एल्गार न्यूज (परवेज पठाण) :-
संपूर्ण भारतीय बनावटीची असलेली वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे उदघाटन आज दि.30 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन (दूरदृष्य) माध्यमातून करण्यात आले. सदरील उदघाटनाच्या वेळी जालना येथे विविध पक्षाचे नेते पदाधिकारी उपस्थित होते.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनची चर्चा होती त्या ट्रेनचे उदघाटन पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून झाले. यावेळी जालना येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ.नारायण कुचे, आ.बबनराव लोणीकर, आ.संतोष दानवे, रेल्वे अधिकारी निती सरकार यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते.
जालनेकरांसाठी अभिमानाचा क्षण !
जालना येथून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी देंवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, रेल्वेचा विस्तार दिवसेंदिवस होत असून युरोप, अमेरिकेप्रमाणे रेल्वे धावणार आहे.
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले की, वंदे भारत ही एक्सप्रेस ट्रेन संपूर्ण भारतीय बनावटीची असून 250 च्या स्पीडने धावणारी ही ट्रेन आहे. पुढील काळात ही ट्रेन लातूर येथील कोच मधून बनवण्यात येणार असल्याचेही सांगितले.
यावेळी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगितले की, मराठवाड्यातील नागरिकांना राजधानी मुंबई येथे कामानिमित्ताने जाण्याची उत्तम सोय झाली असून जालना येथून वंदे भारत ट्रेनचा शुभारंभ होत असल्याने आनंद होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते जालना दरम्यानचे इलेक्ट्रिकचे काम सुध्दा पूर्ण झाले असल्याचे त्यांनी सांगितले.
वंदे भारत ट्रेनचा मार्ग !
सदरील वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मध्ये 530 प्रवाशी क्षमता असून या ट्रेनला एकूण 8 डब्बे आहेत. सदरील ट्रेन जालना येथून दि.2 पासून दररोज (बुधवार वगळता) 05.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 11.55 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहचेल.
जालना येथून वेळ !
वंदे भारत एक्सप्रेस ही ट्रेन जालना येथून पहाटे 05.05 असेल, छत्रपती संभाजीनगर येथे 05.48 वाजता, मनमाड जंक्शन 07.40 वाजता, नाशिक रोड 08.38 वाजता, कल्याण जंक्शन 10.55 वाजता, ठाणे 11.10 वाजता, दादर 11.32 वाजता, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे 11.55 वाजता पोहोचेल. मुंबईहून सदरील ट्रेन 13.10 वाजता सुटेल.
इतर महत्वपूर्ण बातम्या खाली पहा…
महत्वपूर्ण बातम्या नियमित आपल्या मोबाईलवर प्राप्त करण्यासाठी स्क्रीनवर दिसत असलेल्या व्हाट्सअॅप चिन्हाला क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा.