एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वामुळे देशाच्या युवा शक्तीचे भविष्य उज्ज्वल असून नवमतदारांनी आपल्या मताचा वापर देशाचा विकास लक्षात घेवून करावा असे प्रतिपादन समृध्दी शुगर्स लि. चे चेअरमन तथा भाजपा विधानसभा निवडणूक प्रमुख सतिश घाटगे पाटील यांनी केले.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष शिवाजी कंटुले यांनी आयोजित केलेल्या नमो नवमतदाता संमेलना मध्ये श्री.घाटगे बोलत होते. सदरील कार्यक्रम घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथील श्री सरस्वती भुवन विद्यालयात आयोजित करण्यात आला होता.
पुढे बोलतांना सतिश घाटगे पाटील म्हणाले की, यापूर्वी देशातील रस्त्यांची अवस्था काय होती आणि आज कशी आहे हे आपण पाहत आहात. देशातील बहुतांश रस्ते महामार्गामध्ये रूपांतरीत झाले आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी देशाच्या विकासाचे तिनतेरा वाजले होते, परंतू नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यावर त्यांनी देशातील सर्व प्रमुख प्रश्नांवर लक्ष केंद्रीत करून देशाच्या विकासाला चालना दिली आहे.
देशात याआधी इसरो सारख्या अंतराळ संस्थांबद्दल जास्त माहिती ऐकायला मिळत नव्हती, परंतू नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अशा संस्थांना अधिक बळकट करण्यात आल्यामुळे आज सर्वांना इसरो सारख्या संस्था माहित झाल्या आहेत. देशात प्रत्येक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कामे सुरू असून देश प्रगतीपथावर असल्याचेही त्यांनी सांगितले.
वयाची 18 वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपल्या मताचा वापर देशहित आणि देशाचा विकास लक्षात घेवून करावा. देशाला नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे नवमतदारांनीही नरेंद्र मोदींचे हात बळकट करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादनही सतिश घाटगे पाटील यांनी केले. या प्रसंगी नमो अॅप डाउनलोड करण्याबाबतही आवाहन करण्यात आले.
यावेळी भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष शिवाजी कंटुले, भाजपा कामगार मोर्चा जिल्हाध्यक्ष गोविंद आर्दड, भाजपा महिला आघाडी तालुकाध्यक्ष द्वारकाबाई मेहेत्रे, सरपंच संगीता गंगाधर लोंढे, विष्णू शिंदे, भाजपा जैन प्रकोष्ट घनसावंगी विधानसभा समन्वयक नरेंद्र जोगड, विशाल बुरसे, हनुमान आर्दड, सुदर्शन राऊत, तसेच मुख्याध्यापक, शिक्षक, नागरिक व मोठ्या संख्येने नवमतदार विद्यार्थी उपस्थित होते.
इतरही महत्वपूर्ण बातम्या खाली पाहू शकता…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.