Your Alt Text

मुझको मेरे बाद जमाना ढूँढेगा ! …गोरगरीबांना आजही डॉ.खान यांची आठवण का येते ?

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

एल्‍गार न्‍यूज (परवेज पठाण) :-
या जगात असे काही लोक होवून जातात की, त्‍यांनी जिवंतपणी केलेले कार्य ते जग सोडून गेल्‍यानंतरही लोकांच्‍या मनात जागा करून जातात, अर्थातच सामाजिक बांधिलकीतून त्‍यांनी केलेल्‍या कार्यामुळे वर्षानुवर्षे आदर, आपुलकी आणि आत्‍मीयतेच्‍या दृष्‍टीने लोकांच्‍या स्‍मरणात राहतात.

असेच एक व्‍यक्तिमत्‍व होते ते म्‍हणजे डॉ.खान होय. निवृत्‍त वैद्यकीय अधिकारी डॉ.खान यांचे पूर्ण नाव डॉ.मुमताज अली खान होते. कुंभार पिंपळगांव आणि सर्कल मधील असंख्‍य गावातील नागरिकांना जेव्‍हा जेव्‍हा आरोग्‍याशी संबंधित एखादा प्रश्‍न निर्माण होतो तेव्‍हा आपसुकच त्‍यांना डॉ.खान यांची आठवण येते. शेवटच्‍या घटकापर्यंत त्‍यांनी आरोग्‍य सेवा दिली पंरतू दुर्दैवाने कोरोना काळात त्‍यांचे निधन झाले. मृत्‍यू समयी त्‍यांचे वय अंदाजे 70 होते.

डॉ.खान हे मुळचे घनसावंगी येथील रहीवाशी हाते, नंतरच्‍या काळात ते छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे वास्‍तव्‍यास होते, मात्र कुंभार पिंपळगांव येथे वैद्यकीय अधिकारी म्‍हणून निवृत्‍त झाल्‍यानंतर उर्वरित आयुष्‍य सुध्‍दा त्‍यांनी सेवाभाव ठेवून कुंभार पिंपळगांव येथेच खाजगी दवाखाना सुरू करून रूग्‍णसेवा केली.

डॉ.खान यांचे वैशिष्‍ट्ये !

कुंभार पिंपळगांव येथे वैद्यकीय अधिकारी म्‍हणून जॉईन झाल्‍यानंतर डॉ.खान यांनी अनेक चांगले निर्णय घेवून येथील प्राथमिक आरोग्‍य केंद्रात (सरकारी दवाखान्‍यात) चांगल्‍या दर्जाची मोफत सेवा उपलब्‍ध करून दिली होती. त्‍यांच्‍याकडे जाणाऱ्या रूग्‍णांना मोफत व चांगली आरोग्‍य सेवा मिळू लागली, विविध आजार बरे होवू लागले.

छोटे मोठे ऑपरेशन सुध्‍दा ते करत होते. या काळात त्‍यांच्‍याकडे परिसरातील 30 ते 40 गावातील रूग्‍ण येत असत, अर्थातच आधीच्‍या तुलतेन प्राथमिक आरोग्‍य केंद्रात रूग्‍णांची संख्‍या अनेक पटीने वाढली होती. गोरगरीबांना मोठमोठ्या दवाखान्‍यांमध्‍ये लागणारे हजारो रूपये कसे वाचवता येतील या दृष्‍टीने गावातच उपचार करण्‍यावर त्‍यांचा भर होता.

ड्यूटीची संपल्‍यावर देखील ते मोटारसायकलवर जावून 2 ते 3 तास खेड्यात रूग्‍णांवर मोफत उपचार करत असे, शिवाय गोळ्या औषधेही मोफत वाटप करत असत. या नोकरीच्‍या काळात घरी जावून उपचार केल्‍यानंतर कोणी किती पैसे देण्‍याचा प्रयत्‍न केला तरी ते पैसे घेत नव्‍हते. फक्‍त आपुलकीने कोणी चहा पाजला किंवा जेवणासाठी आग्रह केला तर जेवन करत आणि परत येत असत.

निवृत्‍तीनंतरही सेवा !

डॉ.खान यांनी वैद्यकीय अधिकारी पदावरून निवृत्‍त झाल्‍यानंतरही स्‍वत:चा खाजगी दवाखाना सुरू करून आरोग्‍य सेवा सुरूच ठेवली. मात्र हा दवाखाना पैसे कमवण्‍याच्‍या उद्देशाने नव्‍हे तर गोरगरीब व सामान्‍य रूग्‍णांची सेवा करता यावी या दृष्‍टीने सुरू केला होता. त्‍यावेळी ते रूग्‍णांकडून तपासणी फी नाममात्र म्‍हणजेच 10 रूपये घेत असत, एवढंच नव्‍हे तर दिवसभरात येणाऱ्या रूग्‍णांपैकी अनेक गोरगरीब रूग्‍णांकडून ते तपासणी फी सुध्‍दा घेत नव्‍हते.

एवढंच नव्‍हे तर ज्‍यांच्‍याकडे मेडीकलवरून गोळ्या औषधी घेण्‍यासाठी पैसे नसायचे त्‍यांना ते खिशातून पैसे काढून द्यायचे. अनेकजण त्‍यांना विचारायचे की, डॉक्‍टर साहेब तुम्‍ही अनेकांकडून फी सुध्‍दा घेत नाहीत, एवढंच नाही तर तुम्‍ही अनेकांना मेडीकलवरून गोळ्या औषधांसाठी पैसेही खिशातून काढून देतात, मग तुम्‍हाला पैसे उरणार कसे ? तेव्‍हा डॉ.खान म्‍हणायचे अल्‍लाहने (देवाने) मला सगळं काही दिलंय, जेवढी अपेक्षा होती त्‍यापेक्षा जास्‍त मिळालंय. मग आता राहीलेले आयुष्‍य याच गोरगरीब लोकांसाठी द्यायचं आणि हेच पुण्‍य कमवून वर जायचं आहे.

