एल्गार न्यूज :-
पत्रकार म्हटले की (काही अपवाद सोडल्यास) असंख्य लोकांच्या मनात अनेक प्रकारचे गैरसमज पहायला मिळतात, अनेकजण तर आजकालचे पत्रकार असेच आहेत, तसेच आहेत, पत्रकारांचं काही खरं नाही, चांगले पत्रकार उरलेच नाहीत असे बोलून मोकळे होतात, परंतू त्यांनी कधी सत्य परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? डोक्यात पडलेल्या अंधारात थोडासा प्रकाश पडावा म्हणून हा शब्दप्रपंच !
स्वातंत्रयपूर्व काळापासून पत्रकारिता क्षेत्रात अनेक पत्रकार बांधवांनी तन-मन-धन लावून समाज व देशहितासाठी पत्रकारिता केली आणि आजही करत आहेत. ऊन, थंडी, पाऊस काहीही असो सर्वसामान्यांचे प्रश्न लेखणीच्या माध्यमातून शासन, प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न वर्षानुवर्षे सुरू आहेत.
शहरातील पत्रकार !
शहरातील पत्रकार दिवसभर त्यांना दिलेल्या एरिया किंवा क्षेत्रातील बातम्या संकलित करून वर्तमानपत्रात प्रकाशित करतात, या बातम्या संकलित करतांना त्यांनाही जीव धोक्यात घालून पत्रकारिता करावी लागते. या बदल्यात त्यांना वर्तमानपत्राकडून मजुरापेक्षाही कमी पगार मिळतो. तरीही ते समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून तुटपुंज्या पगारात आपले कर्तव्य निभावत असतात.
ग्रामीण पत्रकार !
सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे ग्रामीण पत्रकार होय. म्हणजेच आपल्या गांव, परिसरातील किंवा तालुक्यातील पत्रकार होय. यांना कोणताही पगार नसतो, मानधन नसते, शासनाची कुठलीही योजना नसते, कोणतीही सूट नसते, आणि इतर कोणताही फायदा नसतो. सदरील ग्रामीण पत्रकार वर्षानुवर्षे घर जाळून कोळसा करत असतात, अर्थात आता तर कोळशांची राख सुध्दा झाली आहे.
ग्रामीण पत्रकार खिशातले पैसे खर्च करून पत्रकारिता करत असतात, त्याबदल्यात त्यांना काहीही मिळत नाही, मग प्रश्न उपस्थित होतो की, पत्रकारांचे घर तरी कशी चालते, तर त्याचे उत्तर आहे कुटुंबाचा प्रपंच, सुख-दु:ख, आरोग्यावर होणारा खर्च, मुलांचे शिक्षण या सर्वांसाठी खर्च घरातूनच करावा लागतो.
स्वत:चा छोटा मोठा व्यवसाय असेल तर यातून पत्रकारांच्या कुटुंबाचा प्रपंच चालत असतो. मात्र पत्रकारिता करत असतांना स्वत:च्या व्यवसायाकडे दुर्लक्ष झाल्याने अनेक पत्रकार अक्षरश: बर्बाद झाल्याचे अनेक उदाहरणे महाराष्ट्रात पहायला मिळतील.
पुन्हा प्रश्न उपस्थित होतो की, कोणताच फायदा नसतांना पत्रकार कशामुळे पत्रकारिता करत असतात. सोप्या भाषेत म्हणायचे झाल्यास हा समाजसेवेचा एक किडी असतो. ज्या प्रमाणे एखादा खरा समाजसेवक समाजहित व देशहित डोळ्यासमोर ठेवून कार्य करत असतात, त्याच प्रमाणे पत्रकार सुध्दा समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून समस्त नागरिकांच्या न्याय हक्कासाठी लढत असतात आणि त्यांना संबंधित प्रश्नी न्याय मिळेपर्यंत प्रयत्नशील राहतात.
बहुत जुदा है औरों से हमारे दर्द की कहानी… ज़ख्म का कोई निशान नहीं और दर्द की कोई इंतहा नही…
पत्रकारिता क्षेत्र किती संघर्षमय आहे आणि किती तारेवरची कसरत करून जीवन जगावे लागते याची खरंच माहिती घ्यायची असेल तर तुमच्या गाव, शहरातील किंवा तालुक्यातील एखाद्या ज्येष्ठ पत्रकाराला जावून 5 मिनिट भेटा आणि त्यांनी किती अडचणीतून संघर्षमय प्रवास केला ? आर्थिक अडचणींना कसे सामोरे जावे लागले ? स्वप्नांवर कसे पाणी फेरले गेले ? या सर्व गोष्टी ते तुम्हाला सांगतील.
ज्या प्रमाणे शेतकरी कर्जबाजारी होतात, त्याच प्रमाणे असंख्य पत्रकार कर्जबाजारी होवून पत्रकारिता करत असतात, कुठलाही लाभ नाही, वर्तमानपत्र किंवा शासनाकडून एक रूपयाचाही लाभ नाही तरीही कुटुंबाचा प्रपंच चालवतांना तारेवरची कसरत करावी लागते.
तुमची दिवाळी गोड आणि पत्रकारांची ?
