Your Alt Text

कुंभार पिंपळगावातून पुन्‍हा मोटारसायकल चोरी ! घनसावंगी पोलीस ठाण्‍याला चोरट्यांचे वारंवार आव्‍हान ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथे प्रजासत्‍ताक दिनाच्‍या दिवशीच मध्‍यरात्री मोटारसायकल चोरीला गेल्‍यामुळे चोरट्यांना पोलीसांचा थोडाही धाक राहीला नाही का ? वारंवार होणाऱ्या चोऱ्यांना नेमका आशिर्वाद कोणाचा ? असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

याबाबत सविस्‍तर वृत्‍त असे की, घनसावंगी तालुक्‍यातील कुंभार पिंपळगांव येथील शाहेद उस्‍मान शेख यांची हिरो पॅशन प्रो मोटरसायकल क्रमांक MH21-BE- 0327 ही मध्‍यरात्री चोरीला गेली आहे. सदरील लाल रंगाची मोटारसायकल रात्री 1.15 ते 1.20 च्‍या दरम्‍यान चोरीला गेल्‍याचे सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात दिसत आहेत. सीसीटीव्‍ही मध्‍ये चोरटा तोंडाला रूमाल बांधलेला दिसत असून सदरील वेळेत मोटरसायकल घेवून जातांना दिसत आहे.

पोलीसांनी मनात आणल्‍यास व तातडीने तपास केल्‍यास चोरट्यांचा तपास लागू शकतो, कारण सीसीटीव्‍ही मध्‍ये दिसणाऱ्या व्‍यक्‍तीची माहिती खबऱ्यांकडून व इतर माध्‍यमातून काढल्‍यास या गाडीचा तपास लावणे शक्‍य आहे.

याआधीही चोरीच्‍या घटना !

कुंभार पिंपळगांवात या आधीही चोरीच्‍या अनेक घटना घडल्‍या आहेत, अनेक मोटरसायकल चोरीला गेल्‍या आहेत, कदाचित एखादा अपवाद असेल नसता एकाही गाडीचा तपास पोलीसांना लागलेला नाही. सदरील चोरटे बिनधास्‍तपणे कोणाचीही भिती न बाळगता कुंभार पिंपळगांवात येवून मोटरसायकलची चोरी करत आहेत, त्‍यामुळे चोरट्यांना पोलीसांचा धाक राहीला नाही का ? असा सवाल नागरिक करत आहेत.

पोलीसांचा आशिर्वाद !

घनसावंगी पोलीस ठाणे व स्‍थानिक पोलीसांचा अवैध धंद्यांना नेहमीच आशिर्वाद दिसून येत असल्‍यामुळे चोरट्यांनाही घनसावंगी पोलीस ठाण्‍याचा आशिर्वाद आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. कारण एकाही वाहनाचा तपास लागत नसल्‍यामुळे नागरिकांमध्‍ये रोष दिसून येत आहे.

पोलीस ठाण्‍यात गेल्‍यास तक्रार अर्ज लिहून घेतले जाते, अर्जावर ठाणे अंमलदाराचा सही शिक्‍क मारून रिसिव्‍हड दिली जाते, त्‍यापलीकडे काहीही केले जात नाही. विशेष म्‍हणजे एफआयआर सुध्‍दा दाखल करून घेतली जात नाही, तक्रारदारास सांगितले जाते की, दोन दिवस वाट पहा, गाडी नाही भेटली तर एफआयआर करू आणि परत पाठवले जाते.

गाडी चोरीला गेल्‍यावर अपवाद सोडल्‍यास एफआयआर दाखल करणे टाळले जाते, कारण वरिष्‍ठांना दाखवले जाते की, आमच्‍या पोलीस ठाण्‍या अंतर्गत गुन्‍हे घडत नाहीत, त्‍यामुळे वरिष्‍ठांचेही या पोलीस ठाण्‍याकडे आणि चौकीकडे दुर्लक्ष होते.

एलसीबीकडे तपास द्यावा !

कुंभार पिंपळगांवात मागील 2 वर्षात अनेक मोटरसायकल चोरीला गेल्‍या आहेत, अपवाद सोडल्‍यास आठवडाभरात एक तरी मोटरसायकल चोरीला गेल्‍याचे ऐकायला मिळत आहे. त्‍यामुळे वाहन चोरांची टोळी या भागात सक्रीय असावी शिवाय स्‍थानिक एखाद्या व्‍यक्‍तीचाही यामध्‍ये हात असावा असा संशय नागरिक व्‍यक्‍त करत आहेत. त्‍यामुळे सदरील गंभीर प्रकाराची चौकशी एलसीबी (Local Crime Branch) मार्फत करण्‍यात यावी अशी मागणी नगारिकांकडून केली जात आहे.


इतर महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पहा…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment

error: Content is protected !!