एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथून वाहन चोरीचे सत्र सुरूच असून आतापर्यंत असंख्य मोटरसायकल चोरी झालेल्या असतांना आता चार चाकी वाहने सुध्दा चोरी होवू लागल्याने वाहनधारकांमध्ये भितीचे वाहातावरण पहायला मिळत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील खंडू लक्ष्मण मुळे यांची फोर्स कंपनीची क्रुझर गाडी MH 28 AZ 9890 घरामोरून दि.14 रोजी चोरीला गेली आहे. खंडू मुळे यांनी एका ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज पाहीले असता रात्री 3 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने गाडी चालू करून घेवून गेल्याचे दिसत आहे.
वाहन चोरीचे सत्र सुरूच !
कुंभार पिंपळगांव येथे वाहन चोरीचे सत्र सुरूच आहे. मागील काळात अनेक मोटरसायकल चोरीला गेल्या आहेत, मात्र कोणत्याही दुचाकीचा तपास अद्याप लागलेला नाही. आतापर्यंत दुचाकी चोरीला जात होत्या मात्र आता चारचाकी गाड्या सुध्दा चोरी होत आहेत. कागदी घोडे नाचवण्या पलीकडे कुठल्याही प्रकारचा तपास होतांना दिसत नाही. वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कुंभार पिंपळगांवात भितीचे वातावरण पहायला मिळत आहे.
चोरट्यांना कोणाची साथ ?
कुंभार पिंपळगांव येथून वारंवार होणाऱ्या चोरीच्या घटना पाहता कुंभार कुंभार पिंपळगांव येथील कोणीतरी व्यक्ती चोरट्यांना साथ देत असावा असा संशय गावातील नागरिकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे त्या दृष्टीने सुध्दा तपास होणे आवश्यक आहे.
सीसीटीव्हीत चोर कैद ?
कुंभार पिंपळगांवातून सदरील क्रुझर गाडी चोरी करून नेतांन चोरटा दिसत आहे. एवढंच नव्हे तर यापूर्वी देखील ज्या मोटरसायकली गेल्या आहेत त्यातील अनेक प्रकरणात चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत परंतू कोणत्याही प्रकरणाचा गांभीर्याने तपास होत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. एवढंच काय सीसीटीव्ही कॅमेरे तपासण्याची तसदी सुध्दा पोलीस ठाण्याकडून घेतली जात नसल्याचे दिसत आहे.
वरिष्ठ लक्ष देणार का ?
कुंभार पिंपळगांव येथे वारंवार वाहन चोरीच्या घटना घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सदरील चोरीच्या घटनांचा कोणत्याही प्रकारचा तपास होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तिव्र नाराजी आहे. त्यामुळे नव्याने रूजु झालेले पोलीस अधिक्षक तसेच अप्पर पोलीस अधिक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून तातडीने योग्य ती पाऊले उचलावीत आणि शक्य असल्यास चोऱ्यांचे हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) कडे द्यावे अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
योग्य ती पाऊले उचलू !
कुंभार पिंपळगांव येथे वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटना रोखण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्यात येतील शिवाय यापूर्वी चोरी गेलेल्या वाहनांचा तपास लवकर करून दोषींवर कारवाई करण्यात येईल.
- विशाल खांबे,
उपविभागीय पोलीस अधिकारी
(SDPO) अंबड
इतर महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.