एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
मराठा समाजाला सरकसकट आरक्षण मिळावे यासाठी असलेला लढा शेवटच्या टप्प्यात असून सरकारने 20 तारखेच्या आत सरसकट आरक्षण जाहीर करावे. अंतरवालीच्या बाहेर एकदा पाय टाकल्यावर सरकारशी चर्चा बंद होईल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
घनसावंगी तालुक्यातील कुंभार पिंपळगांव येथे आयोजित सभेत ते बोलत होते. सभेला रात्री उशीर झालेला असतांनाही तालुक्यातून हजारोच्या संख्येने मराठा समाज बांधव उपस्थित होते. यावेळी महिलांची सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
मनोज जरांगे पाटील पुढे बोलतांना म्हणाले की, मराठे जर मुंबईत नुसते येवून बसले तरी सरकारला आरक्षण द्यावे लागेल. मराठ्यांनी आंदोलनासाठी रात्रंदिवस कष्ट केलेत, हा लढा सामान्य मराठ्यांचा आहे. आता गावागावातील मराठे जागे झाले आहेत, आरक्षणचा हा लढा शेवटच्या टप्प्यात आला असून आता आम्ही मागे हटणार नाही.
मराठ्यांच्या लेकराबाळांसाठी आता आम्हाला मुंबईत यावेच लागेल. कधीतरी आमच्या लेकराबाळांचं भलं करा, आरक्षण देण्यापासून कोण रोखतंय, यामध्ये कोणकोण विरोध करतंय तेही आम्ही आता पाहुन घेवू. सरकारला मराठ्यांना त्यांच्या हक्काचे आरक्षण द्यावेच लागेल, हक्काच्या आरक्षणासाठीच या आंदोलनाची सुरूवात झालेली आहे.
आता जालना जिल्ह्यातील सर्व मराठ्यांनी ताकदीनीशी मुंबईला जायचंच. आता किती दिवस सहन करायचे, मुंबईला जाणारच, ज्यांचा आरक्षणाला विरोध आहे त्यांचा कार्यक्रम मराठे केल्याशिवाय राहणार नाही. ते मुंबईत आल्यावरच कळेल, घराघरातून मराठे मुंबई दाखल होणार आहेत.
आता मागे हटायचे नाही, कितीही त्रास झाला तरी मी सहन करायला तयार आहे. मुंबईत शांततेत जाणार आणि शांततेच आंदोलन होणार आहे. मराठ्यांनो आता आपल्या मुला बाळांसाठी एकजूट अशीच राहू द्या असे आवाहनही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केले.
कुंभार पिंपळगांव येथील या सभेला तालुक्यातून व परिसरातून हजारोच्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. समाज बांधवांनी कुंभार पिंपळगांव येथील सभेकरीता अथक परिश्रम घेवून सभेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले. सभेच्या दृष्टीने यावेळी पोलीस प्रशासनाकडून चांगल्या पध्दतीने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
इतरही महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.