दिवाळीला तुम्ही एक नव्हे तर अनेक ड्रेस घेतले असतील, वाहन घेतले असेल, विविध वस्तू घेतल्या असतील, इतर अनेक सुख सुविधांचा उपभोग घेतला असेल, पण असंख्य पत्रकारांनी दिवाळीच साजरी केली नाही हे तुम्हाला माहित आहे का ? कारण दिवाळीला मुलाबाळांना कपडे घ्यायला, किंवा इतर वस्तू घेण्यासारखी त्यांची परिस्थितीच नव्हती.
विषय फक्त दिवाळीचाच नसतो, तर वर्षभर इमाने इतबारे समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करणारे असंख्य पत्रकार कोणतीही तक्रार न करता पत्रकारिता करत असतात. अनेकांना वाटतं काही पत्रकार चुकीचे असतात, होय दोन – पाच टक्के तथाकथित पत्रकार चुकीचे असतीलही त्यांचे कोणीच समर्थन करणार नाही, पण बाकीचे 95% पत्रकार आपल्या सर्वांसाठी जीव धोक्यात घालून समाज व देशहित डोळ्यासमोर ठेवून पत्रकारिता करत असतात त्यांचं काय ? आपण 95% पत्रकाकारांना आरोपीच्या पिंजऱ्याच उभं करू शकत नाही.
सर्व प्रश्नासाठी पत्रकारच !
गाव असो की शहर असो, गल्लीत कचरा साचला असेल, रस्ता खराब झाला असेल, योजनेचा लाभ मिळत नसेल, विद्युत पुरवठा खंडीत झाला असेल, शिक्षणाचा बोजवारा उडाला असेल, पीक विमा किंवा अनुदान मिळाले नसेल, प्रमाणपत्र मिळत नसेल किंवा इतर कोणतीही समस्या किंवा प्रश्न असेल तर त्यासाठी प्रामुख्याने नेहमी पत्रकारच आपल्या लेखणीच्या माध्यमातून आवाज उठवत असतात आणि पाठपुरावा करत असतात.
एवढंच नव्हे तर एखाद्या राजकीय पक्ष संघटनेचा पदाधिकारी किंवा कार्यकर्त्याच्या निवडीची बातमी असो किंवा कार्यक्रमाची बातमी असो संबंधित पत्रकार त्यास प्रसिध्दी देत असतो. सर्वच क्षेत्रातील नागरिकांना न्याय देण्याचा पुरेपुर प्रयत्न पत्रकार करत असतो, परंतू त्या पत्रकारालाही काही अडचण असते, त्याचेही काही प्रश्न असतात याचा विचार कोणी केलाय का ?
जो पत्रकार आपल्यासाठी जीवाची पर्वा न करता वर्षानुवर्षे प्रयत्न करत असतो त्याला आपण भेटून तुम्ही कसे आहात ? काही अडचण आहे का ? एवढे चार शब्द विचारण्याची तसदी सुध्दा घेतो का ? याचा विचार समाजाने करणे क्रमप्राप्त झाले आहे. कारण हीच परिस्थिती राहील्यास सध्या आहे ते असंख्य चांगले पत्रकार बाहेर पडतील आणि भविष्यात या क्षेत्रात येण्यास कोणीही तयार होणार नाही यात शंका नाही.
मोफत समाजसेवा !
दिवसभर मजुरी करून मजूर किमान 500 रूपये तरी घरी घेवून जातात परंतू पत्रकार समाजहितासाठी दिवसभर फिरून आणि जीव धोक्यात घालुन बातम्या करत असतात आणि शेवटी घरी रिकाम्या हाताने परत जातात. त्यांना आयुष्य नसते का ? त्यांना कुटुंब, मुलं-बाळं नसतात का ? त्यांचे काही स्वप्न नसतात का ? याचाही विचार करणे आवश्यक आहे.
सहकार्य कसे कराल ?
पत्रकारांना उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते, मात्र थोडंफार कमिशन किंवा लाभ फक्त जाहीराती मधूनच मिळत असतो, त्यामुळे फुल नाही फुलाची पाकळी का असेना छोटी-मोठी जाहीरात देवून आपण पत्रकार आणि पत्रकारिता क्षेत्राला सपोर्ट करू शकतो.
आजही समाजात विविध क्षेत्रात लाखो कमवणारे किंबहुना कोट्याधीश व्यक्ती आहेत परंतू ज्या वेळेस जाहीराती देण्याची वेळ येते तेव्हा त्यांचे तोंड वाकडे होते. जाहीरातीच दिल्या नाही तर ते पत्रकार आणि वर्तमानपत्र, किंवा न्यूज पोर्टल तग धरणार तरी कसे ? त्यामुळे आपण छोटे व मध्यम वर्तमानपत्र, चॅनल, ऑनलाईन न्यूज पोर्टल यापैकी ज्यांना शक्य आहे त्यांना छोटी मोठी का असेना जाहीरात देवून आवश्य सहकार्य करणे काळाची गरज बनली आहे.
हीच ती वेळ !
आपल्या सर्वांसाठी इमाने इतबारे काम करणारे नि:पक्ष, निर्भीड आणि रोखठोक पत्रकार जगले पाहीजे आणि टिकले पाहीजे आणि विशेष म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत करायचा असेल तर त्याला सहकार्य करा, सपोर्ट करा आणि जमलंच तर दोन शब्द प्रेमाचे बोलून त्यांचा आदरही करा, नसता “हीरा ढूंढने की चाह में हम सोना भी गवां बैठे” असं होवू नये, एवढीच माफक अपेक्षा…
परवेज पठाण,
संपादक, एल्गार न्यूज
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली वाचू शकता…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.