही वाढवून देण्‍यासाठी प्रयत्‍न केले जातील असे त्‍यांनी सांगितले.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

नि:पक्ष, निर्भीड व रोखठोक बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!