Your Alt Text

कुंभार पिंपळगांव येथील कोट्यावधीच्‍या बेकायदा प्‍लॉटिंगला तलाठी, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, रजिस्‍ट्री विभागासह तहसीलदार यांचाही आशिर्वाद आहे का ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे नियमबाह्य व बेकायदेशीरपणे प्‍लॉट विक्री सुरू असून एन.ए. न करता सर्रासपणे प्‍लॉटिंग काढून नागरिकांना प्‍लॉट विक्री केले जात आहेत. त्‍यामुळे संबंधित अधिकाऱ्यांसह प्रशासनावर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण झाले आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे शहराच्‍या चारही दिशेला N.A. न करता शासनाचे सर्व नियम धाब्‍यावर बसवून सर्रासपणे प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री केले जात आहेत. प्‍लॉटिंग काही एक दोन ठिकाणी नसून अनेक ठिकाणी प्‍लॉटिंगला पेव फुटले आहे.

बेकायदा प्‍लॉटिंग !

कुंभार पिंपळगांव येथे काही लोक एन. ए. न करता शहराच्‍या चारही दिशेला प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री करत आहेत. प्‍लॉटिंग काढण्‍यासाठी प्रशासनाकडून एन.ए. करून घ्‍यावे लागते, गावठाण मध्‍ये जमीन लावण्‍यासाठीही प्रशासकीय प्रक्रिया असते, मात्र काही जण कोणत्‍याही प्रकारची प्रशासकीय प्रक्रिया किंवा परवानगी न घेता प्‍लॉटिंग काढत असून बेकायदेशीरपणे प्‍लॉट विक्री करत आहेत.

जमीनच नावावर नाही !

कुंभार पिंपळगांव शहर व आसपासच्‍या गाव शिवारात अनेकांनी प्‍लॉटिंग काढून प्‍लॉट विक्री सुरू केली आहे. परंतू प्‍लॉटिंगवाल्‍यांनी ज्‍या शेतकऱ्यांकडून जी जमीन घेतली आहे ती जमीन आजही शेतकऱ्याच्‍याच नावावर आहे, परंतू विक्री प्‍लॉटिंगवाल्‍याच्‍या नावाने होत आहे. कारण प्‍लॉटिंगवाल्‍यांनी संबंधित शेतकऱ्याला थोडे पैसे देवून बाकीचे पैसे 1 ते 2 वर्षानंतर देवू अशा करारावर जमीनी घेतल्‍या आहेत आणि प्‍लॉट पाडले आहेत, म्‍हणजेच आज रोजी सदरील प्‍लॉट हे प्‍लॉटिंगवाल्‍यांच्‍या नावानेच विक्री होत असले तरी जमीन मात्र मुळ मालकाच्‍या नावानेच आहे.

ग्रामपंचायतला प्‍लॉटची नोंद !

एन.ए. न करता बेकायदेशीरपणे प्‍लॉटिंगच्‍या माध्‍यमातून पाडण्‍यात आलेले प्‍लॉट सर्रासपणे ग्रामपंचायतला लावण्‍यात येत असून ग्रामपंचायतकडून मिळालेल्‍या 8-अ च्‍या आधारे रजिस्‍ट्री करून देण्‍यात येत आहे. विशेष म्‍हणजे सदरील प्‍लॉट हे एन.ए. केलेले आहे किंवा नाही याची ग्रामपंचायतकडून अर्थात ग्रामसेवकाकडून शहानिशा केली जात नसल्‍याचे दिसत आहे.

ग्रामपंचायत मध्‍ये असंख्‍य प्‍लॉटची नोंद करण्‍यात येत असून त्‍या आधारे प्‍लॉट विक्रीचा काळाबाजार सुरू असल्‍याचे दिसत आहे. अर्थातच या काळ्या बाजारात किंवा वाहत्‍या गंगेत ग्रामपंचायतशी संबंधित अनेकांनी आपले हात धुवून घेतल्‍याचे बोलले जात आहे आणि आजही हा प्रकार सर्रासपणे सुरूच आहे.

विविध ठिकाणी प्‍लॉटिंग !

फक्‍त कुंभार पिंपळगांव शिवारातच नव्‍हे तर कुंभार पिंपळगांव लगत असलेल्‍या इतर गाव शिवारात प्‍लॉटिंग सर्रासपणे सुरू आहे. कुंभार पिंपळगांव शिवार आणि लगत असलेल्‍या शिवारात किमान 10 ते 15 ठिकाणी प्‍लॉटिंग सुरू असल्‍याचे दिसत आहे. अर्थातच हा गोरखधंदा कोट्यावधी रूपयांचा आहे.