कमी खर्चात उपचार !

डॉ.खान यांच्‍याकडे कोणीही व्‍यक्‍ती उपचारासाठी गेल्‍यास त्‍याचा उपचार खूप कमी पैशात होत होता. किंबहुना पैशांअभावी उपचार थांबत नव्‍हते. अनेकदा तर चहा पाण्‍याच्‍या खर्चात उपचार होत असे. त्‍यामुळे गोरगरीबांना डॉ.खान यांचा खूप मोठा आधार होता.

आपुलकीने विचारपूस !

एखाद्या नवीन व्‍यक्‍तीला पहिल्‍या भेटीत कदाचित त्‍यांचा स्‍वभाव कडक असल्‍याचे दिसून येत असेलही परंतू नंतरच्‍या भेटीत असे लक्षात यायचे की ते तर खूप मनमोकळेपणाने बोलतात. खूप आपुलकीने विचारपूस करतात, फक्‍त आरोग्‍याबाबतीतच नव्‍हे तर इतर बाबतीतही कुटुंबाच्‍या प्रमुखा प्रमाणे सल्‍ला देतात. विशेष म्‍हणजे त्‍यांनी कधीच धर्म, जात पाहून सेवा केली नाही. प्रत्‍येकाला ते आपुलकीने आणि कुटुंबातील सदस्‍य या नात्‍याने विचारपूस करून उपचार करायचे.

सर्वधर्मीय समाजातील नागरिक त्‍यांच्‍याकडे मार्गदर्शक आणि कुटुंबातील प्रमुख व्‍यक्‍तीप्रमाणे आत्‍मीयतेने पहायचे, त्‍यांचे मार्गदर्शन घ्‍यायचे, त्‍यांच्‍याकडून उपचार घेवून बरे झालेले 30 ते 40 गावातील असंख्‍य रूग्‍ण अनेकदा त्‍यांना भेटायला व एकप्रकारे कुटुंबातील ज्‍येष्‍ठ म्‍हणून आशिर्वाद घेण्‍याच्‍या भावनेतून सुध्‍दा यायचे.

प्रत्‍येकाला ते आपुलकीने बोलत आणि आस्‍थेवाईकपणे विचारपूस करत होते, परिसरातील हजारो रूग्‍णांचे नाव आणि गाव सुध्‍दा त्‍यांना पाठ होते. कोरोना काळात सुध्‍दा त्‍यांनी बिनधास्‍तपणे रूग्‍णांवर उपचार करून आरोग्‍य सेवा दिली, त्‍यांचे वय अंदाजे 70 पेक्षा जास्‍त होते, तरीही रात्री बेरात्री सुध्‍दा ते उठून रूग्‍णांवर उपचार करत होते. त्‍याना मानणारा खूप मोठा वर्ग या परिसरात होता.

प्रत्‍येकाची वेगळी कहानी !

आपण ज्‍याला विचाराल तो किंवा ती व्‍यक्‍ती आपली कहानी सांगेल. प्रत्‍येकाला त्‍यांनी वेगवेगळ्या पध्‍दतीने मदत केल्‍याचे दिसून येईल. कधी मोफत उपचाराच्‍या माध्‍यमातून कधी मोफत गोळ्या औषधांच्‍या माध्‍यमातून, कधी सणासुदीला अन्‍नधान्‍य किंवा भेटवस्‍तू, कोणाला मदत म्‍हणून काही खर्च अशा एक ना अनेक गोष्‍टी वेळोवेळी समोर येत असतात. अनेकांना तर डॉ.खान यांची आठवण काढल्‍यानंतर त्‍यांचे डोळे भरून येतात.

कायम स्‍मरणात राहतील !

कोरोना काळात सुध्‍दा आजारी पडण्‍याच्‍या एक दिवस आधी पर्यंत त्‍यांनी आरोग्‍य सेवा दिली. उपचार घेत असतांना दुर्दैवाने या काळात त्‍यांचे निधन झाले. आजही आरोग्‍याची कोणतीही समस्‍या उदभवल्‍यास लोकांना त्‍यांची आठवण येते. परंतू दुर्दैवाने ते आज आपल्‍यात नाहीत. मात्र त्‍यांनी गोरगरीब व जनसामान्‍यांसाठी केलेले कार्य कायमच स्‍मरणात राहील यांत शंका नाही. डॉ.खान यांनी केलेले कार्य पाहता मोहम्‍मद रफी यांच्‍या एका गीत / गाण्‍यातील काही ओळी आठवतात…

  • परवेज पठाण
    संपादक, एल्‍गार न्‍यूज

इतरही महत्‍वपूर्ण बातम्‍या खाली पाहू शकता…

महत्‍वपूर्ण बातम्‍या नियमित आपल्‍या मोबाईलवर प्राप्‍त करण्‍यासाठी स्‍क्रीनवर दिसत असलेल्‍या व्‍हाट्सअॅप चिन्‍हाला क्लिक करून आमच्‍या ग्रुपला जॉईन व्‍हा.

व्‍हाट्सअॅप ग्रुप जॉईन करा.

2 thoughts on “मुझको मेरे बाद जमाना ढूँढेगा ! …गोरगरीबांना आजही डॉ.खान यांची आठवण का येते ?”

  1. Assalamualaikum
    Allah Magfirat kre unke aala darjaat buland kre……I’m very proud of you that I’m your daughter 💕

    Reply

Leave a Comment

error: Content is protected !!