एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे घरोघरी कचरा साचला असून गेल्या 8 दिवसांपासून बंद पडलेल्या घंटागाडीचे टायर बदलण्यासाठी ग्रामपंचायतकडे पैसे नाहीत का ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे ग्रामपंचायत द्वारे सुरू असलेल्या घंटागाडीचे टायर खराब झाल्याचे सांगण्यात आले होते, शिवाय इतर छोटीशी तांत्रिक अडचण असल्याचेही सांगण्यात आले होते, ग्रामपंचायतकडून कचऱ्याचा प्रश्न उदभवू नये म्हणून टायर व इतर तांत्रिक अडचण तात्काळ दूर होईल अशी अपेक्षा होती.
मात्र जवळपास 8 ते 10 दिवसांचा कालावधी उलटूनही घंटागाडी सुरू झालेली नाही. विविध विकास कामे व योजनांच्या माध्यमातून ग्रामपंचायतला कोट्यावधीचा निधी येतो, मात्र तरीही ग्रामपंचायतकडे घंटागाडीचे टायर बदलण्यासाठी पैसे नाहीत का ? असा प्रश्न गावकऱ्यांना पडला आहे.
जागोजागी घाण व कचरा !
घंटागाडी बंद असल्यामुळे गावात जेथेतेथे घाण व कचरा दिसून येत आहे. घरांमधून दररोज निघणारा कचरा नेमका टाकायचा कुठे ? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. कचऱ्याची घंटागाडी आज येईल, उद्या येईल या आशेत घरात सुद्धा मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून 8 ते 10 उलटले तरी ग्रामपंचायतला अजून जाग आलेली नाही.
ग्रामसेवकांची गैरहजेरी !
गटविकास अधिकारीच ठिकाणावर नसल्यावर इतर अधिकाऱ्यांकडून तरी अपेक्षा कशी करावी. कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी हे आठवड्यातून 2 दिवस दर्शन देत असल्याचे गांवकरी सांगत आहेत, विशेष म्हणजे सदरील ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत पासून लांब अंतरावर असलेल्या हॉटेल मध्ये बसून “अर्थपूर्ण” सह्या देत आहेत आणि परत जात आहेत असेही मत अनेकांनी व्यक्त केले आहे.
आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास !
20 ते 25 हजार लोकसंख्या असलेल्या गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी नाही. ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे दुसऱ्या गावचा अतिरिक्त चार्ज असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे ते अवघे 2 दिवस कुंभार पिंपळगांव ग्रामपंचायतला देत असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यातही ते बाहेर हॉटेल मध्ये बसून अर्थपूर्ण सह्या करून परत जात असतील तर गावाचा विकास होणार कसा ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
कचऱ्याचा प्रश्न गंभीर !
खरं तर कुंभार पिंपळगांवला 2 घंटागाड्या आवश्यक आहे, मात्र एकाच घंटागाडीवर पूर्ण गावाचा भार आहे. गेल्या 8 ते 10 दिवसांपासून घंटागाडी बंद असल्यामुळे गावात कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. घंटागाडी लहान असल्यामुळे छोट्या गल्ल्यांमध्ये ही गाडी सहज जाते आणि त्यामुळे गावातील बहुतांश भागातील कचरा घेवून जाणे सोपे होते, परंतू सध्या घंटागाडी बंद असल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे या प्रश्नावर ग्रामपंचायतला केव्हा जाग येणार असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.