संगणमत कोणाचे ?

बेकायदेशीर व राजरोसपणे कुंभार पिंपळगांव शिवारात आणि शहरालगत असलेल्‍या इतर गावाच्‍या शिवारात प्‍लॉटींग सुरू असतांना संबंधित तलाठी कोणत्‍याही प्रकारची हरकत घेत नाही, अर्थात डोळेझाक करीत आहेत, तर मंडळ अधिकारीही या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत, शिवाय प्‍लॉटींग काढल्‍यानंतर संबंधित ग्रामपंचायतचे ग्रामसेवकही बिनधास्‍तपणे प्‍लॉट लावून 8-अ देत आहेत आणि त्‍यापुढेही जावून रजिस्‍ट्री ऑफीस जमीन कोणाच्‍या नावावर आहे आणि नियमांचे पालन झाले आहे का ? याची कोणत्‍याही प्रकारची शहानिशा न करता रजिस्‍ट्री (नोंदणी) करत आहेत.

मलाई कोणा कोणाला ?

बेकायदा प्‍लॉटिंग काढून कोट्यावधी रूपये कमावणाऱ्यांनी गांव पासून तहसिल पर्यंत सर्वांना मॅनेज केल्‍याचे बोलले जात आहे, अर्थातच अनेकांना प्रसाद वाटल्‍याचे बोलले जात आहे, त्‍यामुळे कोट्यावधीच्‍या या वाहत्‍या गंगेत संबंधित अनेकजण हात धुवून घेत असल्‍याचे दिसत आहे. तहान लागलेल्‍या अधिकाऱ्याला विहीरीजवळ जाण्‍याची गरजच नाही, विहीरच अधिकाऱ्याजवळ येत असल्‍यामुळे सोने पे सुहागा सुरू आहे.

सर्वांचाच आशिर्वाद ?

कुंभार पिंपळगांव आणि शहरालगत इतर गाव शिवारात बेकायदेशीरपणे कोट्यावधी रूपयांची प्‍लॉटिंग सुरू असतांना कोणत्‍याही प्रकारची कारवाई होतांना दिसत नाही. त्‍यामुळे प्‍लॉटिंगच्‍या या बेकायदा धंद्याला संबंधित ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी, रजिस्‍ट्री ऑफीस यांच्‍यासह तहसीलदार यांचाही आशिर्वाद आहे का ? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे. आणि जर तसे नसेल तर मागील बऱ्याच कालावधी पासून सुरू असलेला कोट्यावधीचा हा बेकायदेशीर धंदा कसा सुरू आहे ? याचे उत्‍तर संबंधित अधिकाऱ्यांनी देणे क्रमप्राप्‍त आहे.

शहराप्रमाणे प्‍लॉटचे दर !

कुंभार पिंपळगांव शहरात फक्‍त प्‍लॉटिंग काढूनच माया जमवली जात नाही तर आधीच असलेले रस्‍त्‍यालगतचे प्‍लॉट खरेदी विक्रीतूनही कोट्यावधीची माया जमवली जात आहे. रस्‍त्‍यालगत असलेल्‍या एखाद्या प्‍लॉटचे दर तर गगनाला भिडल्‍याचे दिसत आहेत, 50 लाख ते 1 कोटी पर्यंत आणि त्‍यापुढे सुध्‍दा प्‍लॉट विक्री होत असल्‍याचे बोलले जात आहे.

पैसे ठेवायचे कुठे ?

प्‍लॉटिंगच्‍या या बेकायदेशीर व्‍यवहारातून कोट्यावधींची उलाढाल होत असून बहुतांशवेळा गुपचूपपणे देण्‍याघेण्‍याचे व्‍यवहार होत आहेत. विशेष म्‍हणजे बहुतांश व्‍यवहार हे रोखीने होत असून जमा झालेला पैसा ठेवायचा कुठे हा प्रश्‍न संबंधितांना पडला आहे.

इनकम टॅक्‍स विभाग कुठंय ?

कुंभार पिंपळगांव शिवारात आणि शहरालगत असलेल्‍या गांव शिवारात सुरू असलेल्‍या प्‍लॉटिंगच्‍या माध्‍यमातून कोट्यावधी रूपयांची माया जमवली जात आहे. अर्थातच गुपचुपणे सुरू असलेल्‍या या बेकायदा व्‍यवहारातून मोठ्या प्रमाणात माया जमवली जात आहे. मात्र प्राप्‍त झालेल्‍या रकमेतून टॅक्‍स भरला जात नसल्‍याचेही बोलले जात आहे.


व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!